
कोल्हापूर : `आमदार ऋतुराज पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात अनेक विकासकामे करून नेत्रदीपक कामगिरी केली आहे. मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. या विकासकामांच्या जोरावर ऋतुराज यांचा विजय निश्चित आहे,’ असे प्रतिपादन अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा अलका लांबा यांनी केले.
काँग्रेस कमिटीत आमदार ऋतुराज पाटील यांच्या विकासकामांची माहिती देणाऱ्या ‘दक्षिण दिशा प्रगतीची..’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अलका लांबा म्हणाल्या, ‘ऋतुराज पाटील म्हणजे विकासाचे व्हिजन असणारे आमदार आहेत. त्यांच्या रुपाने अतिशय अभ्यासू आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी लाभले आहे. मतदारसंघातील विकासकामाच्या जोरावर जनता त्यांना पुन्हा आमदार करतील.’
माजी नगरसेविका भारती पोवार म्हणाल्या, ‘ऋतुराज पाटील यांनी पाच वर्षांपूर्वी जो शब्द दिला होता, त्यातील बहुतांश कामे पूर्ण केली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. या पुस्तिकेच्या माध्यमातून त्यांच्या कर्तृत्वाचा आलेख मांडण्यात आला आहे.
पुढील काळातही याहून अधिक काम करून दाखवतील याची खात्री आहे.’ महिला काँग्रेसच्या माजी प्रदेश उपाध्यक्षा सरलाताई पाटील म्हणाल्या, ‘गेल्या पाच वर्षांत ऋतुराज पाटील यांनी केलेले काम या पुस्तिकेतून जनतेसमोर मांडले आहे. त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे निश्चितच कौतुकास्पद आहेत.’
या माहिती पुस्तकामध्ये आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर शहराच्या ४० वर्ष प्रलंबित असणारी थेट पाईपलाईन योजनेसाठी केलेला पाठपुरावा तसेच गांधीनगर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यासाठी केलेले प्रयत्न याची माहिती आहे.
१४ गावांमध्ये क्रीडांगणे, विरंगुळा केंद्रे, पाच ठिकाणी मतदारसंघांमध्ये सुरू केलेल्या अभ्यासिका, स्मार्ट स्कूल, कळंबा तलाव संवर्धन आणि सुशोभीकरण, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी भूसंपादन, कोल्हापूर आयटी इंडस्ट्रीजसाठी पाठपुरावा अशा विविध माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचा उल्लेख आहे. भविष्यातील विकासकामांचा वेधही या पुस्तिकेमध्ये घेण्यात आला आहे.
यावेळी महिला काँग्रेस निरीक्षक आरती सिंग, कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे निरीक्षक सुखवंतसिंग ब्रार, आंध प्रदेश काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष साके सैलजानाथ, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक तौफिक मुल्लाणी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.