मुख्यमंत्रीसाहेब, शेतीसाठी दिवसा बारा तास वीज द्या; धुळ्यातील शेतकऱ्यांचे भावनिक आवाहन

रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू होताच ग्रामीण भागात वीज भारनिमयन सुरू झाले. शेतकऱ्यांना पिकांना सिंचनासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून, त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी धुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली आहे
Dhule Farmers want Twelve Hours Electricity Supply
Dhule Farmers want Twelve Hours Electricity Supply
Published on
Updated on

देऊर : एकीकडे शेतीत पिकांना पाणी देण्यासाठी दिवसा बारा तास वीजपुरवठा नाही. बिबट्यांचा प्राणघातक त्रास, तर दुसरीकडे शेतात उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही. बाजारपेठेत विका अथवा बांधावर शेतीमाल विक्री करा. पिकविलेला शेतीमाल व झालेला खर्च यांचा आर्थिक ताळमेळ बसत नाही. माल निघेपर्यंत झालेल्या खर्चाचे फासे उलटे पडतात. तोच फासा कर्जरूपाने घट्ट बसतो. 'चार आण्याची कोंबडी अन्‌ बाराआण्याचा मसाला' अशी परिस्थिती शेतकऱ्यांना अनुभवास येत आहे. रात्री थंडीचे सहा ते दहा अंश सेल्सिअस तापमान, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर सध्या शेतातून निघत असलेल्या उत्पादित मालाला भाव व शेतीला दिवसा किमान बारा तास वीजपुरवठा करावा, अशी व्यथा मांडत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.

रब्बी हंगामात सिंचनाचे काम सुरू होताच ग्रामीण भागात वीज भारनिमयन सुरू झाले. शेतकऱ्यांना पिकांना सिंचनासाठी रात्रीचा दिवस करावा लागत असून, त्रासलेल्या शेतकऱ्यांनी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी धुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी केली आहे. आठवड्यात एक-दोन दिवस दिवसा वीजपुरवठा होतो; अन्यथा रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसात या वेळेत वीजपुरवठा केला जातो. अशी वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिवसभर राबल्यानंतरही पाणी द्यायला शेतात जावे लागते.

सध्या रब्बी पिकांची पेरणी, कुठे सिंचनाचे काम सुरू झाले आहे. शेतकरी यासाठी दिवसभर शेतात काम करीत असतो. मात्र, वीज नसल्याने त्याला रात्री जागरण करीत हरभरा, गहू पिकांना पाणी द्यावे लागते. रात्रभर शेतात उभे राहावे लागते. सध्या थंडीचा जोर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना सिंचनाचे काम करताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यातच वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर रोहित्रांवर अनेक तांत्रिक बिघाड होत असतात. ते दुरुस्तीसाठी रात्री धावपळ करावी लागते. त्यामुळे शेतकरी दिवसा वीजपुरवठा मिळावा, अशी मागणी करीत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा केला पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री जावे लागणार नाही. शेतकरी हासुद्धा माणूस आहे, याचे भान वीज कंपनीने ठेवायला हवे.

वीज वितरण कंपनीकडून कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे शेतीकामांचा बोजवारा उडाला असून, परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. परिसरातील सर्व धरणे यंदा समाधानकारक भरल्याने वीजटंचाई भासणार नाही, असे वाटत होते. मात्र, भारनियमन सुरू आहे. तसेच वीज असते त्यावेळी कमी दाबाने पुरवठा होत असल्याने पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी, नाल्यांसह बंधारेही भरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांची म्हणजे गहू, मका तसेच चाऱ्याची लागवड केली आहे. मात्र, पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड झाले आहे. अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने एक वाफा भरण्यासाठी अर्धा तास लागत आहे. वीज खंडित होण्याचे प्रमाणही वाढल्याने वाफ्यापर्यंत पाणी पोचण्यापूर्वी वीज जाते. त्यामुळे विहीर ते वाफ्यापर्यंत शेतकरी चकरा मारून हैराण झाला आहे. पाणी भरण्यासाठी दोन व्यक्तींची गरज भासू लागली असून, एक शेतात, तर दुसऱ्याला स्टार्टरजवळ उभे राहावे लागत आहे.

आम्ही रात्रभर का जागे राहायचे?

'जो कोणी हा निर्णय घेतला असेल, तो आम्हाला वैरी समजत असावा आणि रात्री शेतीला वीज देता, रात्री ट्रान्स्फॉर्मरवरील फ्यूज गेला, तर तो टाकण्यासाठी कंपनीने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात. आम्हा शेतकऱ्यांना जीव धोक्‍यात घालून फ्यूज टाकावा लागतो. सध्या शेतीशिवारात बिबट्यासह वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेकदा प्राण्यांचे हल्ले, शेतकऱ्यांवर जीवघेणे हल्ले होतात. सर्पदंश, विंचू दंश होत असतो. या पार्श्वभूमीवर दिवसा वीजपुरवठा हवा. दिवसभर शेतात राबल्यानंतर पुन्हा रात्री, कडाक्‍याच्या थंडीत आम्हाला गहू, हरभऱ्याला पाणी द्यायला जावे लागते. सरकारने शेतकऱ्यांना बारा तास वीज दिली पाहिजे, ही रास्त अपेक्षा नव्या सरकारकडून आहे.' असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com