किरण गोसावी (Kiran Gosavi) - य़ाचे नाव सर्वात प्रथम नवाब मलिक यांनी पुढे आणले. त्याची आर्यन खान सोबतची सेल्फी महागात पडली. ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) चा मुख्य साक्षीदार किरण गोसावी होता. पण तोच आता आरोपी झाला आहे. किरण गोसावीने 2018 मध्ये फेसबुकवरून पुण्यातील तरुणाला मलेशियात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याची 3 लाख रुपयांची फसवणूक केली होती. त्यानंतर गोसावी फसवणुकीच्या गुन्ह्यात फरार होता,14 ऑक्टोबर रोजी गोसावी यांच्याविरोधात लुक आऊट नोटीसही जारी केली होती. त्यानंतर अखेर पुणे पोलीसांनी 28 ऑक्टोबर रोजी अटक केली.
प्रभाकर साईल(Prabhakar Sail) - आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाला वेगळे वळण लागले ते प्रभाकर साईलच्या धक्कादायक गौप्यस्फोटांमुळे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीचा प्रभाकर साईल ह बॉडीगार्ड आहे. प्रभाकर साईल हा या प्रकरणातील क्रमांर दोनचा मुख्य साक्षीदार आहे. आर्यनला सोडवण्यासाठी गोसावीने शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केली होती. तसेच, एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपली कोऱ्या कागदांवर सही घेतली, असा धक्कादायक गौप्यस्फोट केल्यानंतर तर या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. प्रभाकरच्या आरोपांनंतर समीर वानखेडेंच्या कामावरही राज्यभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
मनीष भानुशाली (Manish Bhannushali) - आर्यन खानला एनसीबी कार्यालयात घेऊन जाणारा व्यक्ती हा मनिष भानुशाली आहे आणि तो भाजपचा उपाध्यक्ष असल्याचा आरोप मलिकांनी केला होता. त्यानंतर मनीष भानुशाली अनेक दिवस गायब होता. नवाब मलिकांनी मनीष भानुशालीवर देखील आरोप केले होते. मनीष भानुशाली आणि खासगी गुप्तहेर के.पी.गोसावी हे दोघे क्रूझवरील छाप्याआधीच एनसीबीच्या कार्यालयात होते, असा आरोप केला नवाब मलिकांनी केला होता.
सॅम डिसुजा (Sam D'Souza) - क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने सॅम डिसोझा आणि गोसावी यांचे फोनवरील संभाषण ऐकल्याचा दावा केला होता. त्यानंतर यात सॅम डिसोझाचे नाव पुढे आले होते. आर्यनला सोडवण्यासाठी जी डील झाली, त्यात शाहरुखकडे २५ कोटी रुपये मागण्यात आले होते, त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देण्यात येणार असल्याचे साईलने म्हटले होते. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिने ही डील केली होती.अभिनेता शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावी यांच्यात दलाली केल्याचा आरोप सॅम डिसोझावर करण्यात आला आहे.
विजय पगारे (Vijay Pagare) - आर्यन खान प्रकरण घडवून आणलं गेलं, असा धक्कादायक दावा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील प्रत्यक्ष साक्षीदार विजय पगारे यांनी केला आहे. सुनील पाटील सतत समीर वानखेडे यांच्याशी सतत व्हॉईस कॉलवर बोलायचे. माझ्यासमोर हे बोलणं झालं आहे. जर तपास अधिकारी यांनी मनीष भानुशाली आणि सुनील पाटील यांची योग्य प्रकारे तपासणी केली तर सगळं प्रकरण बाहेर येऊन जाईल. आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात फसवण्यात आलं आहे, असेही पगारे यांनी म्हटले.
सुनील पाटील (Sunil Patil) - भाजप नेते मोहित कंबोज यांनी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सुनील पाटील हेच मास्टर माइंड असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. क्रुझवरील पार्टीची टिप पाटील याच्याकडेच होती, अशी माहिती मोहीत कंबोज यांनी पुढे आणली. आपल्याला ही माहिती मध्य प्रदेशमधील एका भाजप कार्यकर्त्याकडून मिळाली. हा कार्यकर्ता तेथील भाजप नेत्याचा समर्थक असल्याचा दावा पाटील याने केला आहे.
पूजा ददलानी : शाहरूख खान याची मॅनेजर म्हणून पूजा ददलानी हिची ओळख होती. मात्र किरण गोसावी, डिझोझा यांच्याशी सुमारे 50 लाख रुपयांचे डिल तिने आर्य़नच्या सुटकेसाठी केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांनीही तिला पुढील चौकशीसाठी बोलविले आहे. या मंडळींनी आर्यन खानच्या प्रकरणात पैसे मागितले की नाही, याचा सारा खुलासा पूजाच्या जबाबातून होणार आहे. त्यामुळे तिचा जबाब महत्वाचा ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.