त्या साऱ्यांना ‘उत्सवमूर्तीं‘चे एकाच शब्दांत उत्तर - धन्यवाद

भारतीय जनता पक्षाचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांचा आज आज ९४ वा वाढदिवस
त्या साऱ्यांना ‘उत्सवमूर्तीं‘चे एकाच शब्दांत उत्तर - धन्यवाद
Published on
Updated on

नवी दिल्ली : जगातील सध्याच्या कथितरीत्या सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाला देशाच्या सत्तेच्या शिखराचा मार्ग दाखविणाऱ्या त्या वरिष्ठ नेत्याचा आज ९४ वा वाढदिवस. यानिमित्त देशातील सर्वोच्च नेतृत्वासह बडे नेते त्यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांनी आपल्या या एकेकाळच्या वरिष्ठांचा वाढदिवस चॉकलेट केक कापून साजरा केला. नंतर चहाच्या टेबलवर हास्यविनोदही रंगले. या गोतावळ्यात व सुमारे संपूर्ण तास-सव्वातासात प्रत्यक्ष उत्सवमूर्तींनी मात्र आपल्या ७ वर्षांच्या ‘मौनासनात'च रहाणे पसंत केले. मिळालेली माहिती अशी की, अगदी अखेरीस त्यांनी हात जोडून फक्त व फक्त एकच शब्द उच्चारला - धन्यवाद ! भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी (Lal Krushna Adwani) यांच्या वाढदिवसाच्या सकाळची ही घटना.

भाजपची संसदीय शक्ती जेव्हा ‘हम दो हमारे दो‘ इतकी क्षीण झाली होती त्या १९८९ च्या काळात अडवानींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली आणि भाजपचा जणू भाग्ययोग उजळून निघाला. त्यानंतर पाच वेळा या पक्षाने केंद्रातील सत्ता हस्तगत केली. नरेंद्र मोदी यांच्या उदयानंतर २०१४ पासून पक्षाने केंद्रात सलग दोनदा स्पष्ट बहुमत मिळविण्याचा पराक्रम केला. मात्र अडवानी या संपूर्ण काळात मौनातच गेले. त्यांच्या मौनाची भाषांतरे करण्याचे सामर्थ्य भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याकडे नव्हते व नाही. २०१९ मध्ये तर भाजपने त्यांचे तिकीटच कापले व अमित शहा गांधीनगरचे नवे खासदार बनले. तथापि गेली ७ वर्षे पंतप्रधान मोदी अमित शहांना बरोबर घेऊन ८ नोव्हेंबरला दिल्लीच्या पृथ्वीराज रस्त्यावरील क्र. ३० च्या बंगल्यात अडवानींच्या सरकारी निवासस्थानी जाऊन शुभेच्छा-आशीर्वाद घेण्याचा प्रघात कटाक्षाने पाळतात. आजही सकाळीच पंतप्रधानांचा ताफा अडवानींच्या घरी पोहोचला.

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू व संरक्षणमंत्री राजनाथसिंह हे एकेकाळच्या ‘टीम अडवानी‘तील (डी-४) नेतेही अडवानींकडे पोहोचले होते. प्रतिभा व जयंत ही अडवानींची मुलेही उपस्थित होती. पंतप्रधानांनी अडवानींना मराठी-गुजराती पध्दतीने वाकून नमस्कार केला व त्यांना हाताला धरून बाहेरच्या हिरवळीवर आणले. नायडू यांनी अडवानींचा हात धरून चॉकलेट केक कापला. अडवानींना चॉकलेट भयंकर प्रिय...दिवंगत सुषमा स्वराज अडवानींकडे जाताना चॉकलेट मफीन्स घेऊन गेल्या नाहीत अशी त्यांची एकही भेट नसावी. म्हणूनच वाढदिवशी अडवानींना चॉकलेट केकच द्यावा हा ‘ ये तो बादशहा का हुक्म' असल्याचे भाजप वर्तुळात विनोदाने सांगितले जाते.

अडवानींना मोदींनी केक भरवला व सारे जण बंगल्याच्या आवारातील टेबलावर चहापानासाठी एकत्र जमले. पंतप्रदान आज प्रसन्न मूडमध्ये असल्याचे सांगितले गेले. त्यांनी अडवानींच्या सहवासातील अनेक किस्से सांगितले. नायडू व राजनाथसिंह यांनीही सहभाग घेतला. यावेळी शहा एका तटस्थपणे बसल्याचे छायाचित्रे बोलतात. या साऱ्या गप्पागोष्टी सुरू असताना अडवानी नेहमीच्या शैलीत हात बांधून शांतपणे एकत होते.

अखेरीस मोदींनी, ‘चलीये जी, चलते है‘ असे म्हणून या छोटेखानी मैफलीची भैरवी केली तेव्हा अडवानींनी साऱ्यांकडे पाहून फक्त ‘धन्यवाद' एवढेच शब्द उच्चारले.

त्या साऱ्यांना ‘उत्सवमूर्तीं‘चे एकाच शब्दांत उत्तर - धन्यवाद
काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचे बंधू भाजपमध्ये प्रवेश करणार

राष्ट्र अडवानींचे ऋणी - मोदी

मोदींनी ट्विट करून दिलेल्या संदेशात म्हटले की, आमचा सांस्कृतिक वारसा पुढे नेणे व लोकांना सशक्त करण्यासाठी केलेल्या अगणित प्रयत्नांबद्दल राष्ट्र अडवानी यांच्या ऋणात आहे. शहा तसेच अटल-अडवानी द्वयीचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय पातळीवरील नेते बनलेले डॉ. मुरली मनोहर जोशी, सध्याचे भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, राजनाथसिंह, नायडू, नितीन गडकरी, मुख्तार अब्बास नक्वी आदी ज्येष्ठ भाजप नेत्यांनीही ट्विटद्वारे अडवानींचे अभिष्टचिंतन केले. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कू‘ वर दिलेल्या संदेशात, अडवानी हे मूल्यनिष्ठ राजकारणाचे सशक्त हस्ताक्षर आहेत, असा गौरव केला. प्रभू श्रीराम आपणास मंगलमय दीर्घायू व आरोग्य प्रदान करो, असेही योगी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com