
उत्तर प्रदेशात धर्मांतरणाचे रॅकेट चालवणारा जमालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याच्या अटकेनंतर दररोज नवीन माहिती समोर येत आहे. छांगुर बाबा सध्या चर्चेत आहेत, त्यांचे कारण म्हणजे त्याच्या विविध बँकेच्या खात्यात 100 कोटी रुपये आहेत. एवढी बक्कळ माया त्याने कशी जमवली, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
छांगुर बाबा आणि त्यांच्या संबधीत संस्थांच्या बँक खात्यात 100 कोटी पेक्षा अधिक रक्कम असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आता ईडीची नजर या छांगुर बाबा याच्यावर पडली आहे. ईडी आता त्यांची चौकशी करणार आहे. कोण आहेत छांगुर बाबा जाणून घेऊयात.
छांगुर बाबाच्या कारनाम्यांचा सविस्तर अहवाल एटीएसने ईडीला दिला आहे. धर्मातरण करण्याचे नेटवर्क चालवत असल्याचा आरोपावरुन या बाबाला अटक करण्यात आली आहे. एकेकाळी विविध रंगाचे दगड अन् अंगठ्या विकणाऱ्या छांगुर बाबा काही महिन्यातच कोट्यधीश झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पाच-सहा वर्षांत आलिशान बंगला, आलिशान मोटारी त्याच्याकडे आहेत. अनेक बनावट संस्थांचा तो मालक आहे. मधपूर गावातील त्यांचा बंगल्यातून तो नेटवर्क चालवत होता, असा संशय पोलिसांना आहे. त्याच्या 14 साथीदारांचा शोध उत्तर प्रदेश पोलिस घेत आहे. एटीएस आणि एसटीएफचे पथके त्यांना शोधण्यासाठी रवाना झाली आहेत.
यात काही पत्रकार असल्याचा दावा करणाऱ्या तीन-चार जणांचा यात समावेश आहे. त्यांच्या अटकेनंतर या प्रकरणाचे आणखी धागे-दोरे मिळतील, अशी पोलिसांना आशा आहे. महबूब, पिंकी हरिजन, हाजिरा शंकर, पैमैन रिजवी अशी कथित पत्रकारांची नावे आहेत. आरोपींचे अनेक साथीदार हे आजमगढ़, औरैया, सिद्धार्थनगर परिसरातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याविरोधात यापूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांचे नेटवर्क देशभर पसरले असल्याची माहिती आहे.
मधूपुर येथील आलिशान बंगल्यानंतर याच परिसरात कॉलेज सुरु करण्याची त्यांची योजना होती. त्यासाठी बांधकाम सुरु होणार होते, पण त्याच्या अटकेनंतर हे काम बंद पडले आहे. जमालुद्दीन बाबा याने आतापर्यंत 40 ते 50 वेळा मुस्लिम देशाची यात्रा केली आहे. बलरामपुर येथे अनेक संपत्ती त्यांनी खरेदी केली आहे, या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एटीएस त्याची चौकशी करीत असल्याचे माहिती उत्तर प्रदेशाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक अमिताभ यश यांनी दिली. दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या संस्थांना परदेशातून निधी आल्याचे उघड झाल्यानंतर तपास यंत्रणांनी छांगुर बाबाच्या मुसक्या आवळण्यास सुरवात केली आहे. आखाती देशातून त्याच्या संस्थांना निधी पुरवण्यात येत असल्याचे तपासात उघड झाले आहे. 40 पेक्षा अधिक बँकेत या बाबाची खाती आहेत, याच्या साथीदारांनी अनेक वेळा परदेशवारी केली आहे.