भाजपच्या  विस्तारक योजनेचा पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी केला "फ्लॉप शो' ! 

पक्ष विस्तारासाठी काम करण्याचा जो आदेश मुख्यमंत्र्यांनीपिंपरीच्या अधिवेशनातदिला होता तो आदेश पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी धाब्यावर बसविल्याचे दिसते.
BJP-SYMBOL
BJP-SYMBOL

भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या पिंपरी चिंचवड येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारक योजना कशी राबवायला हवी हे सांगितले होते. खासदार आमदारांपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांनी आपल्या शहरात किंवा गावात नव्हे; तर, परगावी जाऊन त्या-त्या मंडलात विस्तारक म्हणून काम करायचे. 

तेथील स्थानिकांच्या भेटी घ्यायच्या, ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत सरकारची कामे व योजना सांगायच्या आणि त्या माध्यमातून पक्षाचे प्राथमिक सदस्य वाढवायचे असे सुचविले होते. जे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी विस्तारक योजनेसाठी जाणार नाहीत त्यांना समोर आणण्याचे आव्हान त्यांनी माध्यमांना केले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांचा तो आदेश पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांनी धाब्यावर बसविल्याचे दिसते. 

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशभरात कार्यविस्तारक अभियान सुरू आहे. आता विस्तारक योजनेची राज्यात अंमलबजावणी कशी झाली ते पाहण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा येत्या काही दिवसांत मुंबईला येत आहेत.

 आपल्या भेटीत ते राज्यातील कोणत्याही भागातील एखाद्या मंडलाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना बोलावून "तुम्ही काय काम केले ते दाखवा', अशी विचारणा करू शकतात. त्यासाठी प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची धावपळ उडाली आहे. हे पदाधिकारी प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कोणी कशी योजना राबविली त्याची पाहणी करीत आहेत. 

पिंपरी चिंचवडमध्येही विस्तारक योजना राबविण्यात आली. त्यासाठी पक्षाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप हे स्वत: कर्जतला तर आमदार महेश लांडगे पाचगणीला जाऊन राहिले. परंतु, शहरातील अन्य कार्यकर्त्यांत आनंदी आनंदच दिसला. मुख्यमंत्र्यांनी परगावी जाण्याचा आदेश दिलेला असताना भाजपचे नगरसेवक पिंपरी चिंचवड शहरातच एकमेकांच्या प्रभागात जाऊन फिरले. काही प्रामाणिक कार्यकर्त्यांनी मात्र, घरोघरी जाऊन संपर्क साधत हे अभियान राबविलेही परंतु अनेक कार्यकर्त्यांनी थातूर-मातूर काम करून वेळ निभावली. 

रविवारी याच अभियानाची पाहणी करण्यासाठी प्रदेश संघटक रवी भुसारी यांनी शहराला भेट दिली. त्यांना घेऊन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चिंचवड व वाल्हेकरवाडीत काही ठिकाणी निवडक घरांमध्ये भेटी दिल्या. एका झोपडपट्टीत फेरफटका मारला. जे भेटले त्यांना सरकारच्या कोणत्याच योजनांची माहिती नव्हती. विशेष म्हणजे प्रदेश पदाधिकारी येत आहेत, याची  कल्पना त्याच विभागातील नगरसेविकेलाही नव्हती. यावरून हे अभियान किती गंभीरतेने राबविले गेले याची प्रचिती येते.

  जुन्या कार्यकर्त्यांची नाराजी 

भाजपला सत्तेवर आणण्यासाठी नव्यांबरोबरच जुन्या कार्यकर्त्यांचाही तितकाच वाटा आहे. मात्र, निवडणुकीत डावलले गेले, स्वीकृत सदस्यपदावर संधी दिली नाही, त्यामुळे या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. या अभियानातून बहुतेक जुन्या कार्यकर्त्यांनी अंग काढून घेतल्याचे दिसले. जे नवीन कार्यकर्ते इतर पक्षातून आले, त्यांना भाजपच्या कार्यक्रमांचा गंध नाही. असे कार्यक्रम त्यांच्या अंगवळणी पडलेले नाहीत, त्यामुळे ते याकडे गांभीर्याने पाहात नाहीत. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भाजपच्या कार्यविस्तारक योजनेचा "फ्लॉप शो' पहायला मिळाला. 


सत्तेवर असल्याने दुर्लक्ष्य 

  भाजपची महापालिकेत पहिल्यांदा सत्ता आली. सत्तेवर येऊन जेमतेम काही महिने लोटले आहेत. अजून पदाधिकारी कारभारात स्थिरावले नाहीत. अनेक गोष्टी समजून घेण्यात त्यांचा वेळ जातो. शहराच्या विस्कळित पाणी पुरवठा आणि पाणी टंचाईच्या मुद्यावरून ते स्पष्ट झाले. त्यामुळे अभियानापासून महापालिकेतील पदाधिकारी दूर राहिले. अनेक जण अजूनही सत्ता मिळाल्याच्या आनंदात डुंबत आहेत. त्यामुळे पक्षाच्या अभियानाकडेही त्यांचे लक्ष्य नसल्याचे आढळून येते. पण, राज्यातील सत्तेवरच इथल्या सत्तेची मांड अवलंबून राहणार आहे, सद्यःस्थिती पाहता पक्षाला ते विसरून चालणार नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com