... आता यांना "भाजप' कळेल !

भाजपमध्ये जगतापांनी सत्ता आणली, पण आता सूत्रे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांसाठी नागपुरात काम केले. आता तेच आयुक्त तीन वर्षांसाठी या महापालिकेत आले यातच सर्व काही आले. पूर्वी राष्ट्रवादीचा रिमोट बारामतीकरांच्या हाती होता, आता तो खुद्द फडणवीस यांच्या हातात आहे.
... आता यांना "भाजप' कळेल !

भाजप म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा. भले संघाचे स्वयंसेवक "तो मी नव्हेच' अथवा "आम्ही नाही त्यातले' म्हणोत. ताटातले वाटीत अन्‌ वाटीतले ताटात असा हा प्रकार. हिंदू संघटन, हिंदू समाज रक्षण, हिंदू समाज उन्नती हा सर्व कामाचा केंद्र बिंदू. जे संघाच्या पोटात तेच भाजपच्या ओठात असते. देश, काल आणि परिस्थितीनुरूप काही वळणे घेत घेत भाजपचा हा रथ येथवर पोचला.

सत्तेचा संकल्प सिद्धी नेण्यासाठी भाजपने अनेक तडजोडी केल्या, मात्र, ध्येयापासून ढळले नाही. आदेश म्हणजे आदेश. शिस्त कशी असावी ते संघाकडून शिकावे. केंद्रात सत्ता हवी म्हणून अनेक छोटेमोठे मासे गिळले, पचवले. राज्यात सत्तेसाठी शिवसेनेच्या लाखोल्या झेलत स्वप्न साकारले. महापालिका आणि जिल्हा परिषदेलाही तडजोडी करत प्रस्थापितांचे गड, किल्ले उध्वस्त केले आणि सत्तांतर घडविले. पिंपरी चिंचवड हा त्यातलाच एक.

पवार काका-पुतण्यांचा बालेकिल्ला. दादांचा चिरेबंदी वाडा होता. "फोडा आणि राज्य करा' हा फॉर्म्युला भाजपने वापरला आणि इथे होत्याचे नव्हते केले. राष्ट्रवादीचेच आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यां द्वयीला पंखाखाली घेतले. आयुष्य भाजप विरोधात गेलेल्या आझम पानसरे यांनाही गळाला लावले. प्रसंगी सत्तेसाठी घरच्या मंडळींना बाजूला ठेवले. शहरात भाजप ज्यांनी स्थापन केली, वाढवली, रुजवली त्यांनी आयात मंडळींच्या विरोधात आकांडतांडव केला. तोही पचवला. भाजपने खडकातून पाणी काढले आणि इथे सत्ता स्थापन केली. या सर्व यशाचे मानकरी आमदारच असल्याचा डांगोराही पिटला. पुढे दोन्ही आमदारांच्या सांगण्यानुसारच "महापौर',"स्थायी समिती अध्यक्ष' आणि विषय समिती सभापतीही वाटले. आपण सांगू त्यालाच कुंकू लावतात असा या नेत्यांचा ग्रह झाला होता. त्यामुळे स्वीकृत सदस्य नियुक्तीलाही नको ती नावे पुढे आली. ज्यांनी पक्ष विरोधात काम केले त्यांना उमेदवारीसाठी शिफारस झाली. अगदी कंबरेचे सुटायची वेळ आली. त्यामुळे अखेर थेट मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घातले.

संघ कधीही हस्तक्षेप करत नाही, पण इथे संघाच्या दृढाचार्यांनीही "आम्ही सांगू तेच' म्हणत दोन्ही आमदारांना नाकदुऱ्या काढायची वेळ आणली. राष्ट्रवादीतून आलेल्या मंडळींनी भाजपची नितीतत्व, शिस्त, आदेशालाच केराची टोपली दाखवली म्हटल्यावर थेट मानदंड वर केला. त्यामुळेच मोरेश्‍वर शेडगे, माऊली थोरात यांना संधी मिळाली. तिथेच दोन्ही आमदारांना लक्षात आले. मुंबईकरांनी आमदारांचा रिमोट आणि रिमोटची बॅटरीही काढून घेतली. आता आमदारांना संघ आणि भाजपची शिस्त कळेल. 
नाकापेक्षा मोती जड 
पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना आमदार जगताप आणि लांडगे यांनाही अजित पवार अर्थात दादांचा फ्री हॅन्ड होता. माजी महापौर आझमभाई पानसरेंच्या शब्दाशिवाय राष्ट्रवादीचे पान हालत नव्हते. साहेब असो वा दादा एक मानाचे पान होते. राष्ट्रवादीचा कुटुंबकबिला मुठभर होता म्हणून शब्दाला मान होता. कार्यकर्त्यांचाही लवाजमा होता, संच होता. कदाचित जगताप राष्ट्रवादीत असते तर, अमर मूलचंदानी यांच्यासाठी दिलेला शब्द प्रत्यक्षात आला असता. भाजपमध्ये जगतापांनी सत्ता आणली, पण आता सूत्रे खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मुख्यमंत्र्यांसाठी नागपुरात काम केले. आता तेच आयुक्त तीन वर्षांसाठी या महापालिकेत आले यातच सर्व काही आले. पूर्वी राष्ट्रवादीचा रिमोट बारामतीकरांच्या हाती होता, आता तो खुद्द फडणवीस यांच्या हातात आहे.

भय-भ्रष्टाचार मुक्त कारभार देण्याची जबाबदारी आहे. अवघ्या दोनच महिन्यांत पुन्हा राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याची सामान्य जनतेची प्रतिक्रिया आली. हा सूर पाहून हस्तक्षेप करावा लागला. संघाचे प्रांत आणि शहर पदाधिकारी आता थेट महापालिकेत बैठका घेतात, अधिकाऱ्यांनी आदेश करतात. त्यावेळी महापौर, सत्ताधारी नेते, स्थायीचे अध्यक्ष आळीमिळी गुपचिळी भूमिकेत असतात. हे चित्र बरेच बोलके आहे. आता खरा भाजप काय आहे, संघ आणि पक्षाची शिस्त कशी असते ते समजेल, दिसेल. एका विशिष्ट परिस्थितीतून भाजप जात आहे.

सर्व समाजात भाजपची स्वीकारार्हता वाढली आहे. लोकसुद्धा आता भाजपच्या वाटेवर चालण्यासाठी तयार आहेत. फक्त संघ शिबिर केले म्हणून भाजपचा होत नाही किंवा "जय श्रीराम'चे उसने अवसान चालत नाही. पैलवान लांडगे यांचे बाहू फूरफुरले किंवा लक्ष्मणभाऊंचे डोके तापले तरी उपयोग नाही. आता ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी नाही. पूर्ण ताबा आणि सातबारा भाजपचा आहे. संघाच्या मुशीत आणि भाजपच्या मुठीत आहात, लक्षात असू द्या. शेंडी तुटो वा पारंबीचा खेळ संपला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com