

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज महाराष्ट्राच्या दौरावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या केलेल्या कौतुकाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याच कौतुकावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. त्यांनी, एकनाथ शिंदेंना सुखावणे त्यांचे कौतुक ही अमित शहांची गरज आहे. अगदी त्याच पद्धतीने अमित शहांची भलामण करून किंवा अमित शहांच्या साठी सगळा रस्ता खुला करून देणं ही एकनाथ शिंदेंची गरज आहे. याचाच अर्थ तुझे डोक्यावर टोपी माझ्या डोक्यावर टोपी तुझी तशी स्थिर माझी फिरवायला सोपी या न्यायाने दोघांचेही मस्त चालले." असा खोचक टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.
पुणे शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्ताने आपल्याच सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात निवृत्त एसीपीसह कुटुंबातील ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ३० वर्षीय विवाहितेने यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
ग्रामीण रुग्णालयात शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाच बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार साक्री तालुक्यातील जैताने येथे समोर आला आहे. या मारहाणीचा आणि धक्काबुक्कीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून यामध्ये पोलिसांनाच काही जणांकडून धक्काबुक्की आणि मारहाण केली जात असल्याचा प्रकार स्पष्टपणे दिसून येत आहे. यासंदर्भात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या चौघांविरुद्ध निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील नव्याने उभारण्यात येणारा घुमट कोसळून मोठी दुर्घटना झाली. घुमट कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखालून सर्व ३२ जण अडकले होते. या सर्व ३२ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून ७ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रांवर उद्या नीट परीक्षा होणार आहे. एकूण 3301 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागच्या पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपुरात प्रश्नपत्रिका वायुदलाच्या विमानाने आधीच पोचल्या असून त्या जिल्हा प्रशासनाने काटेकोर सुरक्षा बंदोबस्तात गोपनीय ठिकाणी ठेवल्या आहेत. उद्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि प्रत्यक्ष केंद्रावर असणारी सुरक्षा याबाबत पोलीस प्रशासनाने आज चाचपणी केली. चंद्रपुरात सुमारे 300 पोलिस कर्मचारी- अधिकारी यादरम्यान तैनात असतील. प्रत्येक केंद्रावर CISF जवानांचा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर जिल्हा प्रशासनाने वेगळी यंत्रणा उभारली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या सेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करत उद्धव ठाकरेंसोबतच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही सडकून टीका केली. आदित्य ठाकरे यांच्यामध्येही खूप मोठा अहंकार ठासून भरला आहे. त्यांच्या स्वतःच्या वयापेक्षा जास्त काळ राजकारण केलेले, अनुभवी लोक त्यांच्या आजूबाजूला असतात; याच भानही त्यांना उरलेले नाही. त्यांच्या या अशा अहंकारी स्वभावामुळेच लोक आता त्यांची साथ सोडून जात आहेत, असा घणाघात जाधव यांनी केला.
खासदार संजय देशमुख यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यवतमाळच्या दौऱ्यावर येणार आहेत. येत्या शनिवारी (ता. २७ जून) उद्धव ठाकरे हे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्वव ठाकरे जाणार आहेत.
अटक केली तरी आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी जाहीर केले. आंदोलन सुरू असलेल्या दिल्लीतील जंतरमंतर या ठिकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
माहितीचा अधिकार (आरटीआई) कायद्याच्या नियमांमध्ये राज्य सरकारने नुकताच बदल केला. अर्जाचे शुल्क ३० रुपयांपर्यत करण्यात आले आहे. सरकारने नियमांत केलेले बदल आणि शुल्कात कपात करण्यात यावी; अन्यथा मुख्य आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे.
पवनराजे निंबाळकर खून खटल्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातील घरी पोचले आहेत. त्यांच्या भेटीसाठी शिवसेनचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे पोचले आहेत. ओमराजे यांनी अद्याप आपण निर्णय घेतला नाही, असे म्हटल्याने शिंदेसेनेची पुन्हा धावपळ सुरू झाली आहे.
परभणी जिल्ह्यात मंदिराचा सभा मंडप कोसळून त्या खाली ३० ते ४० भाविक अडकले होते. त्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. अडकलेल्या भाविकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी कॉक्रोच जनता पर्टीच्या वतीने नवी दिल्लीतील जंतरमंतरवर पुन्हा आंदोलनास सुरुवात करण्यात आली. अभिजीत दीपके हे आंदेालनाचे नेतृत्व करत आहेत.
परभणी जिल्ह्यात मंदिराचा सभा मंडप कोसळला आहे. त्या सभामंडपाच्या खाली ३० ते ४० भाविक अडकल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने सभा मंडपाच्या खालून काढण्याचे काम सुरू आहे.
