कोल्हापूर : राज्यातील काँग्रेसच्या (Congress) तब्बल २० आमदारांनी पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेटीसाठी वेळ मागितली आहे. त्यावरून राज्यात खळबळ उडाली असून आरोप-प्रत्यारोपही रंगले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरमधील ज्येष्ठ आमदार पी. एन. पाटील (P. N. Patil) यांचाही समावेश आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांनी पाटील यांना लक्ष्य केले होते. त्याला पाटील यांनी उत्तर देताना ‘आजपर्यंत काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केलेला नाही. आमची काळजी त्यांनी करण्याची गरज नाही,’ असा टोला नाव न घेता लगावला आहे. (Prakash Awade should not worry about us : Congress MLA P. N. Patil)
काँग्रेसचे मुळात आमदार किती आहेत, त्यातील २५ आमदार नाराज आहेत. सध्याच्या मंत्र्यांवर नाराज असलेल्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदार आहेत. आमदार पी. एन. पाटील आणि राजू आवळे हे नाराज असल्याचेही आपण ऐकले आहे. त्यामुळे सध्या दंगा करणारे, पळणारे २०२४ च्या निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमध्ये राहतील का, असा प्रश्न आहे, असा प्रश्न आमदार प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीवरून उपस्थित केला होता.
आमदार आवडेंच्या आरोपला उत्तर देताना पी. एन. पाटील म्हणाले की, गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत आम्ही काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केलेला नाही. गांधी, नेहरू घराणे व काँग्रेसचा मी सच्चा पाईक असून काँग्रेससाठीच आजन्म कार्यरत राहणार आहे. त्यामुळे काँग्रेस व आमच्याबाबत दुसऱ्या कोणी काळजी करण्याची गरज नाही. युवक काँग्रेसपासून राष्ट्रीय समितीपर्यंत मी पक्षात काम केलेले आहे. पक्षाचे विचार प्रामाणिकपणे समाजाच्या तळागाळापर्यंत पोचविले आहेत. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ अखंडितपणे सद्भावना दौडचे आयोजन करण्यात येते. काँग्रेसच्या माध्यमातून विविध संस्थांची उभारणी करून हजारो हातांना काम दिले आहे. राजकीय जीवनात अनेक चढ-उतार आले. मात्र, काँग्रेस सोडून दुसरा कोणताही विचार केलेला नाही अथवा पक्षाशी गद्दारी केलेली नाही.
दिल्लीत ४ व ५ एप्रिलला संसदेच्या पार्लमेंटरी रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फॉर डेमाक्रसीस संस्थेमार्फत अभ्यास दौऱ्यासाठी दिल्लीला जाणार आहोत. त्यावेळी पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी माझ्यासह अन्य आमदारांनी वेळ मागितली आहे. त्यामध्ये नाराजीचा संबंध नाही. मात्र, या बाबीचा विपर्यास केला आहे, हे चुकीचे आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.