अभ्यासू आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासियांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या सुषमा स्वराज आज भलेही आपल्यात नसतील, पण त्यांचे नाव आणि लोकांच्या हृदयात त्यांची छाप आजही तितकीच खोलवर रुजली आहे.
भारताच्या माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांचा आज वाढदिवस आहे. सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 रोजी हरयाणा (तत्कालीन पंजाब) राज्यातील अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये झाला. त्यांचे वडील 'आरएसएसशी' जोडलेले होते.
स्वराज यांनी अंबाला कॅन्टोन्मेंटमधील सनातन धर्म महाविद्यालयातून सुरुवातीचे शिक्षण घेतले आणि संस्कृत आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळवली. त्यांना S.D. मध्ये N.C.C च्या सर्वोत्कृष्ट कॅडेटची पदवी देखील मिळाली होती. तसेच त्यांनी चंदीगडमधून 'लॉ'ची पदवी घेतली होती.
सुषमांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात १९७० च्या दशकात अभाविपच्या माध्यमातून केली. वयाच्या २५ व्या वर्षी सुषमा स्वराज हरियाणाच्या कामगार मंत्री झाल्या. १९७७ ते १९७९ मध्ये समाजकल्याण, कामगार यासारख्या आठ खात्यांची जबाबदारी त्यांनी सक्षमपणे सांभाळली होती.
वयाच्या 27व्या वर्षी त्या जनता पार्टीच्या हरयाणा प्रदेशाध्यक्ष झाल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावरील राजकीय पक्षाच्या पहिल्या महिला प्रवक्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
त्याशिवाय पहिल्या महिला मुख्यमंत्री आणि पहिल्या विरोधीपक्ष नेत्या म्हणून स्वराज यांच्या नावाची देशाच्या राजकीय इतिहासात नोंद आहे.
तीन वेळा विधानसभेवर तर सात वेळा खासदार म्हणून विजयी झाल्या होत्या.
आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सुषमा यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्या जनता पार्टीच्या सदस्य झाल्या.
स्वराज यांनी 13 जुलै 1973 रोजी स्वराज कौशल यांच्याशी विवाह झाला. स्वराज कौशल यांना वयाच्या 34 वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच मिझोरामचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.
२०१४ मध्ये मोदी मंत्रिमंडळात त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून अत्यंत सक्षम आणि लोकाभिमुख भूमिका निभावली. सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री, सर्वोत्कृष्ट संसदपटू आणि लोकाभिमुख परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द गौरवशाली राहिली आहे.