टेक्सास : अमेरिकेतील एका शाळेमध्ये करण्यात आलेल्या बेछुट गोळीबारात 18 विद्यार्थ्यांसह 21 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा हल्लेखोर केवळ अठरा वर्षांचा होता. गोळीबारानंतर त्याने स्वत:वरही गोळी झाडून घेतली. सर्व विद्यार्थी दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गातील होते. (Texas School Shooting Latest Marathi News)
टेक्सासमधील रॉब एलमेंट्री स्कुल या प्राथमिक शाळेत ही घटना घडली आहे. उन्हाळी सुट्टी लागण्यासाठी केवळ दोन दिवस उरले होते. पण त्याआधीच ही घटना घडल्याने अमेरिका हादरून गेली आहे. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
हल्लेखोर हा गाडीतून आला होता. त्याने शाळेबाहेरच गाडी उभी करून आत प्रवेश केला. त्यानंतर लगेचच अंधाधुंध गोळीबार सुरू केला. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर तातडीने सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा हल्लेखोर वाचू शकला नाही. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, या घटनेनंतर जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच या घटनेच्या चौकशीच्या अनुषंगाने महत्वाचे आदेशही दिले आहेत. तसेच देशातील सर्व सार्वजनिक ठिकाणे, लष्करी ठिकाणांवरील राष्ट्रध्वज पुढील तीन दिवस अर्ध्यावर उतरवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
टेक्सासमधील उवाल्डे हे एक छोटे शहर आहे. याच शहरात ही शाळा होती. सुमारे 600 विद्यार्थी शाळेत शिकतात. अॅबॉट यांनी हा हल्ला खूपच घातक आणि चिंता वाढवणारा असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी या हल्ल्याची तुलना 2012 मध्ये सैंडी हुक प्राथमिक शाळेत शाळेत झालेल्या हल्ल्याशी केली आहे. या हल्ल्यात 20 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या हल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.