ओबीसी महामंडळास 500 कोटी देणार  :  देवेंद्र फडणवीस

इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथे लवकरच वसतीगृह सुरू करणार आहे. लवकरच राज्यातील 19 जिल्ह्यात वसतीगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
OBC
OBC

मुंबई  :" इतर मागास वर्गातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी ओबीसी महामंडळास येत्या दोन अर्थसंकल्पीय अधिवेशनात 500 कोटी रुपये देण्यात येतील. तसेच नोकऱ्यांमध्ये आरक्षणातील कोट्याप्रमाणे जागा भरल्या नसतील, तर त्या भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल", अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी  येथे केली .

राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने वरळी येथील एनएससीआय येथे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

 त्याचप्रमाणे महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना "भारतरत्न' देण्यात यावा, यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सत्तेत आल्यानंतर राज्य शासनाने नवीन ओबीसी मंत्रालयाची स्थापना केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, "इतर मागास वर्गासाठी जे जे आवश्‍यक आहे ते सर्व देण्याचा राज्य शासन आणि केंद्र शासन प्रयत्न करत आहे. ओबीसीसाठीच्या राष्ट्रीय मागास आयोगाला संविधानिक दर्जा देण्याच्या घटना दुरुस्तीला कालच संसदेने मान्यता दिली आहे. सत्तर वर्षानंतर केंद्र शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. '

"राज्यात इतर मागास वर्गाला आरक्षणातील कोट्याप्रमाणे नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले की नाही, याची माहिती जाहीर करण्यात येईल. तसेच आरक्षणातील कोट्याप्रमाणे जागा भरल्या नसतील तर त्या भरण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखला जाईल. तसेच ओबीसी समाजाच्या जागा त्या समाजालाच मिळतील."

" इतर मागास वर्गातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर येथे लवकरच वसतीगृह सुरू करणार आहे. लवकरच राज्यातील 19 जिल्ह्यात वसतीगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात लवकरच ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा करणार असून केंद्र शासनाशी संबंधित विषयावर शिष्टमंडळाबरोबरच मी स्वतः केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. इतर मागास वर्गातील नॉन क्रिमिलेअर ही संकल्पना रद्द करण्यासाठी मागास आयोगाला सांगितले आहे. " असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय मागास आयोगाचे माजी अध्यक्ष माजी न्यायाधीश व्ही ईश्वरय्या व शब्बीर अन्सारी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच लिड इंडिया फाऊंडेशनचे हरिकृष्ण इप्पनपल्ली, मदन नाडीयावाला आदींचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, महाअधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, जयदत्त क्षीरसागर, हरियाणातील खासदार राजकुमार सैनी, माजी खासदार व्ही हनुमंत राव, माजी खासदार अली अनवर अन्सारी, खुशाल खोपचे, सचिन राजूरकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com