सांगलीत निवडणूक पालिकेची ,अध्यक्ष शहराबाहेरचे, शिवसेना हाकणार उंटावरून शेळ्या

शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपद आनंदराव पवार व संजय विभूते या दोघांकडे आहे. मनसे वगळता अन्य पक्षांत असे दोन-दोन जिल्हाध्यक्ष नाहीत. सेना स्टाईल म्हणावी तर एकही अध्यक्ष जिल्ह्याच्या मुख्य शहरात नाही. पवार इस्लामपूरचे तर विभूते खानापूर तालुक्‍यातील आहेत. महापालिकेची स्थिती, इथली गटबाजी, प्रभाग रचना, त्यानुसार उमेदवारी या गोष्टी त्यांना दूर राहून समजणार कशा?
sangli-shivsena
sangli-shivsena
Published on
Updated on

सांगली   :  भाजपचा हात सोडून राज्यात स्वबळाची घोषणा देणाऱ्या शिवसेनेचा सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत चांगलाच कस लागणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी व भाजपच्या तुलनेत सेनेकडे फार ताकद नाहीच, शिवाय जिल्ह्याचे नेतृत्वही वाळवा आणि खानापूर तालुक्‍यातील सेना नेत्यांकडे आहे. त्यामुळे या निवडणुकीत सेना उंटावरून शेळ्या कशा हाकणार, हा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.
 

'सांगलीनं शिवसेनेला काहीच दिलं नाही, मात्र मी सांगलीला वाऱ्यावर सोडणार नाही', अशी भूमिका शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी मिरजेतील सभेत घेतली होती. सांगलीनं सेनेला काही द्यावं, अशी सेनेची रचनाच नाही, याकडे त्यांनी लक्ष देण्याची गरज होती. ती महापालिकेची निवडणूक तोंडावर आल्यानंतरही झाली नाही, हे विशेष. 

शिवसेनेचे जिल्हाध्यक्षपद आनंदराव पवार व संजय विभूते या दोघांकडे आहे. मनसे वगळता अन्य पक्षांत असे दोन-दोन जिल्हाध्यक्ष नाहीत. सेना स्टाईल म्हणावी तर एकही अध्यक्ष जिल्ह्याच्या मुख्य शहरात नाही. पवार इस्लामपूरचे तर विभूते खानापूर तालुक्‍यातील आहेत. महापालिकेची स्थिती, इथली गटबाजी, प्रभाग रचना, त्यानुसार उमेदवारी या गोष्टी त्यांना दूर राहून समजणार कशा?

 शहरात शिवसेनेकडे या घडीला तीन ताकदीचे नेते आहेत. त्यात सांगली विधानसभा लढलेले पृथ्वीराज पवार, जिल्हा संघटक दिगंबर जाधव आणि विद्यमान नगरसेवक शेखर माने यांनी मनपासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पण, निर्णयाची वेळ येईल तेव्हा यापैकी एकालाही अधिकार  नाहीत. या तीनही गटांची तोंडे तीन दिशेला आहेत.

माजी आमदार संभाजी पवार यांनी शिवसेना-भाजप युतीचा प्रस्ताव दिला, मात्र शिवसेनेच्या वरिष्ठांचा 'मूड' वेगळा आहे. तो काय आहे, कसा आहे, दिशा कशी असावी, याबद्दल पक्षात स्पष्टता नसल्याचे समजते. या साऱ्यावर निरीक्षक असलेले जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील यांचा वक्ता म्हणून दांडगा वकूब आहे, मात्र राजकीय रचना आणि खेळ्या करण्याचा त्यांचा अनुभव कमी आहे. मताच्या राजकारणात त्यांची यशाचा आलेखही फारसा चांगला नाही.

शिवसेनेच्या बांधणीसाठी, वाढीसाठी हयात घालवलेल्या जुन्या जाणत्यांना सोबत घेऊन आणि ताकदीच्या नव्यांना बळ देऊन सेनेला बांधण्याची इथे गरज होती. ती आतापर्यंत तरी झालेली नाही. अर्थात, राज्याची सत्ता काबीज करून विधानसभेवर भगवा फडकवण्याची स्वप्ने पाहताना शिवसेनेला सांगलीकडे इतके दुर्लक्ष करून चालणारे नाही. तरीही महापालिकेसारख्या महत्वाच्या निवडणुकीत पक्ष ' गाफिल' दिसतोय, असेच चित्र आहे.

शिवसेना स्टाईल आहे कुठे?
शिवसेनेचे सांगलीत अनेक सेल कार्यरत असल्याचे छोट्या-छोट्या 'अल्पकालीन' आंदोलनातून दिसते, मात्र त्या आंदोलनात शिवसेना स्टाईल कुठेच नाही. हे सेल कुणी निवडले, कसे निवडले, त्यांचे काम कसे सुरू आहे, याचा एकत्रित आढावा किंवा गांभीर्याने निरीक्षण होताना दिसत नाही. पक्षात सुसूत्रतेचा अभाव असल्याने स्वैर कारभार सुरू आहे. अशाने मनपात ताकद कशी लागणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com