Maharashtra News Live Update : खरात प्रकरणात मोठी अपडेट; शिर्डी पोलिसांनंतर आता ईडी प्रतिभा चाकणकरांची चौकशी करणार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 1 May महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Live Update 2
Live Update 2Sarkarnama
Published on
Updated on

खरात प्रकरणात मोठी अपडेट; शिर्डी पोलिसांनंतर आता ईडी प्रतिभा चाकणकरांची चौकशी करणार 

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातनं समता पतसंस्थेतून बनावट खात्यातून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं होतं. रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि पुतण्याच्या नावानेही असलेल्या चार खात्यांतून तब्बल 2 कोटी 40 लाखांची उलाढाल झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलं होतं. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय यांची संयुक्तपणे 8 तास चौकशी केली होती. आता याप्रकरणी ईडीचे अधिकारी प्रतिभा चाकणकर यांची चौकशी करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लक्ष्मण हाकेंना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर होती

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची ऑफर होती. मात्र शिवसेनेतील काही नेत्यांच्या विरोधामुळे हाक यांची ही संधी हुकली, असे सांगण्यात येत आहे.

हिंदवी स्वराज्याचा नकाशा बदलण्याची परवानगी NCERT कोणी दिली? : जयंत पाटील

हिंदवी स्वराज्याचा नकाशा बदलण्याचं धाडसं NCERT  करण्यापूर्वी शिक्षण विभागाला त्याची परवानगी मागितली असेल ना. शिक्षण विभागाने परवानगी दिल्याशिवाय हे होणार नाही, त्यामुळे NCERT च्या नावाने ओरडण्यापेक्षा त्यांना परवानगी कोणी दिली, हे पाहावे लागेल, असा आरोप माजी मंत्री जयंत पाटील यांनी केला.

आजार बरे करण्याच्या नावाखाली दीड कोटीची फसवणूक

आजार बरे करण्याच्या नावाखाली पुण्यातील भोंदू पादरीने एका साठ वर्षीय वृद्धाची दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी अनिल सोलोमन सिंग या भोंदू पादरीला अटक करण्यात आली आहे.

नंदूरबारच्या नवापूर परिसरात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण

नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरातील तीन पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. या तीन पोल्ट्री फार्ममधील १ लाख ४० हजार कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, आदेश देऊन २४ तास उलटूनही त्या कोंबड्या नष्ट करण्यात आल्या नसल्याचे सांगण्यात येत आहे.

बोगस जन्मप्रमाणपत्र प्रकरणी मुंबई महापालिकेची मोठी कारवाई; 6 अधिकारी निलंबित, 87 हजार 149 प्रमाणपत्र रद्द

मुंबई महापालिकेने बोगस जन्म प्रमाणपत्र प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर आयुक्त अश्विनी भिडे यांनी याची चौकशी करत सहा अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच ८७ हजार १४९ बोगस जन्म प्रमापपत्र रद्द करण्यात आली आहेत.

अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा महाविकास आघाडीसोबत येऊ शकते : युगेंद्र पवार

अजितदादांच्या राष्ट्रवादीने महायुती सोडली किंवा त्यांना सोडावी लागली तर ते परत महाविकास आघाडीसोबत येऊ शकतात. तसेच आपल्या पक्षासोबत (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) येऊ शकतात, असे विधान युगेंद्र पवार यांनी केले आहे.

संजय गायकवाडला मी त्याच दिवशी समज दिली आहे : एकनाथ शिंदे

शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या प्रकाशाला शिवीगाळ करणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना मी त्या दिवशीच दम दिला आहे. मात्र आपले शब्द सुधारत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजयला मी समज दिली आहे, असे स्पष्ट केले.

Raj Thackeray news : राज ठाकरेंची राज्य सरकारवर  टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियात पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हुतात्मा स्मारकाबाबत सरकार उदासीन असल्याचे सांगत त्यांनी कोणतीही सजावट केली नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच मराठी लोकही याबाबत उदासीन असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे.

पाणीटंचाईवर संताप; मंत्र्यांचा ताफा अडवून महिलांचा जोरदार निषेध

भीषण पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या ताफ्यासमोर येत रिकामे मडके फोडून संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि ताफा सुरक्षितपणे पुढे रवाना करण्यात आला.

अजित पवारांनी पाहिलेले विकसित बीड जिल्ह्याचे स्वप्न मी पूर्ण करणार; सुनेत्रा पवार

सुनेत्रा पवार यांनी बीड जिल्हा विकसित, सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. अजित पवार यांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदनासाठी त्या बीडमध्ये आल्या होत्या.

‘मिसिंग लिंक’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला नवा वेग

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राज्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. हा प्रकल्प केवळ रस्ता नसून वाहतूक सुलभ करणार आहे. यामुळे उद्योग, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळणार आहे.

