
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या (UP Assembly Election 2022) पहिल्या टप्प्यात समाजवादी पक्ष (SP) व भाजपसह (BJP) सर्वच पक्षांनी खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार असे गंभीर व अतीगंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीटे दिली आहेत. एकूण संख्येच्या तब्बल ४५ टक्के इतकी त्यांची संख्या असून पक्षनिहाय पाहूणी केल्यास ३५ ते ७५ टक्के गुन्हेगारांना तिकीटे मिळाल्याचेही दिसून आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचाही यात समावेश आहे.
द एसोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स' (SDR) संस्थेच्या ताज्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील ११ जिलिह्यांतील ५८ मतदारसंघांत १० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यासाठी विविध पक्षांचे ६१५ उमेदवार रिंगणात आहेत. यातील २५ टक्के उमेदवारांवर गंभीर व २० टक्के उमेदवारावंर अतीगंभीर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश साऱ्याच पक्षांनी धुडकावल्याचेही निरीक्षण अहवालात मांडण्यात आले आहे.
सपाच्या ७५ टक्के, राष्ट्रीय लोकदलाच्या ५९ टक्के तर भाजपच्या ५१ टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. कॅाग्रेसने ३६ टक्के, बसपाने ३४ तर आपने १५ टक्के कलंकित उमेदवारांना तिकीटे वाटल्याचे हा अहवाल सांगतो. महिलांवर बलात्कार व अन्य अत्याचारांचे गुन्हे दाखल असलेल्या १२ जणांचाही समावेश आहे. या उमेदवारांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे एडीआरने हा अहवाल तयार केला आहे.
ज्यांच्यावर अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात सपाचे २८ पैकी १७ (६१ टक्के), लोकदलाचे २९ पैकी १५ (५२ टक्के), भाजपचे ५७ पैकी २२ (३९ टक्के), कॅाग्रेसचे ५८ पैकी ११ (१९ टक्के), बसपाचे ५६ पैकी ११ (२९ टक्के) व आपचे ५२ पैकी ५ (१० टक्के) उमेदवार यात आहेत. ६२३ पैकी ८ उमेदवारांच्या प्रतित्रापत्रांतील माहिती अपूर्ण असल्याने त्यांचा समावेश या अहवालात नाही.
निम्मे उमेदवार कोट्यधीश..
एकूण ६१५ पैकी २८० म्हणजे जवळपास निम्मे उमेदवार कोट्याधीश आहेत. १६३ जणांनी आपल्याकडे ५० लाख ते २ कोटी रूपयांपर्यंत संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात जाहीर केले आहे. ८४ जणांकडे २ ते ५ कोटींपर्यंत संपत्ती आहे. सरासरी काढली तर प्रत्येक उमेदवाराकडे जवळपास पावणेचार कोटींची संपत्ती आहे. मेरठ कॅन्टोन्मेंटमधील भाजपचे अमित मालवीय हे सर्वांत श्रीमंत उमेदवार असून त्यांची घोषित संपत्ती १४८ कोटी आहे. उर्जामंत्री श्रीकांत शर्मा यांच्या नावाशी साधर्म्य असलेले बसपाचे मथुरेतील उमेदवार एस के शर्मा यांच्याकडे ११२ कोटींची व सपाचे सिकंदराबादेतील उमेदवार राहूल यादव यांनी आपल्याकडे १०० कोटींची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.