पाटणा : बिहारमधील राजकारणात (Bihar Politics) मोठे वादळ उठले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या दोन मुलांमधील वादाने आता टोक गाठलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav) व आमदार तेजप्रताप यादव (Tej Pratap Yadav) आता उघडपणे एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. तेजप्रताप यांनी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधातील काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे जाहीर केले आहे.
तेजप्रताप यांच्या या भूमिकेमुळे बिहारमधील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. बिहारमधील कुशेश्वर असठाण विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तेजपताप यांनी काँग्रेसचे उमेदवार अतिरेक कुमार यांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी स्थापन केलेली छात्र जनशक्ती परिषद ही संघटना काँग्रेसचा प्रचार करणार आहे. पण त्याचवेळी तारापूर मतदारसंघात तेजप्रताप यांच्याकडून आरजेडीच्या उमेदवारालाच समर्थन देण्यात आलं आहे.
येत्या 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पण तेजप्रताप यांनी घेतलेल्या उघड भूमिकेमुळे आरजेडीमध्ये खळबळ उडाली आहे. या भुमिकेविषयी बोलताना तेजप्रताप म्हणाले, सध्याच्या राजकीय स्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. छात्र जनशक्ती परिषदेचे कार्यकर्ते कुशेश्वर मतदारसंघात काँग्रेसचा तर तारापूर मतदारसंघात आरजेडीच्या उमेदवाराचा प्रचार करतील.
काँग्रेसचे उमेदवार अतिरेक कुमार हे बिहार प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष अशोक कुमार यांचे पुत्र आहेत. त्यांनी नुकतीच तेजप्रताप यांची भेट घेतली होती. तसेच निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. त्यानंतरच तेजप्रताप यांनी ही भूमिका घेतली आहे. मागील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस व आरजेडीने आघाडी केली होती. पण पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष विरोधात आहेत.
तेजप्रताप हे आरजेडीचे आमदार आहेत. पण त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने तेजस्वी यादव यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. तसेच दोन्ही बंधूमधील नात्यातील दुरावाही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. तेजप्रताप यांनी उघडपणे बंडखोरी केली आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते, असे आरजेडीतील काही नेत्यांचे म्हणणे आहे. पण लालूप्रसाद यादव त्यावर अंतिम निर्णय घेतील, असंही त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.