
बिग हॅलो,
यू आर ग्रेट मॅन. लै मोठा माणूस. आम्ही किती फोन केले. मी केले, आमच्या उपाध्यक्षांनी केले. तुम्ही फोनच उचलत नाही. तुम्ही ते रशियन तेल स्वस्तात विकत घेऊन इतर देशांना महागात विकता. हे आम्हाला सहन झालं नाही. म्हणून तुमच्यावर ५० टक्के ‘टेरिफ’ लावले तर तुम्ही १०० टक्के रागावलात की राव. फोनच उचलेनासा झाला म्हणून हा पत्रप्रपंच केलाय. काय राव आम्ही तुम्ही तर आमच्यावर रुसून पार चीनलाच निघून गेलात. तिथं पुतीनमामा, शिंच्या जिनपिंग्याला पार हातमिळवणी केलीत. हास्य-विनोदही केले.
कुठल्या भाषेत तुम्ही गप्पा मारल्यात, हे समजलं नाही. पाकिस्तान अन् भारतात मी मध्यस्थी केली. त्यांचं युद्ध मी थांबवलंय... हे आतापर्यंत १०१ वेळा तरी मी सांगितलं. तुमचं हुं नाही की चूं नाही. असंही नाही की तुम्ही मौनव्रत वगैरे धारण केलंय. त्या पुतीन अन् शिंच्याशी चांगले गोड गोड बोलत होता. गप्पांची मैफल रंगवित होता. या मित्राची आठवण आली नाही का तुम्हाला?
तुमची ही (अभद्र) युती पाहून मी अधिकच गोरामोरा झालो. थोडा लालबुंदही झालो. आमच्या नाकावर टिच्चून त्या रशियाचे तेल तुम्ही विकत घेता. अन् महागड्या दरानं युरोपलाच विकता. लै भारी राव. या तेलप्रश्नी आम्ही इशारा दिला, तर ‘अमेरिका गेली तेल लावत...’ म्हणता. अरे आम्हाला काही किंमत आहे की नाही राव मागच्या टर्मला आपलं चांगलं मैत्र जुळलं होतं राव. पण यावेळी आपले सूर काही जुळेनात.
मी अध्यक्ष नसताना माझ्यावर एक-दोन जीवघेणे हल्ले झाले ते मी सहन केलेत. पण तुम्ही असं अनुल्लेखानं मारता राव. हे सहन करण्याजोगं नाहीच्चे. भारतासारखा मौल्यवान मित्र गमावल्याचं अतीव दुःख होऊन मला हुंदका अनावर होतो. चीनमध्ये पुतीन तुमच्याशी खूपच दिलखुलासपणे बोलत होते. मी त्यांना आमच्या अमेरिकेत लाल पायघड्या घालून बोलावलं तरी तो बाबा काही बधला नाही. (पुतीन आहे की रासपुतीन?) युक्रेन-रशियातील माझी मध्यस्थी यशस्वी होईल असं वाटलं होतं. तेवढंच जागतिक शांततेला हातभार लागला असता. पण पुतीनमामा काही मला यश देईनात राव.
त्यात तुम्ही असा अबोला धरलाय. नाही म्हणायला अमेरिका-भारताच्या मैत्रीचे गोडवे गायले तुम्ही. पण माझं नाव काही तुम्ही घेईनात राव. तुम्ही एवढे शांत राहताय की मला भीतीच वाटतीये की शांततेचं नोबेल तुम्हीच घेऊन जाताय की काय...तिकडे चीनला तुम्ही तिघं भेटल्यापासून का कुणास ठाऊक माझी तब्येत बिघडली आहे. सारखी पोटात कळ मारतीये. तुम्ही तिघंच वेगळं भेटायला नको होतं. मलाही बरोबर घ्यायला पायजेल तुम्ही. नाही तर तीन तिघाडा अन् काम बिघाडा होतो राव.
कळावे, (एके काळचा) आपला,
नमस्ते,
तुम्हाला ‘प्रिय’ म्हणवत नाही आता. आपली एवढी जुनी मैत्री असूनही तुम्ही मला तोंडावर पाडलंत राव. मला अडचणीत आणलंत. सारखं मी भारत-पाक युद्ध थांबवलं असलं पालुपद लावलंय तुम्ही. एवढं नमन तर माझे भक्तही करत नाहीत माझं. माझी पार कोंडी करून टाकलीत. मागच्या टर्मला तुम्ही ‘हाऊडी’ वगैरे म्हणून माझी (५६ इंची) छाती आणखीच फुगवली होती. आता तिला तुम्ही टाचणीच लावली अन् वर ‘हाउज दॅट?’ असं विचारता राव. तुम्ही तुम्हाला पाहिजेल तसं वागता. तिकडे इस्त्राईलनं पार पॅलेस्टाईन होत्याचं नव्हतं केलंय, त्याच्याशी तुम्हाला देणंघेणं नाही. मात्र, त्या युक्रेनचा पुळका आलाय तुम्हाला. आम्ही रशियाकडून तेल घेतलं तर तुम्ही आमच्या मालावर ५० टक्के टेरिफ लावलं अन् मला १०० टक्के अडचणीत आणलंय.
एक तर आमच्या देशात मतचोरीच्या आरोपावरून वैताग आणलंय त्या ‘रागां’नं. त्यात तुम्ही ‘टेरिफ’ लावलं. आता त्यानं माझ्यावर ‘टेरिफचोरी’चा आरोप करू नये म्हणजे मिळवली. त्यात बिहारमध्ये ‘रागा’ तेजस्वीच्या नादी लागलाय. त्या ‘व्होटर अधिकार यात्रे’त रोज एकसे बढकर एक ‘तेजस्वी’ आरोप केलेत त्यानं. त्यात तुम्ही एका बाजूला भारताला गमावलं म्हणून विरहगीत गाता अन् तुमचे सल्लागार मात्र भारतावर थेट आरोप करतात.
एकानं मारल्यासारखं करायचं नि दुसऱ्यानं रडल्यासारखं करायचं. हे असलं करण्यात हयात गेली राजकारणात आमची. आमच्यावरच हे तंत्र अवलंबता राव तुम्ही. ‘आपला तो बाब्या अन् दुसऱ्याचं कार्टं’ असं वागता राव तुम्ही. त्या रशियाकडून तुमची मित्रराष्ट्रही तेल घेतात, अन्य गोष्टीही आयात करतात. पण तुम्हाला आम्ही घेतलेलं तेलच दिसतं का राव? रशियाकडून स्वस्तात तेल घेऊन उलट पुतीनमामांनाच मी बजावलं होतं, की ‘हा युद्धाचा काळ नाही’. ते नाही का दिसलं तुम्हाला. आता पुतीन कुणाचंच ऐकत नाहीत तर माझं काय ऐकणार? माझंही तसंच आहे. ‘एक बार मैने कमिटमेंट कर दी, की मै खुद की भी नही सुनता...’
कळावे, आपला (?)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.