Mumbai Pune expressway : अखेर मिसिंग लिंक सर्वसामान्यांसाठी खुली

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक अखेर सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लिंकचे लोकार्पण झाल्यानंतरच हा मार्ग खुला करण्यात आला . हा मार्ग खुला झाल्याने आता वाहनचालकांचा २५ ते ३० मिनिटे वेळ वाचणार आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यातच आज मिसिंग लिंकचे लोकार्पणही करण्यात आले. या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहतुक कोंडी झाल्याबद्दल वाहनचालकांची माफी मागितली.

मिसिंग लिंकवरील बोगद्याची जागतिक नोंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या मिसिंग लिंकवरील बोगद्याची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. बोगद्याची रुंदी 23.5 मीटर एवढी आहे. सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून या बोगद्याने विक्रम केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून मिसिंग लिंकचं लोकार्पण

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी प्रवाशांचा वेळ आणखी वाचणार आहे. या मार्गावरील मिसिंग लिंकचं आज शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या मिसिंग लिंकमुळे हजारो प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

राज्य सरकारने 'फार्मर आयडी'बाबत घेतला मोठा निर्णय

सध्या अनेक व्यापार हे डिजीटल पद्धतीने होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. निर्णयात आता शेतकऱ्यांकडे 'फार्मर आयडी' असणं खूप महत्वाचं असणार आहे. शेतकऱ्यांची जमीन, पिकांची माहिती, अनुदान, विमा आणि अशा अनेक शासकीय योजनांची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळेल. त्यामुळे भविष्यातले कृषी धोरणे तयार करताना सरकारला अचूक डेटा मिळेल. याची शेवटची तारीख ही २० मे २०२६ पर्यंत असणार आहे. राज्याच्या कृषी विभागाने 15 एप्रिल 2025 पासून महत्त्वाचा हा निर्णय लागू केला आहे. आता अनेक कृषी योजनांसाठी फार्मर आयडी असणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत फूट, नगराध्यक्ष पक्ष सोडणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे हे आपल्या सात नगरसेवकांसह लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल होणार आहेत. मुंबईत लवकरच हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केली स्व-गणना

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे; या पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईनपद्धतीने 'स्व-गणना' पूर्ण केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे वाहतूक कोंडीत अडकल्या

 पुणे - मुंबई एक्सप्रेस वे वरील वाहतूक कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसला.त्या सकाळी दोन ते तीन तास त्या वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. त्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे पक्ष कार्यालयातील झेंडावंदनला त्या वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. माजी खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. दरम्यान, कोंडीचा एक व्हिडीओ देखील सुप्रिया सुळेंनी शेअर केला आहे.

Bhandara Update : मंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत जनगणनेचा भंडारा इथं प्रारंभ

राज्याचे महसूल तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भंडाऱ्यात या जनगणना मोहिमेचा अधिकृत प्रारंभ झाला. मंत्री योगेश कदम यांनी स्वतः त्यांच्या कुटुंबाची माहिती ऑनलाईन पद्धतीनं नोंदवून जनगणनेचा भंडाऱ्यातून श्रीगणेशा केला. जिल्हा प्रशासनातर्फे संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यासाठी प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 ते 15 मे रोजीपर्यंत ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा केंद्र सरकारनं दिली असून त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असं आवाहन यावेळी योगेश कदम यांनी केलं आहे.

Chandrakant Patil On Raj Thackeray : 'राज्य शासनाला दोष देणे हे काही राज ठाकरेंचं बरोबर नाही'

राज ठाकरे यांच्या मराठी भाषेच्या मुद्यावर काही मताशी सहमत आहे, तर काही मताशी सहमत नाही. महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी आलीच पाहिजे. काही आयएएस अधिकारी हे परप्रांतीय आहेत. परंतु ते अस्खलित मराठीत बोलतात. त्यांच्या कामाचा भाग म्हणून आयएएस अधिकारी मराठी बोलत असतील, तर रिक्षा, टॅक्सी, दुकानदार यांनी मराठी बोललं पाहिजे. हे म्हणणं राज ठाकरेंचं मान्य आहे. परंतु राज्य शासनाला दोष देणे हे काही राज ठाकरेंचं बरोबर नाही, असे टोला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.

Nandurbar Alert : बर्ड फ्लूचा शिरकाव, नंदूरबारमध्ये एक लाख 40 हजार कोंबड्यांचे किलिंग होणार

नंदूबारच्या नवापूर इथल्या पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने एक लाख 40 हजार कोंबड्यांचे किलिंग केल्या जाणार असल्याचे संकेत आहे. तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते, ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. यासाठी तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून, नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मची आता सॅम्पल घेतले जाणार आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांची किलिंग केल्या जाणार आहेत. नवापूरच्या परिसरात दहा लाख कोंबड्या आहेत. त्यामुळे या सर्व कोंबड्यांना आता धोका होण्याची शक्यता आहे.

