ही मासाळांची 'नकुसा' तर मर्दानी निघाली!

गेल्या काही वर्षापर्यंत समाजात मुलींच्या जन्माबद्दल तीव्र स्वरूपाची नकारात्मक भावना होती. मुलगाच हवा, या भावनेतून मुलींचा तिरकस्कार केला जायचा. मुलगी जन्माला आली तर 'नको असलेली ती' म्हणून तिचे नाव नकुसा ठेवले जायचे. त्यापैकीच ही मासाळांची नकुसा, पण तिने एखांद्या मर्दानीसारखे स्वत:ला सिद्ध केले आहे.
nakusa masal story
nakusa masal story

सांगली : महिंद्रा उद्योगसमुहाचे प्रमुख आनंद महिंद्रा ज्या बोलेरे चालक महिलेचा शोध घेत होते त्या नकुसा मासाळ या मुळच्या कवठेमहांकाळ तालुक्‍यातील बसाप्पाच्यावाडीच्या. मात्र गेल्या वीस वर्षापासून त्या सांगलीतच भाड्याच्या घरात राहतात.

सध्या त्या शामरावनगरातील महादेव मंदिराजवळ दोन खोल्यांमध्ये मुलगा दिलिपसह राहतात. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करीत त्यांचा पत्ता देण्याचे आवाहन केल्यानंतर नेटकऱ्यांनी जोरदार शोधमोहिम राबवली होती. पती निधनानंतर भाजीपाला व्यवसाय करीत कुटुंबाचा गाडा हाकताना नकुसा यांनी बोलेरे जीपगाडी खरेदी करीत सांगलीतून भाजीपाला खरेदी करून कोकणात विक्रीचा व्यवसाय नेटाने सांभाळत आहेत. "बाई बी मीच आणि गडी बी मीच' असा त्यांचा संघर्षमय जीवन प्रवासाचा ध्येयमंत्र जपत त्यांनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या मालवाहतुकीच्या क्षेत्रात आपल्या परिश्रमाचा झेंडा रोवला आहे.

काही दिवसापुर्वी मिरजेतील एका महिला वकीलांनी नकुसा यांचा जीपसह एक फोटो फेसबुकवर शेअर केला. तो फोटो त्यांनी आनंद महिंद्रा यांनाही ट्विट केला होता. त्यानंतर त्यांनी महिंद्रा यांनी मासाळ यांचा पत्ता कळवण्याचे आवाहन सोशल मिडियावर केले होते. त्यानंतर कालच मासाळ यांचं नाव फोन नंबर महिंद्रा यांना मिळताच त्यांच्या अधिकाऱ्यांनी मासाळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना सत्कारासाठी यायचंही निमंत्रणही दिलं. महिंद्रा यांच्या एका ट्‌विटमुळे नकुसाताई सेलेब्रिटी झाल्या आहेत. अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेत त्यांच्या कामाला जणू मानवंदनाच दिली. समाजाकडून होत असलेल्या या कौतुकामुळे आज नकुसाताईंचा चेहरा उजळला होता. आज सकाळ कार्यालयात त्या आल्या असत्या त्यांनी आपल्या संघर्षमय आयुष्याचा प्रवासच मांडला.

त्यांचं माहेर जत तालुक्‍यातील गुळवंची. आईवडील रोजगाराच्या शोधात सांगलीत आले. पडेल ते काम करीत त्यांचे कुटुंब शिकले. नुकसाताईंना दुसरीतून शाळा सोडावी लागली. त्यांना दोन भाऊ. रावसाहेब आणि संतोष वाघमोडे. त्यांचा ट्रक व्यवसाय. त्यांच्याकडे मामा प्रकाश ट्रक चालक म्हणून काम करायचे. त्या मामांशीच त्यांचा सोळाव्या वर्षीच विवाह लावून देण्यात आला. दिलिप, सविता, उज्वला अशी मुलं संसारवेलीवर फुलली मात्र नियतीच्या आघातामुळे सारेच पोरके झाले. पती प्रकाश यांच्या निधनानंतर जगण्यासाठी त्यांनी माहेराकडे न जाता स्वतःच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु केला. गावोगावच्या बाजारात त्या भाजी विक्री करायच्या. त्या व्यवसायाची गरज म्हणून त्यांनी सुरवातीला बोलेरो घेतली. त्यासाठी चालक नेमला. मात्र एकदा धुक्‍याच्या रस्त्यात वाहन चालवणे अवघड झाले म्हणून चालक सोडून गेला आणि नकुसाताईंनी स्टेअरिंग हाती घेतलं. एकदा चावी हाती घेतली ती कायमचीच. गेल्या वीस वर्षापासून त्या वाहन चालवतात. दोन वर्षापुर्वी त्यांना वाहन परवाना मिळाला. तो एका वाहतूक अधिकाऱ्यांच्या सहानभूतीने. त्यांनी त्यांची वाहन चालवण्याची परीक्षा घेतली आणि मोजक्‍या कागदपत्रांच्या आधारे त्यांना लायसन दिलं.

नकुसाताई रोज सांगली-जयसिंगपूरच्या बाजारपेठेतून भाजीपाला खरेदी करतात आणि तो कोकणातील रत्नागिरी, लांजा, भांबर्डे या परिसरातील अनेक गावांच्या आठवडा बाजारांमध्ये विक्री करतात. सोबतीला त्यांना वीस वर्षाचा मुलगाही असतो. रात्री उशिरापर्यंत ड्रायव्हिंग आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर बाजारात भाजीपाला विक्री असा त्यांचा अनेक वर्षापासूनचा शिरस्ता आहे. वाहनाच्या स्टेपनी बदलण्यापासून पासिंगपर्यंतची सारी कामे त्या करतात. सांगलीतील शंभर फुटी रस्त्यावरील मौला मेस्त्री यांच्याकडेच त्या गाडीची सारी दुरुस्ती देखभालीची कामे हक्काने करून घेतात. इकडे भाजीपाला विक्री करतानाही त्या गावाकडील सासरची तीन एकर शेतीही गडीमाणसं कामाला लावून करतात. त्यात शाळू बाजरी पिके घेतात त्यातून वर्षाची कुटुंबाची सोय होते. घाटरस्ता असो की हायवे त्यांचे भन्नाट ड्रायव्हिंग पाहून सारे तोंडात बोटे घालतात. या मार्गावरील पोलिस, धाबेचालक अशी सहव्याव्यावसायिकांची त्यांची इतक्‍या वर्षाच्या संपर्कातून ओळख झाली आहे. सारे त्यांना सन्मानाने वागवतात. बाई म्हणून कुठे कमी पडायचे नाही. पडेल ते काम करायचे. आपणच बाई आणि आपणच गडी असा त्यांचा जणू मंत्रच आहे. दोन्ही मुलींची आधीच लग्ने झाली आहेत. त्या सासरी सुखाने नांदत आहेत. आता मुलगा दिलिपच्या लग्नाचे वेध त्यांना लागले आहेत. त्यांच्या संसाराला होईल तेवढी मदत करायची. त्यासाठी आणखी सात आठ वर्षे ड्रायव्हिंग करायचा त्यांचा निर्धार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com