Maharashtra News Live Update : मोठी बातमी: 18 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, बारावी निकाल शनिवारी जाहीर होणार

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 30 April विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवेसेना उमेदवारांबाबात उत्सुकता,भैय्यांना मराठी कशासाठी शिकवायचं? राज ठाकरेंचा सवाल, सुनेत्रा पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट यासह महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी जाणून घेऊ या.
Sarkarnama Maharashtra Politics Live Update
Sarkarnama Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

मोठी बातमी: 18 लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार, बारावी निकाल शनिवारी जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालासंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी (ता. 2 मे) रोजी जाहीर केला जाणार आहे. सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांची बारावीच्या निकालासंदर्भातील प्रतीक्षा त्यामुळे संपणार आहे.

पोलिसांचा अशोक खरात प्रकरणानंतर भोंदूबाबांना मोठा दणका,एका महिन्यात 15 गुन्हे दाखल

नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. त्यानंतर पोलिसांनी भोंदूबाबांविरोधात कठोर पावलं उचलत मोठी कारवाई केल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत एकाच महिन्यात एकूण भोंदूबाबांविरोधात 15 गुन्हे दाखल झाले आहेत.

काँग्रेसचा बुरखा फाटला : नितेश राणे

नारीशक्ती वंदन अधिनियम कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ भाजप महिला मोर्चाच्या वतीने कणकवली मध्ये आक्रोश निषेध पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर टीका केली. जेव्हा जेव्हा देशातील माता भगिनींच्या हिताचं काही होत असेल, तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षाने त्याला विरोध केलाय. काँग्रेसचा बुरखा फाटला आहे. त्यांचा खरा चेहरा दिसलाय त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केलं : नितेश राणे

मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरे हे १९९५ पासून प्रयत्न करत होते. त्यांनी षडयंत्र केलं, घाणेरड्या पद्धतीने राणेसाहेब, राज ठाकरे यांच्या विरोधात षडयंत्र केलं. कारण त्यांचे एकमेव उद्दिष्ट होतं की मुख्यमंत्री बनायचं. तेव्हा कदाचित संजय राऊत हे शिवसेनेमध्ये पण नसतील

शेतकऱ्यांचे मॅपिंग करून अर्जाशिवाय योजनांचा लाभ – सहपालकमंत्री आशिष जयस्वाल

गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योजनांचा लाभ थेट त्यांच्या दारात पोहोचवण्यासाठी प्रशासनाने नवे धोरण राबवावे, असे निर्देश सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले आहेत. खरीप हंगाम 2026-27 पूर्वतयारी आढावा बैठकीत त्यांनी ही महत्त्वाची भूमिका मांडली.

भूम नगरपरिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात उपनगराध्यक्षांसह पंधरा नगरसेवकांचे उपोषण!

भूम नगर परिषदेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत जनशक्ती शहर विकास आघाडीच्या 15 नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत आज थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. नगरपरिषदेतील अनियमितता, भ्रष्टाचार आणि मनमानी कारभाराच्या विरोधात निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप करत हे सगळे नगरसेवक आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत आहेत.

'दावा करायचा आणि नंतर माघार घ्यायची ही काँग्रेसची सवयच झालीय' : अशोक चव्हाण

विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेनं अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर एकच पेच निर्माण झाला. तर महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला. यानंतर काँग्रेसने उमेदवार देण्याची तयारी केली. पण काँग्रेसने सामंजस्याची भूमिका अंबादास दानवे यांना पाठिंबा दिला आहे. ज्यानंतर काँग्रेसची माघारीची हॅट्ट्रीक अशा चर्चा रंगल्या आहेत. यावरूनच आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेसवर टीका केलीय. त्यांनी, आधी दावा करायचा आणि नंतर माघार घ्यायची ही काँग्रेसची सवयच झालीय अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