ठाकरेसेनेच्या खासदारांच्या फुटीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शाहांवर निशाणा साधला आहे... 2029 च्या तयारीसाठी शाहांकडून खासदारांची फोडाफोडी सुरू असल्याचा दावा राज ठाकरेंनी केलाय... तर वर्षभरात काही तरी गोंधळ होणार.. असंही त्यांनी म्हटलंय
पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील सर्व आरोप निर्दोष सुटले आहेत. आज न्यायालयाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकर निराश झाले. यापेक्षा दुर्दैव ते काय. मला वाटतं न्यायव्यवस्थेचं यापेक्षा मोठं दुर्दैव असू शकत नाही. 20 वर्षांचा मोठा कालावधी या खटल्याच्या निकालासाठी घेतला गेला, त्यानंतर असा निर्णय येत असेल तर हे दुर्दैवी आहे.
कोर्टाने राजकीय वैमनस्य होतं, हे मान्य केले आहे, तरीही सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. त्यामुळे, कोर्टाच्या निकालाचे पूर्ण वाचन करुन आणि सीबीआय काय निर्णय घेते, हे पाहावे लागेल, असे ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले.
ओमराजे निंबाळकर समर्थकांकडून पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालानंतर धाराशिव बंदची हाक देण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व आरोपींची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केल्याचा निकाल दिल्यानंतर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली असून माफीचा साक्षीदार विश्वसनीय नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. या निकालामुळे ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या राजकीय भूमिकेबाबत पुन्हा चर्चांना उधाण आलं असून शिंदेसेना प्रवेशाबाबत निर्णय अजून झालेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे ‘ऑपरेशन टायगर’वर परिणाम होऊ शकतो अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पवन राजेनिंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल आला असून पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. या निकालानंतर आता धाराशीव बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळं शहरात सर्वत्र दुकानं बंद करण्यात येत आहेत.
पवन राजेनिंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल वाचायला कोर्टात सुरुवात झाली आहे. यावेळी कोर्टानं सुरुवातीला काही महत्वाच्या नोंदी नोंदवल्या. यामध्ये एक आरोपी हा माफीचा साक्षीदार झाला त्याच्यावर या खटल्याची भिस्त होती. पण या माफीच्या साक्षादारानं नोंदवलेला सुरुवातीचा जबाब आणि आत्ताचा जबाब यामध्ये तफावत असल्याचं मत कोर्टानं नोंदवलं आहे. त्यामुळं या खटल्याचा पायाच कमजोर असल्याचं म्हटलं आहे.
ऑपरेशन टायगरमधील बंडखोर खासदारांचा पहिला फोटो समोर आला आहे. या छायाचित्रात खासदार संजय जाधव, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील एकत्र दिसत आहेत. ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याची चर्चा आहे. हे सर्व खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
सिंधुदुर्गच्या बांदा-दाणोली रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकत गोव्यातून आणलेला बेकायदेशीर विदेशी मद्यसाठा आणि वाहन ताब्यात घेतले. या कारवाईत सुमारे 8.05 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रकरणी नाशिक येथील दोन संशयितांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
शेतीमालाच्या हमीभावाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत आमदार-खासदारांचा हमीभाव ठरल्याचा आरोप केला. यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी ठाकरेंनी इतरांवर आरोप करण्याऐवजी पक्षातून अनेक नेते आणि कार्यकर्ते का बाहेर पडत आहेत, याचा गंभीरपणे विचार करावा, असा सल्ला दिला. तसेच जनतेसमोर वास्तव मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.
अमरावती जिल्ह्यात मान्सूनच्या कमी पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. आतापर्यंत फक्त 1800 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यंदा जिल्ह्यात सुमारे 6.5 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्ष्य आहे. पुरेसा आणि समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 24 ते 25 जूननंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मान्सूनला उशीर झाल्याने नाशिक शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणांतील जलसाठा कमी झाल्यामुळे महापालिकेने आज संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या कमी दाबाने पाणी दिले जाणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असून, विहिरी कोरड्या पडल्याने खासगी टँकरची मागणीही वाढली आहे.
राज्यात खळबळ उडवणाऱ्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल आज मुंबईतील न्यायालयात जाहीर होण्याची शक्यता आहे. दोन दशकांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी गृहमंत्र्यांसह 9 आरोपींना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 2006 मध्ये पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता.
केंद्रीय मंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. मध्यरात्री दोन वाजून दहा मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, पोलीस महानिरीक्षक यांनी त्यांचे स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.