Prasanta Basunia news : पश्चिम बंगालमध्ये दोन अज्ञात व्यक्तींनी घरात घसून भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे.
मृत प्रशांत बसुनिया हे कूचबिहार जिल्ह्यातील दिनहाटा शहराचे भाजपचे महासचिव होते. या खूनामागे तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
दुपारी घरी जेवण करण्यासाठी प्रशांत बसुनिया हे आले होते, तेव्हा दोन अज्ञान व्यक्तींनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली आहे. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळचा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दोन आरोपीपैकी एकाला ओळखत असल्याचे प्रशांत बसुनिया यांच्या आईने पोलिसांना सांगितले. बसुनिया यांच्या हल्लेखोरांना शोधण्यासाठी त्यांचे शेजारी आणि नातेवाईक प्रयत्न करीत आहेत.
भाजप नेता आणि पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदु अधिकारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दिनहाटा परिसरातील अनेक टीएमसी कार्यकर्ते हे भाजपमध्ये सामील होत आहेत. त्यामुळे नाराज असलेल्या टीएमसीने त्यांच्या गुंडाकडून हा प्रकार केला आहे. या प्रकरणाच्या तपासावर राजकीय दबाब येण्याची शक्यता असल्याने त्याची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेने (cbi)करावी, अशी मागणी अधिकारी यांनी केली आहे.
"ही राजकीय हत्या आहे. टीएमसीच्या गुंडांनी ही हत्या केली आहे. स्थानिक निवडणुकीत प्रशांत बसुनिया यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांचा खून करण्यात आला," असा आरोप भाजपचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी केला आहे.
दिनहाटाचे टीएमसीचे आमदार उदयन गुहा यांनी हे आरोप फेटाळले आहेत. "या प्रकरणाशी टीएमसीचा संबंध नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत आहे. लवकरच सत्य समोर येईल," असे ते म्हणाले.
(Edited By : Mangesh Mahale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.