कामगार श्रम संहितामुळे कायम स्वरुपी कामगार देशोधडीला लागणार

नव्या कामगार श्रम संहिते मुळे कारखानदारांना 300 कामगार कामा वरून कधीही कमी करता येण्याच अधिकार मिळाला आहे. कामगारांना कामा वरून काढताना कामगार आयुक्त किंवा राज्य सरकारची कोणतीही परवानगी घेण्याची गरज आता कारखानदारांना राहणारा नाही. यामुळे कामगाराच्या पूर्णवेळ नोकरीचे हक्क धोक्यात आले असून यापुढे त्यांना फक्त फिक्स टर्म वर्कर म्हणून काम मिळणार आहे. त्यामूळे त्यांना भविष्यात पेमेंट स्लिप मिळणार नाही, लाइफ टाइम नोकरी मिळणार नाही असा दावा ज्येष्ठ कामगार नेते यशवंत भोसले यांनी केला आहे. तर एकूणच याचा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसू शकतो अशी भीती देखील भोसले यांनी व्यक्त केली आहे.

बच्चू कडूंचा शिवसेनेत प्रवेश, रवि राणांकडून शुभेच्छा, पुढचं राज'कारण'...

राज्यातील विधानपरिषदेच्या 10 जागांची निवडणूक बिनविरोध झाली. ज्यात एका जागेवर माजी आमदार बच्चू कडू निवडून आले. ते पुन्हा एकदा आमदार झाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली. यानंतर आता अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वाद असलेले आमदार रवि राणा यांनी मला सुद्धा शिवसेनेकडून ऑफर होती, असा दावा केला आहे. तसेच त्यांनी, बच्चू कडू यांना विधानपरिषद आणि आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते १ मे रोजी मुख्य शासकीय ध्वजवंदन

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनोत्सवानिमित्त शुक्रवारी (१ मे २०२६ रोजी) सकाळी ८.०० वाजता मुख्य शासकीय ध्वजवंदन होणार आहे. येथील पोलीस परेड ग्राऊंडवर महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते ते होणार असून इतर कार्यालय अगर संस्थांच्या ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी ७.१५ वा.पूर्वी किंवा सकाळी ९.०० वा.च्या नंतर करावा. तसेच मुख्य शासकीय समारंभासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

दाढ्या कुरवळून आमदारकी मिळवलीत. आता मित्रपक्षात आला आहात तर मित्रासारखे वागा : शिवराय कुलकर्णी

शिवसेना प्रवेश केल्यानंतर बच्चू कडू यांच्यावर भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी हल्लाबोल केला आहे. दाढ्या कुरवळून आमदारकी मिळवलीत. आता मित्रपक्षात आला आहात तर मित्रासारखे वागा, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

धर्मांतर प्रकरणात टीसीएसला बदनाम करणं चुकीचं आहे : देवेंद्र फडणवीस

नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणात टीसीएस कंपनीची कोणतीही चूक नाही. या प्रकरणाच्या तपासात टीसीएस कंपनीने संपूर्ण सहकार्य केलेले आहे. नाशिकच्या धर्मांतर प्रकरणात त्यांनी पहिल्याच दिवशी भूमिका मांडली आहे, त्यामुळे यात टीसीएसला बदनाम करणं योग्य नाही. टीसीएस ही आपल्या देशातील नंबर एकची कंपनी आहे. पण काही लोकांनी त्या कंपनीत केलं, ते सत्य आहे. त्यामुळे संबंधित आरोपींना जी काही शिक्षा आहे, ती झाली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

मराठीचा पुळका फक्त एकाच पक्षाला अन्‌ आम्ही काय हिंदी भाषिक आहोत का? : संजय शिरसाट

मराठी शाळा बंद पडण्यामागे मोक्याच्या जमिनी हडपण्याचे राजकीय कारस्थान आहे, असा गंभीर आरोप मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. त्याला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उत्तर दिले आहे. ‘मराठीचा पुळका फक्त एकाच पक्षाला आहे आणि बाकी आम्ही हिंदी भाषिक आहोत, असं समजण्याचं काही कारण नाही,’ असा टोला शिरसाट यांनी राज ठाकरेंना लगावला.

महिलांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची भूमिका एकनाथ शिंदेंनी निभावली : नीलम गोऱ्हे

महिलांना गुणवत्तेनुसार संधी देण्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. मला विधान परिषदेची उमेदवारी दिल्याबद्दल मी शिंदे यांची ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नीलम गोऱ्हे यांनी पहिल्यांदाच दिली आहे.

