पवारांच्या दौऱ्यांनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची बॉडी लँग्वेज झाली आक्रमक

.
NCP-Osmanabad
NCP-Osmanabad

उस्मानाबाद :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी (ता. 17) उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी घेतलेल्या मेळाव्यातून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली. डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी सोडल्या नंतर कार्यकर्ते सैरभैर झाले होते . पण शरद पवारांच्या दौऱ्या नंतर आणि भाषणा नंतर राष्ट्रवादीच्या  कार्यकर्त्यांची बॉडी लँगवेज आक्रमक झालेली दिसत आहे . 

शरद पवारांच्या मेळाव्याला युवक कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद होता. त्यांच्या भाषणाला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत होता . भाषणा दरम्यान सभागृहात टाळ्यांचा अनेकदा कडकडाट झाला  आणि हास्याचे फवारेही उडताना दिसत होते .  उस्मानाबाद जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहील , असा शब्द पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिला. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे चित्र दिलासादायक असले तरी जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची एकत्रित मोट बांधण्याचे आव्हान आता पक्षासमोर आहे.


गेली 45 वर्षे श्री. पवार यांचे विश्वासू सहकारी म्हणून माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांना ओळखले जात होते. डॉ. पाटील यांचे पुत्र आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आमदार पाटील यांनी जिल्ह्यात या पक्षाचे एकहाती नेतृत्व केले. त्यांच्याकडे पक्षाचे जिल्हाध्यक्षपदही होते. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार, असा प्रश्न आहे.

गेल्या दहा दिवसांपूर्वी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी श्री. बिराजदार यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होत असताना शिक्षक आमदार विक्रम काळे, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, परंड्याचे आमदार राहुल मोटे, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार आदींनी गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठक घेऊन संवाद साधत पक्षाची पडझड थांबविण्याचा प्रयत्न केला. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी उस्मानाबादेत मेळावा घेण्यात आला. त्यात श्री. पवार यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या संवाद मेळाव्याचे नियोजन आमदार काळे, आमदार चव्हाण, आमदार मोटे, श्री. गोरे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी केले होते. 

या मेळाव्याला किती गर्दी होईल, असा प्रश्न आयोजकांपुढे होता. त्यामुळे हा मेळावा मंगल कार्यालयात घेण्यात आला. मात्र या मेळाव्याला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्यामुळे अनेकांना कार्यालयाबाहेरच्या मैदानात बसावे लागले. पण झालेली  गर्दी पाहता पक्षाचे मेळावे मैदानात घ्यावे लागणार असे दिसते . 

जिल्ह्यातील विधानसभेच्या चार मतदारसंघांपैकी परंडा आणि उस्मानाबाद हे दोन मतदारसंघ आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. 2014 मधील निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळविला. परंडामधून राहुल मोटे तर उस्मानाबादमधून राणाजगजितसिंह पाटील हे निवडून आले. आता आमदार पाटील यांनी पक्ष बदलला आहे.

उस्मानाबाद मतदारसंघ शिवसेनेकडे आहे . तानाजी सावंत आणि शिवसेनेचे अन्य नेते हा मतदारसंघ भाजपला सोडायला तयार नाहीत . जर उस्मानाबाद मतदारसंघ सुटला नाही  तर राणाजगजितसिंह  भाजपच्या हक्काच्या तुळजापूरमध्ये लढू शकतात  त्यामुळे राणाजगजितसिंह यांची दोन्ही मतदारसंघात कोंडी करण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीकडून केली जाण्याची चिन्हे आहेत . 

आमदार मोटे हे परंडा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. या मतदारसंघात परंडा, वाशी, भूम या तीन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघावर आमदार मोटे यांची पकड आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, कळंब तालुक्यांत राष्ट्रवादी पक्षाची ताकद आहे. मात्र या दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्याची जबाबदारी जिल्ह्यातील नेतेमंडळींना पार पाडावी लागणार आहे.  उमरगा, लोहारा तालुक्यांची जबाबदारी प्रा. सुरेश बिराजदार सांभाळत आहेत.

जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. हा वर्ग पक्षाशी कायम ठेवण्यासाठी जिल्ह्यातील पक्षनेतृत्वाला काळजी घेण्याची  गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांना बळ देण्यासाठी व जिल्ह्यातील हा पक्ष एकसंघ ठेवण्यासाठी या नेतेमंडळींनी पुढाकार घेतला आहे. 

जिल्ह्यातील दोन मतदारसंघातील जागा कायम ठेवण्याचे  आव्हानही आता जिल्ह्यातील या नेत्यांसमोर आहे. त्यात ही नेतेमंडळी कितपत यशस्वी होतात, हे पाहण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पण पवारांच्या मेळाव्याने कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावले असून ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे . राष्ट्रवादीमधून होणाऱ्या आऊटगोईंगचा गाजावाजा सुरु असताना  या मेळाव्यामध्ये मात्र उस्मानाबाद तालुक्यातील एसपी शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील, काँग्रेसचे नितीन बागल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ही बाबसुद्धा महत्वाची आहे .      

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com