जनादेशामुळेच माझा विजय निश्‍चित : समरजितसिंह घाटगे 

samarjitsinh_ghatge
samarjitsinh_ghatge
Published on
Updated on

मी नगरविकास मंत्री नसलो तरीही गडहिंग्लजची हद्दवाढ केली. मी जलसंपदा मंत्री नाही, तरीही बंधारे बांधले. मी कामगार मंत्री नव्हतो, तरी गडहिंग्लजमध्ये एमआयडीसी आणल्यामुळे तरुणांना रोजगाराची संधी मिळाली. आता कागलची निवडणूक गटा-तटाची नव्हे, तर विकासकामांवर होणार आहे. मला जनादेश मिळाल्यामुळेच अपक्ष रिंगणात आहे. आणि जनादेशामुळेच माझा विजय निश्‍चित असल्याचे मला वाटते, असा विश्‍वास कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांनी व्यक्त केला. 

*तुम्ही कोणते मुद्दे घेऊन मतदारांसमोर जात आहात?  


- राजे विक्रमसिंह घाटगे यांच्यापासून विकासामध्ये राजकारण नको ही भूमिका आहे. हाच महत्त्वाचा मुद्दा घेऊन निवडणुकीत मतदारांसमोर जात आहोत. वर्षभर पाऊस पडला नाही, तरीही चिकोत्रा धरणात पाणी साचेल, अशी व्यवस्था केली आहे. आजपर्यंत कागलमध्ये केवळ गटा-तटाचेच राजकरण होत होते. आता राजकारणाव्यतिरिक्त विकास करण्याचा मानस आहे. साडेतीन वर्षांत आम्ही मंत्री-आमदार नसतानाही तो विकास करून दाखवला आहे. म्हणूनच आज युवा पिढीच्या पुढाकारातून मला जनाधार मिळाला आहे. त्यांच्या विकासाचे मुद्दे घेऊनच मी मतदारांसमोर जात आहे. 

* भाजपने तुम्हाला उमेदवारी का डावलली? 
- युतीच्या निर्णयात माझा आणि कागल विधानसभा मतदारसंघाचा बळी गेला आहे. केवळ जिल्ह्यात असे झाले नाही. साधारण 20 ठिकाणी असे घडले आहे. मात्र, त्यामध्ये उमेदवार म्हणून माझे नाव निश्‍चित झाले असतानाही मला उमेदवारी मिळाली नाही, याची खंत आहे. "ए' व "बी' फॉर्म आमच्या विरोधकांना मिळाला. मात्र, मला जनतेनेच "ए' व "बी' फॉर्म दिल्यामुळे मी आज निवडणूक लढवत आहे. 

* विजयाची खात्री आहे काय? असल्यास कारणे? 
- मला शंभर टक्के विजयाची खात्री आहे. तीन वर्षांत कागलात गटा-तटाचेच राजकारण झाले. आम्ही विकासावर चर्चा करतो. काम करतो. मी कामगार मंत्री नव्हतो, तरीही गडहिंग्लजमध्ये एमआयडीसी आणली. मी नगरविकास मंत्री नव्हतो, तरीही गडहिंग्लजची हद्दवाढ करून आणली. जलसंपदा मंत्री नसलो, तरीही बंधारे बांधले. यातूनच आम्हाला जनाधार मिळाला आहे. मी निवडून येणार याची खात्री आहे. मला जनादेश मिळाला आहे. युवक मोठ्या ताकदीने माझ्यासोबत आहेत. ज्येष्ठांकडून, महिलांकडून पाठिंबा मिळत आहे. सभांना गर्दी होत आहे. यातूनच मला विजयाची खात्री आहे. 

* निवडणुकीनंतर भाजपमध्ये असणार काय? 
- उमेदवारी जाहीर करून ती मला मिळाली नाही, याची खंत आहे. मात्र, मी अद्याप भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. मला मिळणाऱ्या प्रतिसादाकडे पाहून आज वंचित आघाडीनेही मला पाठिंबा दिला. जनादेश घेऊनच मी अपक्ष रिंगणात उतरलो आहे. निवडणुकीनंतर पुढे काय करायचे, हेही जनादेश घेऊनच ठरवले जाईल. सामान्य जनताच माझा विश्‍वास आहे. त्यांच्याच जोरावर मी रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही त्यांचाच निर्णय अंतिम असेल. 

* निवडणुकीत तुमचे बलस्थान काय आहे? 
- मतदारसंघातील युवक हे आजचे माझे बलस्थान आहे. एका बंडा नावाच्या तरुणाने "एक नोट, एक व्होट' म्हणून मला 500 रुपयांची नोट दिली आहे. आम्ही तुमच्यासोबत असल्याचे ते सांगत आहेत. माझ्यासोबत तरुण आहे. त्यांना आता गटा-तटाच्या राजकारणापेक्षा शाश्‍वत विकास महत्त्वाचा वाटतो आहे. तोच देण्यासाठी मी जनादेश घेऊन रिंगणात उतरलो आहे. हे माझे बलस्थान आहे. माझी पत्नी नवोदिता ब्रॅण्ड झाली आहे. मी विजयी होण्यात तिचा मोठा वाटा असेल. 

* कागलच्या विकासाबाबत तुम्ही काय सांगाल? 
20 वर्षांत कागलचे सिंगापूर होऊ शकले नाही. अशी स्वप्ने मी दाखवणार नाही. कागल ही राजर्षी शाहूंची नगरी हीच ओळख कायम ठेवणार. त्यांचा विचार येथे महत्त्वाचा आहे. विक्रमसिंह घाटगेंनी विकासात राजकारण आणले नाही आणि आम्हीही आणणार नाही. सिंगापूर वगैरे काही नसून राजर्षी शाहूंचे कागल विकासाचे कागल हेच आमचे ध्येय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com