अमेरिकेला इराणसोबतचं युद्ध 2.47 लाख कोटी रुपयांना पडणार

इराणसोबतचे युद्ध हे अमेरिकेला 25 दसलक्ष डॉलरला पडणार आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या वित्तीय प्रमुखांनी इराणसोबतच्या युद्धाचा खर्च सांगितला आहे. भारतीय रुपयांमध्ये युद्धाचा हा खर्च 2.47 लाख कोटी रुपये एवढा असणार आहे. अमेरिकेचे संरक्षण मंत्री हेगसेथ यांच्याकडून काँग्रेसमध्ये युद्धाचं समर्थन करण्यात आले आहे.

पवार विरुद्ध पवार होऊ नये, अशी आमच्या संपूर्ण कुटुंबाची इच्छा आहे : सुनेत्रा पवार

अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर मी पहिल्यांदाच नागपूरमध्ये आले आहे. एवढं तापमान असूनही माझ्या स्वागतासाठी झालेली ही गर्दी म्हणजे दादांवरील प्रेम आहे. आमचं कुटुंब हे वेगळे असणार आहे, तर राजकारण हे वेगळे असणार आहे, त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे, ते बरोबर आणि चांगली गोष्ट आहे. आम्हा सर्व कुटुंबाचीही पवार विरुद्ध पवार होऊ नये, अशीच इच्छा आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

News for Students शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, आता विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकाही दाखवणार

राज्यातील शालेय शिक्षण विभागानं विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यावर्षी 1 मे 2026 रोजी जाहीर होणाऱ्या निकालासोबत आता विद्यार्थ्यांना केवळ प्रगतिपुस्तकच नाही, तर त्यांच्या उत्तरपत्रिकाही दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय. शिक्षण आय़ुक्तांनी यासंदर्भातील आदेश जारी केलेत. या निर्णयामुळे मूल्यमापन प्रक्रियेत पारदर्शकता येईल. आपल्या मुलांनी परीक्षेत नेमक्या काय चुका केल्या आणि त्यांची शैक्षणिक प्रगती कशी आहे, हे पालकांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी हे मोठं पाऊल मानलं जातंय.

दानवेंच्या उमेदवारीला काँग्रेसचा पाठिंबा

कॉंग्रसेची मनधरणी करण्यात अखेर शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठं यश आलं आहे. काँग्रेसने विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. अंबादास दानवेंच्या उमेदवारीला कॉंग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयाला आम्ही समर्थन देत आहोत असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे दानवेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Vidhanparishad Election भाजपकडून पाच उमेदवारांचे अर्ज दाखल

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या निर्णयामुळे निवडणुकीतील स्पर्धा अधिक तीव्र झाली असून सर्वच पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. भाजपच्या या पावलामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आगामी निवडणुकीत कोणत्या पक्षाचे समीकरण मजबूत ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Congress news : विजय वडेट्टीवार एबी फॉर्म घेऊन विधानभवनात

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार एबी फॉर्म घेऊन विधानभवनात दाखल झाले आहे. विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडूनही उमेदवारी अर्ज दाखल केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस नाराज आहे.

Shiv Sena news : नीलम गोऱ्हे, बच्चू कडू जाणार विधानपरिषदेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना विधानपरिषदेसाठी शिवसेनेची उमेदवारी जाहीर केली आहे.

Eknath Shinde news : विश्वासाला तडा जाऊ देणार नाही

केवळ दिव्यांगाचे नाही तर शेतकऱ्यांचे प्रश्नही हाती घ्या. मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना दिला. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, अशी ग्वाहीही शिंदेंनी दिली.

Shiv Sena news : बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. कडू यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.

MLC election update : शिवसेनेचे दोन की तीन उमेदवार?

शिवसेनेकडून अद्याप विधानपरिषदेच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. यावर बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले, दोन उमेदवार द्यायचे की तीन याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील. आमचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

MLC Election : ठाकरेंचे नेते सपकाळांना भेटणार

विधानपरिषदेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे काँग्रेसही उमेदवार देणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे मन वळविण्यासाठी ठाकरेंच्या पक्षाचे नेते काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भेट घेणार आहेत.

