सिब्बलांचा थेट गांधी कुटुंबीयांशी पंगा; 'ते' विधान नेत्यांच्या जिव्हारी

सिब्बल यांच्या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
Kapil Sibal
Kapil Sibal

नवी दिल्ली : पंजाब (Punjab) काँग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरू असतानाच काँग्रेसमधील बंडखोरांच्या जी-23 (G-23) गटाचे नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी बुधवारी थेट गांधी कुटुंबीयांशी पंगा घेतला आहे. 'आम्ही जी-23 आहोत, जी हुजूर-23 नाही', असं वक्तव्य सिब्बल यांनी केलं आहे. हे वक्तव्य काँग्रेस नेत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं असून अनेकांनी सिब्बल यांच्यावर पलटवार केला आहे.

सिब्बल यांच्या विधानानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट सिब्बल यांचं दिल्लीतील घर गाठत आंदोलन केलं. त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तसेच घराबाहेरील सिब्बल यांच्या कारचे नुकसानही करण्यात आले आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'लवकर बरे व्हा' असे फलकही यावेळी हातात घेतले होते. तसेच पक्षातून बाहेर पडा, राहुल गांधी जिंदाबाद अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.

Kapil Sibal
अमित शहा यांच्या भेटीत अमरिंदरसिंग यांनी केली 'ही' मागणी

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनीही सिब्बल यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, सिब्बल यांना कोणतीही संघटनात्मक पार्श्वभूमी नसताना सोनिया गांधी यांनी त्यांना केंद्रीय मंत्री केलं. तुम्हाला ज्या पक्षानं ओळख दिली, त्या पक्षाला बदनाम करू नका, असा टोला माकन यांनी लगावला आहे. तर छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंग देव यांनीही सिब्बल यांना खडेबोल सुनावले. सिब्बल हे दिशाभूल करत आहेत. पक्षात सोनिया गांधीच निर्णय घेतात. सिब्बल यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला हे माहित नाही, हे दुर्दैवी आहे, असं देव म्हणाले.

दरम्यान, पंजाबमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून, यातून मार्ग काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाने तातडीने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. यावरुन काँग्रेसमधील फेरबदलांसाठी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिणारा जी-23 हा बंडखोरांचा गट पुन्हा सक्रिय झाला आहे. या गटातील नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाला अध्यक्ष नसल्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला आहे.

माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसला सध्या निवडलेला अध्यक्षच नाही. मग निर्णय कोण घेतेय हेच आम्हाला कळत नाही. लोक पक्ष सोडून का जात आहेत? आपणच आता आपली चूक पाहायला हवी. तातडीने काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक बोलावावी. पक्षाच्या स्थितीवर चर्चा ही व्हायलाच हवी. आम्ही पक्षाची विचारधारा सोडून कुठेही जाणार नाही. काँग्रेसचे दुर्दैव म्हणजे नेतृत्वाच्या जवळचे नेते पक्ष सोडून जात आहेत आणि नेतृत्वाच्या जवळ नसलेले तर पक्षात कायम आहेत. आम्ही जी-23 आहोत, जी हुजूर-23 नाही, असंही सिब्बल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com