अमळनेर : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा अमळनेर बाजार समितीचे माजी सभापती (स्व.) उदय वाघ यांचे २८ नोव्हेंबरला निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने अमळनेरसह जळगाव जिल्ह्यात एक पोकळी निर्माण झाली. उदय वाघांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी आमदार स्मिता वाघ ह्या डगमगल्या नाहीत. दुःखातून स्वतःला सावरत पक्षकार्यासाठी अवघ्या अठरा दिवसानंतर नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात सहभागी झाल्यात.
एवढ्यावरच न थांबता भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या दिल्ली येथे २७ जानेवारीपासून ते ६ फेब्रुवारीपर्यंत ठाण मांडून होत्या. त्यांनी दिल्ली येथील त्रिनगर, विश्रामनगर, चंदननगर आदी भागातील उमेदवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळून खानदेशची शान वाढविली.
२४ फेब्रुवारीला सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप आमदारांसमवेत स्मिता वाघ यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, सातबारा कोरा झालाच पाहिजे, महिलांवरील वाढते अत्याचार थांबले पाहिजेत अशा विविध विषयांवर घोषणाबाजी करत महाविकास आघाडीच्या शासनाचे लक्ष वेधून घेतले. श्रीमती वाघ यांनी विधान परीषदेतही पांझरा, माळण नदीजोड प्रकल्पासाठी आवश्यक निधीसाठी तसेच महिलांच्या सुरक्षेकरिता कार्यान्वित वन स्टॉप सेंटरबाबत तारांकित प्रश्नही उपस्थित केला.
अमळनेर तालुक्यातील पांझरा, माळण नदीजोड प्रकल्पासाठी आवश्यक निधी मिळवून जल उपलब्धता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी शासनाला साकडे घातले. यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले, की हा नदीजोड प्रकल्पास सविस्तर सर्व्हेक्षण करण्यासाठी अंदाजपत्रकास जिल्हा नियोजन विभागाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
क्षेत्रीय कार्यालयामार्फत सविस्तर सर्व्हेक्षणही करण्यात आले आहे. शासनाच्या २३ ऑगस्ट २०१७ अन्वये जिल्हास्तरीय नदीजोड योजनेचा जिल्हा योजनेत समावेश करून याबाबत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत जलसंपदा विभागाच्या समन्वयाने कार्यवाही करण्याबाबतचा मार्गदर्शन सुचनाही केल्या आहेत.
गल्ली ते दिल्ली प्रवास
काही महिन्यांपूर्वी आमदार स्मिता वाघ यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरचा कर्ता पुरुषच काळाने हिरावून घेतला. अशा प्रतिकूल परिस्थितीतही घराची घडी बसवून राजकीय घडी ही सुस्थितीत आणण्याचे काम केले. पक्षनिष्ठा दाखवत गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास त्यांनी गेल्या महिन्यात केला. मंगळवारी (ता. २५) अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत धरणे आंदोलन केले. नागरिकांच्या प्रश्नांसाठी पुन्हा त्या सज्ज झाल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.