विधानपरिषदेवर संधी नाही अमोल मिटकरी नाराज म्हणाले...

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून झिशान सिद्दीकींना उमेदवारी दिल्यानं अमोल मिटकरी नाराज झालेत. त्यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.

'प्रहार'चे विलीनीकरण होणार नाही-बच्चू कडू

बच्चू कडू म्हणाले की, प्रहार ही सामाजिक कार्य करणारी संघटना आहे. ती कायम राहिली. आणि प्रहारमधील ज्या राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय काम करायचे आहे ते शिवसेनेत येतील. त्यामुळे प्रहारचे विलीनीकरण होणार नाही.

राज्यसभेसारख एकनाथ शिंदे पुन्हा धक्कातंत्र देणार?  शिवसेनेच्या दुसऱ्या नावाबाबत सस्पेन्स

नीलम गोरे की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांचं राज्यसभेसारख धक्कातंत्र ? उमेदवारी अर्ज भरायला उरले अवघे काही तास मात्र शिवसेनेच्या दुसऱ्या नावाबाबत सस्पेन्स कायम. नीलम गोरे यांच्या नावाची चर्चा असताना अद्याप निलम गोरे यांना कोणत्याही सूचना नाहीत. राज्यसभेसारखं पुन्हा शिवसेना धक्का तंत्र देणार का याकडे आता साऱ्यांचे लक्ष.

नागपूरच्या RSS मुख्यालयाला उडवून देण्याची धमकी

राज्याची उपराजधानी नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला धमकी आली आहे. नागपूरच्या संघ मुख्यालय आणि स्मृतिमंदिरात रेडिओअॅक्टिव्ह (किरणोत्सर्गी) पदार्थ टाकल्याच्या एका निनावी पत्राने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना हे धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या पत्रामुळे केवळ संघच नव्हे, तर नागपूर मेट्रो आणि भाजप कार्यालयाच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी

राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्याती आली आहे. ते आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे.

बच्चू कडू शिवसेनेचे उमेदवार, शिवसेनेत प्रवेश करणार

विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बच्चू कडू हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने साम टिव्हीने दिली आहे. कडू हे शिवसेनेत प्रवेश करणार असले तरी प्रहार ही संघटना कायम राहणार आहे. या संघटनेच्या भवितव्याबद्दल कडू नंतर निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेत संघटनात्मक बदल, वसंत मोरेंवर मोठी जबाबदारी

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पुणे शहरप्रमुखपदी वसंत मोरे आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.पुणे शहर समन्वयक ही जबाबदारी नितीन गावडे यांना देण्यात आली आहे तर सहसंपर्कप्रमुख म्हणून संजय मोरे (पुरंदर, हडपसर विधानसभा), गजानन थरकुडे (भोर, खडकवासला विधानसभा) यांची निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवडच्या सह संपर्क प्रमुखपदी गौतम चाबुकस्वार यांना संधी देण्यात आली आहे.

RSS Threat : नागपूर संघ मुख्यालय,  स्मृतिमंदिरात 'रेडिओ अॅक्टिव्ह' पदार्थ टाकल्याची धमकी

राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाच्या नागपूरमधील मुख्यालयात आणि स्मृतिमंदिरात 'रेडिओ ऍक्टिव्ह' पदार्थ टाकल्याची धमकी निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. 'डीएसएस' नावाच्या संघटनेनं पोलिस आयुक्तांना हे पत्र पाठवले . 'सिझीयम-137' पावडर टाकल्याचा दावा या पत्रात करण्यात आला होता. एटीएस आणि अणुऊर्जा तज्ज्ञांनी तपासणी केली, मात्र काहीही आढळले नाही. याप्रकरणी एटीएसने गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळण्याची शक्यता

विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत मध्यरात्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत कडू यांची उमेदवारी फिक्स झाल्याची माहिती आहे. तसेच त्यांना पुढील सहा महिन्यात मंत्रिपद देखील मिळणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

MLC Election : विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडूनअंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र,शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आज जाहीर होणार आहे. राष्ट्रवादी एक आणि शिंदेंच्या दोन उमेदवारांची नावांची घोषणा आज होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com