Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत का गेलो याचे स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियातून अजित पवारांनी आपली भूमिका मांडली आहे. (Ajit Pawar on joining BJP)
वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचावता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षम कशा करता येतील हाच विचार आहे, असे त्यांनी पत्रात नमूद केलं आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कायमच वडीलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समन्वयस्कांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका बदलली आहे, सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्गी लागतील ही स्वच्छ भूमिका आहे, यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल, अशी त्यांनी व्यक्त केली आहे.
संधी मिळाल्यानंतर त्या संधीचे सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला, कष्ट व परिश्रम केले, इतर सर्व जबाबदा-यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले, तीन दशकांहून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यासोबत जात वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हे पत्र लिहीत आहे.
1991 पासून मी राजकीय जीवनात वाटचाल करीत आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली या बाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती, त्यामुळे कुटुंबिय म्हणून मला ती संधी मिळाली.
पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली कारण हातात असलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्गी लागावीत. ज्या मतदारांनी भरभरुन प्रेम केल, विश्वास व्यक्त केला, त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल या साठी कायमच मी प्रयत्न केला.
पहिल्या दिवसापासून राजकारण समाजकारण करताना इतर कोणत्याही मुद्यापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले, आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहका-यांचा एककलमी कार्यक्रम असेल.
काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधक म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडलेली कामे दोन्हीचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वस्तुस्थिती नाकारुन चालत नाही.
विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली या देशाचा जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
नितीन गडकरी यांच्यासारख्या नेत्यांना मी कायमच आदर्श मानत आलो आहे, या देशातील रस्त्यांचा विकास त्यांनी ज्या तडफेने केला, त्याच धर्तीवर या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल या उद्देशाने मी ही भूमिका स्विकारली आहे.
या पुढील काळातही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्ल्यू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी या निमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत याव अस आवाहन करतो.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.