चंद्रकांतदादांनी निवडणूक लढवली कोथरूडला पण मतदान केले कोल्हापूरला ! 

निवडणूक ग्रामपंचायतीची असो किंवा महापालिका, नगरपालिकेची त्यात उमेदवारांना तुझं स्वतःचे तरी मत तुला आहे का ? असा उपरोधिक सवाल विचारला जातो.
patil-mahadik-chandrakantda.
patil-mahadik-chandrakantda.

कोल्हापूर : निवडणूक ग्रामपंचायतीची असो किंवा महापालिका, नगरपालिकेची त्यात उमेदवारांना तुझं स्वतःचे तरी मत तुला आहे का ? असा उपरोधिक सवाल विचारला जातो.

कारण अनेक उमेदवार आपला भाग सोडून किंवा प्रभाग सोडून दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढवतात. यावेळची विधानसभेची निवडणूकही त्याला अपवाद ठरलेली नाही. जिल्ह्यातील चार उमेदवारांना स्वतःला मतदान करता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण, हे उमेदवार रहातात एका मतदार संघात आणि निवडणूक लढवतात दुसऱ्या मतदार संघातून.
कोल्हापूर  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. पण त्यांनाही स्वतःचे मत देता आले नाही. त्यांचे मूळ गांव खानापूर (ता. भुदरगड) तर मतदान कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील संभाजीनगर परिसरात आहे. त्यांनी सपत्नीक दुपारी मोटारीने धावती भेट कोल्हापुरात देऊन मतदानाचा हक्क बजावला आणि पुन्हा पुणे गाठले.

ऐनवेळी भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यत्त्वाचा राजीनामा देऊन हातकणंगेलतून "जनसुराज्य' च्या तिकिटावर विधानसभा लढवत असलेले अशोक माने यांचे मूळ गांव शिरोळ तालुक्‍यात आहे, त्याच तालुक्‍यातील शिरोळ जिल्हा परिषद गटातून विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांचे मतदान शिरोळमध्ये आणि उमेदवारी हातकणंगलेतून असल्याने त्यांना स्वतःला मतदान करता आलेले नाही. 

याच मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांचीही तशीच परिस्थिती आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे पुत्र असलेल्या राजूबाबा यांचे वास्तव्य गेल्या अनेक वर्षापासून इचलकरंजी शहरात आहे, त्याच शहरात त्यांच्यासह कुटुंबाचे मतदान आहे. परिणामी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचे मतदान त्यांना होऊ शकले नाही.


जिल्ह्यातील सर्वात "टफ फाईट' असलेल्या कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील स्पर्धेतील दोन्हीही उमेदवार हे मतदार संघाबाहेरचे आहेत. कॉंग्रेसचे उमेदवार व आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज यांचे व त्यांच्या कुटुंबाचेही मतदान कोल्हापूर उत्तरमधील कसबा बावडा येथे आहे. ऋतुराज यांच्यासह त्यांचे आजोबा शिक्षणमहर्षि डॉ. डी. वाय. पाटील, वडील संजय पाटील, आई सौ. वैजयंती, चुलती सौ. प्रतिमा व आमदार पाटील यांनी कसबा बावडा येथे मतदानाचा हक्क बजावला. या कुटुंबाचेही मतदान ऋतुराज यांना नाही. 

दुसरे उमेदवार आणि भाजपाचे विद्यमान आमदार अमल महाडिक हे हातकणंले तालुक्‍यातील पुलाची शिरोलीचे रहिवासी आहेत. त्यांच्यासह त्यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक, पत्नी व जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका, भाऊ स्वरूप, आई सौ. मंगल यांचे मतदान पुलाची शिरोलीत तर त्यांच्या प्रचाराची धुरा असलेले माजी खासदार धनंजय महाडिक यांचे मतदान कोल्हापूर उत्तरमधील रूईकर कॉलनीत आहे. या कुटुंबाचेही मतदान अमल यांना मिळाले नाही. पण त्या त्या मतदार संघात जाऊन या उमेदवार व त्यांच्या नातेवाईकांनी मतदान केले.

चंदगडमधून भाजपाकडून बंडखोरी करून "जनसुराज्य' च्या तिकिटावर मैदानात उतरलेले अशोक चराटी यांचे वास्तव्य आजरा शहरात आहे. त्यांच्या कन्या शहराच्या पहिल्या नगराध्यक्षा आहेत. हे शहर राधानगरी मतदार संघात येते, त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी राधानगरीत मतदार संघात मतदान केले. श्री. चराटी हेही स्वतःला मतदान करू शकले नाहीत. याच मतदार संघातील भाजप बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांचे अलिकडचे वास्तव्य हे ठाणे येथे आहे. त्यामुळे त्यांचे मतदानही चंदगडमध्ये नसल्याने त्यांनाही स्वतःच्या मतापासून मुकावे लागले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com