नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron Variant) व्हेरीयंटच्या पार्श्वभुमीवर केंद्रसरकारही अलर्ट झाले आहे. भारतात ओमिक्रॉनमुळे तिसरी लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या लाटेच्या पार्श्वभुमीवर भारतातही ओमिक्रॉनला रोखण्यासाठी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज (२८ नोव्हेंबर) केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
केंद्रसरकारसह आता राज्य सरकारेही सतर्क झाली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या व्हेरीयंटचे वर्णन ‘वेरिएंट ऑफ कन्सर्न’असे केले आहे. कोरोना विषाणूचा हा प्रकार कोरोनाच्या डेल्टा व्हेरीयंट आणि इतर प्रकारांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे ओमिक्रॉनच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहीत योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
या पत्रानुसार दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना यांसह जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी करुन त्यांना सक्तीच्या विलगीकरण करण्यात यावे. याचबरोबर राज्यांनी लवकरात लवकर हॉटस्पॉट भाग ओळखून योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात. हॉटस्पॉट भागात आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने तपासणीसाठी INSACOG लॅबमध्ये पाठवावेत. जास्तीत जास्त चाचण्या कराव्यात आणि संसर्ग दर ५ टक्क्यांच्या खाली ठेवण्याचा सल्ला केंद्रसरकारने राज्यांना दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनीही भारताला ‘ओमिक्रॉन’संसर्गाबाबत गंभीर इशारा दिला आहे. स्वामीनाथन यांनी मास्क “तुमच्या खिशातील लस” असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर सर्व ज्येष्ठ नागरिकांचे संपूर्ण लसीकरण, समुहाने एकत्र येणे टाळणे, कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने वैदकीय तज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन स्वामीनाथन यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.