Girish Mahajan Fitness : व्यायामात्‌ लभते स्वास्थ्यं...; या वयातही महाजन एवढे ‘फिट’ कसे?

Girish Mahajan Health : वयाची साठी पार केल्यानंतरही महाजनांच्या या फिटनेसचं रहस्य नेमकं काय आहे, हे त्यांच्याच शब्दांत...
Girish Mahajan Fitness
Girish Mahajan FitnessSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News : ‘गिरीश महाजन समोर आले, की मी पहिल्यांदा त्यांचा दंड दाबून बघतो. या वयातही महाजन एवढे ‘फिट’ कसे राहतात याचं माझ्यासकट आम्हा सर्वांनाच आश्‍चर्य वाटतं..’ ही वाक्ये आहेत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांची. एका कार्यक्रमात व्यासपीठावरूनच पवारांनी महाजनांच्या फिटनेसचं तोंड भरुन कौतुक केलं होतं..

कधी ट्रकच्या स्टीअरिंगवर बसून ट्रक वाहतूक कोंडीतून बाहेर काढताना, कधी ट्रॅक्टवर बसलेले तर कधी स्पीड बोटमधून जलसफारी करतानाचे महाजनांचे व्हिडिओ अनेकदा व्हायरल झाले आहेत. वयाची साठी पार केल्यानंतरही महाजनांच्या या फिटनेसचं रहस्य नेमकं काय आहे, हे त्यांच्याच शब्दांत...

Girish Mahajan Fitness
Shrikant Shinde : नेत्यांचा फिटनेस: खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात; दिवसातला दीड तास स्वतःसाठी...

व्यायामात्‌ लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्‌ ।

आरोग्य परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्‌ ॥

अर्थात, मानवी जीवनात चांगले आरोग्य असण्यात फार मोठे सुख आहे.. आणि निरोगी जीवनाच्या सुखासह दीर्घायुष्याचे भाग्य नियमित व्यायामानेच लाभते. Health is Wealth असे इंग्रजीत म्हटले जाते. आजच्या धकाधकीच्या आणि विविध रोग, व्याधींना निमंत्रण देणाऱ्या जीवनशैलीत आरोग्याचे महत्त्व वेगळे सांगायला नको.

‘शरीराला योग्य आकार देणारा कुंभार म्हणजे नियमित व्यायाम’ अशी शिकवण आपल्याला शालेय जीवनापासूनच मिळते. सुदैवाने माझे बालपण जेवढे शाळेत गेले, तेवढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतही गेले. त्यामुळे नियमित व्यायामाचे धडे शाळेबरोबरच मी संघ शाखेतूनही गिरवले. बाल स्वयंसेवक म्हणून सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्तीच्या संस्कारांबरोबरच नियमित व्यायामाचा संस्कारही शाखेतून मिळाला. आणि त्या नियमित व्यायामाच्या संस्कारावरच आजवरची वाटचाल सुरू आहे.

Girish Mahajan Fitness
Rahul Kul News : फिट अँड फाईंन आमदार राहुल कुल

शालेय जीवनात व नंतर महाविद्यालयीन टप्प्यावर नियमित व्यायाम करण्यात कुठलीही अडचण नव्हती. मात्र, सार्वजनिक जीवनात आणि विशेषत: राजकारणात काम करीत असताना कधीही, कुठेही वेळेचे बंधन राहत नाही. जनतेत सामील होताना कुठलेही नियोजन कामी येत नाही.. किंबहुना आपली वेळ आपल्या हातात कधीही नसते. गेल्या काही वर्षांपासून तर कामाचा अतिरिक्त ताण असून त्यामुळे महिन्यातील जवळपास निम्म्याहून अधिक दिवस सारखा प्रवासच होत असतो. परंतु, या स्थितीतही नियमित व्यायाम सुरू आहे.

अशी आहे दिनचर्या -

रात्री शक्यतो लवकर झोपण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पहाटे लवकर उठता येते. पहाटे कुठल्याही प्रकारचा व्यायाम उपाशी पोटी करायचा असतो, हा सर्वसाधारण नियम पाळतो. पहाटे उठून, फ्रेश झाल्यावर प्रारंभी ‘वॉर्मअप’, नंतर योगाभ्यासात नमूद केलेल्या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार सूर्यनमस्कार घालतो. ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आवर्जून जीममध्ये जाऊन ‘वर्कआउट’ करतो. दोरीच्या उड्यांनी शरीरात ऊर्जा निर्माण होते, शरीराच्या सर्व प्रकारच्या अवयवांचा व्यायाम दोरीच्या उड्यांमधून होतो.. म्हणून नियमितपणे दोरी उड्याही मारतो. एकावेळी पाचशेहून अधिक दोरीउड्या मारण्याची क्षमता आजही शरीरात आहे..

जीममधील ‘हेवी वर्कआउट’मधील सर्व प्रकार आता वाढत्या वयानुसार शक्य होत नसले तरी आवश्‍यक व शरीराला मानवेल असे ‘वर्क आउट’ नियमित करतो. त्यानंतरच्या टप्प्यात प्राणायाम, ध्यान धारणाही करतो. मनस्वास्थ्यासाठी प्राणायाम, ध्यान- धारणेवर नियमितपणे भर असतो. ज्या ज्या वेळी जमेल तेव्हा रनिंगला जाणे, न जमल्यास घरीच मशीनवर धावण्याचा व्यायाम न चुकता करतो. काही प्रसंगी पहाटेच मतदारसंघात निघावे लागते, त्यासाठी गाडीत डम्बेल्स व अन्य साहित्य असते. अशा स्थितीत वेळ मिळेल तेव्हा एखाद्या शेतात थांबून ‘वॉर्मअप’ व अन्य व्यायाम करतो.

आहार- सवयींवरही नियंत्रण -

पौष्टिक आहाराला जीवनात विशेष महत्त्व आहे. म्हणूनच व्यायाम झाल्यानंतर चहा- कॉफी अथवा बिस्कीट वगैरे आदी मैद्याचे पदार्थ न घेता फळांचा आहार, मोड आलेल्या धान्याची उसळ; त्यात प्रामुख्याने मूग, मटकी, चवळी, हरभऱ्याची उसळ आदी पदार्थ नाश्‍त्यात घेतो. दुपारच्या व रात्रीच्या जेवणातही सात्विक आणि पौष्टिक पदार्थच असतात. त्यात पालेभाज्यांवर भर असतो.

बाहेरच्या पदार्थांना ‘ना’ -

अनेकदा राजकीय सभा, दौरे, मंत्रिमंडळाच्या बैठका, मंत्रिमंडळातील कामकाज, अधिवेशन, पक्षीय कार्यक्रम आणि तत्सम नियोजनामुळे प्रवास करावा लागतो. महिन्यातून वीसपेक्षा जास्त दिवस घराबाहेरच ठिकठिकाणी, राज्यभरात दौरे करावे लागतात.. परंतु, अशा वेळीही बाहेरचे, विशेषत: हॉटेलमधील जंक फुड, अन्य खाद्य पदार्थ खाण्याचे आवर्जून टाळतो.. शक्यतो प्रवासात जातानाही घरच्या जेवणाचा डबा असतो. चहाचे दुष्परिणाम बरेच आहेत. त्यामुळे चहाला वर्ज्य ठेवले आहे. बाहेरगावी प्रवासात एखाद्या कार्यकर्त्याच्या घरुन बनवून आणलेले साधे जेवण करतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहून शरीर स्वस्थ राहते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com