गेल्या अनेक वर्षापासून औरंगाबादचे नाव 'संभाजीनगर' करावे,अशी मागणी केली जात होती. अखेर औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' करण्याच्या प्रस्तावाला गृह मंत्रालयाने २४ फेब्रुवारी २०२३ रोजी मंजुरी दिली.
औरंगाबाद हे शहर ज्या परिसरात वसलेले आहे,त्याचा इतिहास सातवाहन कालखंडापर्यंत आढळून येतो. विक्रमादित्य राजाच्या काळातही या परिसराचा उल्लेख आहे. सातवाहनाच्या काळात खाम नदीकिनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी एक असलेले ‘खडकी’ हे गाव आजचे औरंगाबाद मानले जाते.
काही इतिहासकारांच्या मते, १६०४ मध्ये अहमदनगरचा निजामशहा मूर्तझा द्वितीय याचा मंत्री मलिक अंबर याने 'खडकी' हे शहर वसवले. परंतु हे गाव पूर्वीपासूनच अस्तित्वात होते. १९३३ मध्ये मलिक अंबर याचा मुलगा 'फतेह खान' या शहराचा राजा झाला आणि त्याने आपल्या नावावरून या शहराचे नाव 'फतेहनगर' ठेवले.
१६५३ मध्ये औरंगजेब दख्खन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादला आला. त्याने शहराचे नाव फतेहनगर वरुन 'खुजिस्ता बुनियाद' असे ठेवले. कालांतराने त्याने 'खुजिस्ता बुनियाद' नाव बदलून 'औरंगाबाद' केलं.
'छत्रपती संभाजीनगर' हे एक महत्त्वाचे मध्यवर्ती, औद्यौगिक केंद्र व ऐतिहासिक पर्यटनकेंद्र म्हणून नावारूपास आलं. पण १९८८ मध्ये औरंगजेबाच्या नावाला विरोध करत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे, अशी मागणी केली होती.
राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादच्या नामांतराची घोषणा करत शहराचे नाव 'संभाजीनगर' केलं.
पण एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावर त्यांनी हा निर्णय रद्द केला आणि पुन्हा नामांतराचा नवा प्रस्ताव मांडला. काल केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर यानामांतराला मंजुरी दिली.