Hasan Mushrif : 'महापुरूषांचा अपमान टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार योग्य ती काळजी घेणार'

महापुरूषांचा वारंवार अपमान होत आहे. असा अपमान होऊ नये, यासाठी महाराष्ट्र सरकार योग्य ती काळजी घेणार, असल्याची ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. नंदूरबार इथं त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजवंदन कार्यक्रम झाला. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री संदर्भात मुख्यमंत्री लवकरच तिढा सोडवतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी म्हटलं.

Beed Update : बीड जिल्ह्याला अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा निर्धार

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन कार्यक्रम झाला. बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

Dhasrashiv News : शासकीय सेवेत समावून घेण्यासाठी महिलेनं स्वतःला पेटवून घेतलं; धाराशिवमधील घटनेनं खळबळ

शासकीय सेवेत पुन्हा समावून घेण्यासाठी महिला कर्मचाऱ्याचा जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनं प्रशासकीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे. अंगावर पेट्रोल ओतून घेत स्वतःला पेटवून घेतलं, यामध्ये महिला सत्तर टक्के भाजल्याची डॉक्टरांची माहिती आहे. बेबी किसनराव पाटील, असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे. यापूर्वी भूविकास बँकेत व्यवस्थापक म्हणून ही महिला कार्यरत होती. भूविकास बँक बंद झाल्यानंतर इतर सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी मागील तीन वर्षापासून महिलेचे प्रयत्न सुरू आहेत.

Hemant Savara : खासदार हेमंत विष्णू सावरा यांच्या वाहनाला गंभीर अपघात

पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्घटना आज सकाळच्या सुमारास घोडबंदर रोड इथं घडली. खासदार सावरा यांची गाडी विरुद्ध साईडने येत असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने, डॉ. सावरा यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.

Bhandara Crime : चौकीदाराची हत्या, दोघांना अटक; जादूटोण्याचा संशय..... 

पोल्ट्रीफार्मवर चौकीदार असलेल्या एका 65 वर्षीय वृद्धाची धारदार शस्त्रानं गळा चिरून हत्या केल्याची घटना भंडाऱ्याच्या सीतासावंगी इथं काल सकाळी उघडकीस आली होती. या प्रकरणी गोबरवाही पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही हत्या जादूटोण्याच्या संशयातून केल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. महादेव कामथे (65) असं मृत इसमाचं नावं आहे. आरोपींमध्ये संदीप मेश्राम (वय 19) आणि अरमान गौरकर (वय 19) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

Maharashtra Day : महाराष्ट्र दिनाचा राज्यात उत्साह; फडणवीस, शिंदे अन् पवार यांचे हुतात्मांना अभिवादन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन केलं. ठाणे इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन कार्यक्रम झाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थित बीड इथं ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाला. या वेळी त्यांनी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं आहे. महाराष्ट्र दिनानिमित्तानं राज्यभरातील जिल्ह्यातील ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात झाले.

Nashik Update : लासलगावमध्ये बँक फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न; चोरटे सीसीटीव्हीत कैद

नाशिकच्या लासलगाव पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची घटना घडली. मध्यरात्री दीड ते अडीच वाजेच्या दरम्यान तीन चोरांनी बँकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला. चोरीसाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला आहे.

Commercial Gas Cylinder Price Hike : व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, तर घरगुती सिलिंडरच्या किंमतीत वाढ नाही

पश्चिम बंगालसह इतर राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपताच महागाईचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. 1 मे 2026 पासून सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सुमारे एक हजार रुपयांची मोठी वाढ झाली आहे. परिणामी, दिल्ली आणि मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये, व्यावसायिक एलपीजीच्या किमती आता तीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. तथापि, या वेळी घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतींमध्ये मात्र कोणतीही वाढ केलेली नाही.

Buldhana Accident : लग्न आटोपून परतताना काळाचा घाला; दुचाकी-रिक्षा धडकेत दोघांचा मृत्यू

बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यात मांडवा फाट्यावरील टी-पॉइंट वळणावर भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. रोशन नांदुरकर (वय 29) यांचा जागीच मृत्यू झाला, तर शुभम वंजाळे (वय 28, रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) यांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. दोघेही पुण्याहून बीबी इथं लग्नासाठी आले होते.

Ladki Bahin Yojana : राज्यात लाडकी बहीण योजनेतील 54 लाख लाभार्थी अपात्र

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर 1 कोटी 89 लाख पात्र ठरल्या आहेत. या योजनेतील 54 लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. अपात्र लाभार्थी यांचा लाभ बंद होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Census 2027 : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून, राज्यात आजपासून जनगणना मोहीम सुरू

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यात आजपासून जनगणना मोहीम सुरू करण्यात येत आहे. दोन टप्प्यांत राबविल्या जाणाऱ्या या मोहिमेत, प्रथम घरगणना केली जाईल. कुटुंबाकडे उपलब्ध इतर सुविधांची नोंद 33 प्रश्नांच्या माध्यमांतून केली जाईल. यानंतर दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना सुरू होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com