सहकारमंत्री देशमुख, माजी आमदार माने यांच्या `समाजसेवे'मुळे कार्यकर्त्यांत `सोशलवॉर'

सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे दोघेही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतात.
सहकारमंत्री देशमुख, माजी आमदार माने यांच्या `समाजसेवे'मुळे कार्यकर्त्यांत `सोशलवॉर'

सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि त्यांचे प्रतिस्पर्धी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे दोघेही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात कायम या ना त्या कारणाने चर्चेत असतात. 

आता या दोघांनीही रस्त्यातील अपघातग्रस्तांना मदतीचा हात दिला. दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते त्यांच्या या `समाजसेवे'ने भलतेच भारले. व्हॉटसअपग्रुपवर पटापट मदतीचे फोटो आणि त्यांची वाहने कशी कामी आली, याचे चित्र मांडण्यात आले. 

एवढ्यावर थांबतील ते कार्यकर्ते कसले? बिनीच्या या कार्यकर्त्यांत व्हॉटसअपग्रुपवरच आपापल्या नेत्यांची समाजसेवा कशी आहे, याचे गोडवे गायला सुरवात झाली. 

थेट ऐतिहासिक उदाहरणांची त्यात भर पडली. पण पुढे दोन्ही कार्यकर्त्यांत आरे-तुरेंच्या भाषेने चक्क सोशलवॉर रंगले. पण एका समजदार व्यक्तिने हस्तक्षेप करत दोन्हींही कार्यकर्त्यांचे चांगलेच कान पिळले आणि सोशलवॉर अखेरीस थांबले. 

गेल्या आठवड्यात निंबर्गी येथे कार्यक्रमास जाताना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासमोर होनमुर्गीनजीक रस्त्याच्या कडेला एका शेतकऱ्याला जीपने ठोकरल्याची घटना घडली. मंत्री देशमुख यांच्या पुढेच ही घटना घडल्याने तातडीने त्यांनी आपली गाडी थांबवून संबंधित जखमी शेतकऱ्याला आपल्या गाडीतून सोलापूरला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यासाठी गाडी रवाना केली आणि दुसऱ्या गाडीने ते आपल्या नियोजित कार्यक्रमाला पोचले, त्यानंतर वृत्तपत्रातही मंत्र्यांच्या या कार्यतत्परतेबाबत मथळे प्रसिद्ध झाले. 

पुढच्या पाच-सहा दिवसांनी माजी आमदार दिलीप माने हेही कामतीकडे एका लग्नसमारंभासाठी निघाले होते. कामतीनजीक असाच एक अपघात झाला. तेव्हा त्यांनीही आपल्या स्वतःच्या इनोव्हा गाडीतून जखमींना सोलापूरला उपचारासाठी पाठवले, अशा या दोन्ही घटना दुर्देवाने घडल्या.

योगायोगाने दोन्ही नेत्यांनी यात दाखवलेली समयसूचकता आणि सामाजिक बांधिलकीही सर्वांना भावली खरी. पण उत्साही कार्यकर्त्यांनी त्याचे असे काही भांडवल केले की, व्हॉटसअपॅग्रुपवर प्रचाराचा फड रंगवला. 

गेल्या काही महिन्यांपासून सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री देशमुख आणि माजी आमदार माने या दोघांतील शीतयुद्ध कोर्टाच्या पायरीपर्यत पोचले आहे. 

बाजार समितीच्या निवडणुकीचं पुराण अद्याप संपण्याचे नाव घेईना, आता काही महिन्यांवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच चेकाळले आहेत. 

नेत्यांच्याप्रती निष्ठा दाखवताना प्रसंग काय आणि कोणता? याचेही भान त्यांना उरलेले नाही, हे दिसून आले. आता मात्र नेत्यांनीच आपल्या कार्यकर्त्यांना आवरण्याची गरज आहे. अन्यथा, केवळ व्हॉटसअपवरच रंगलेलेल हे सोशलवॉर कधीही समोरासमोर रंगेल, यात शंका नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com