

कोल्हापूर : ‘बंद पडलेला गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सुरू केला. शेतकऱ्यांसह कामगारांना आधार दिला. परंतु, त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांच्याच त्रासाला कंटाळून ब्रिक्स कंपनी कारखाना सोडून गेली,’ असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, गिजवणेकर यांनी केला.
गिजवणे (ता. गडहिंग्लज) येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, ‘स्वाती कोरी पालकमंत्री मुश्रीफ यांच्यावर खोटे आरोप करीत आहेत. २०१३ मध्ये ॲड. शिंदे यांची सत्ता असताना ११ महिने कामगारांचा पगार थकला.
कामगारांना शेतमजुरीवर जाण्याची वेळ आली. तेव्हा आम्हा सर्वांच्या आग्रह व पाठपुराव्यामुळे मुश्रीफ यांनी ब्रिक्स कंपनीला कारखाना चालवण्यास घ्यायला लावला. पुढे आठ वर्षे कारखाना सुरळीत सुरू होता.
त्यानंतर आलेल्या मंडळींच्या त्रासामुळे कंपनी कारखाना सोडून गेली. गेल्या वर्षी मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीनंतर डॉ. प्रकाश शहापूरकरांना अध्यक्ष केले. त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता भ्रष्टाचाराचे महापाप केले, त्याची चौकशी सुरू असून सत्य बाहेर येणार आहे.’
पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गेल्या पंधरा वर्षांपासून कडगाव गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघ कागल विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झाला. परिसरातील गावखेड्यांचा सखोल अभ्यास करून सुरुवातीला येथे मूलभूत सुविधा पुरविल्या,
त्यानंतर मिळालेल्या विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून सर्वच गावांमध्ये कोट्यवधीचा निधी दिला. मूळच्या कागल मतदारसंघाच्या पेक्षा अधिक निधी येथे दिल्याने विकासकामे झाली. गावे सुंदर बनली. येथील लोकांनी नेहमीच पाठबळ दिल्याने सर्वांच्या ऋणात राहीन.’
राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे म्हणाल्या, ‘स्वाती कोरी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांच्या कामांचे तोंड भरून कौतुक केले. आज विरोधी व्यासपीठावरून बेताल आरोप करीत आहेत.’ यावेळी ‘गोड साखर’चे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य ॲड. हेमंत कालेकर, मराठा संघटनेचे देसाई, विजय काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर गडहिंग्लज कारखाना अध्यक्ष प्रकाश पताडे, किरण कदम, सुषमा पाटील, शैलजा पाटील, सरपंच पौर्णिमा कांबळे, एस. आर. पाटील, के. बी. पोवार, पी. एस. देसाई, मिलिंद मगदूम, अनुप पाटील, पृथ्वीराज पाटील, सुदेश चौगुले, नितीन पाटील, अमित देसाई, भूषण गायकवाड, संतोष चव्हाण, अजय बगुडे, ग्रामस्थ व महिला उपस्थित होते. आदित्य पाटील यांनी स्वागत केले. रमेश पाटील यांनी आभार मानले.
बहुरूपी भूमिका
सिद्धार्थ बन्ने म्हणाले, ‘प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळी भूमिका घेत स्वतःची उमेदवारी जाहीर करतात. खोक्यासाठी तडजोड करायची हेच काम त्यांनी केले. अशी बहुरूपी भूमिका घेणाऱ्यांचा मुश्रीफ यांना चांगलाच अनुभव आहे. सतेज पाटील यांनाही तो अनुभव येईल.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.