Baramati Vidhansabha Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी काल सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पार पडलं. राज्यभर चुरशीची लढत ठरलेल्या बारमती मतदारसंघाकडेही सर्वांचेच लक्ष लागून होते. काल रात्री उशीरापर्यंत एकूण मतदानाची टक्केवारी समजू शकली नव्हती. अखेर आज विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणूकीत बारामतीत 71. 27 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली आहे.
बुधवारी (ता. 20) झालेल्या मतदानामध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातील 1 लाख 42 हजार 932 पुरुष, 1 लाख 29 हजार 459 महिला व इतर अकरा अशा एकूण 2 लाख 72 हजार 402 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 2019 च्या तुलनेत बारामतीत जवळपास तीन टक्क्यांहून अधिकच्या मतदानाची नोंद झाली.
बारामती विधानसभा मतदारसंघात मेडद येथील बूथ क्रमांक 194 येथे सर्वाधिक म्हणजे 1097 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर सर्वात कमी म्हणजे 209 मतदारांनी नेपतवळण येथील बूथ क्रमांक 89 येथे मतदानाचा हक्क बजावला. बारामतीतील 14 बूथवर सरासरी एक हजारापेक्षा जास्त मतदारांनी मतदान केले.
यंदा राष्ट्रवादीकडून अजित पवार (Ajit Pawar) व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार असा पवार कुटुंबातच सामना होता, त्या मुळे मतदानाचा टक्का वाढण्याची अपेक्षा होती. दुपारी तीन नंतर मतदानाने वेग घेतला. सत्तरी पार करुन मतदानाच्या आकडयाने यंदा उमेदवारांनाही दिलासा दिला आहे. आता मतमोजणीमध्ये मताधिक्य किती मिळणार व कोणत्या उमेदवारांना किती मते मिळणार याचीच चर्चा सुरु झाली आहे.
मतदानाचा टक्का वाढल्याने यंदा कोणाच्या मतांच्या संख्येत वाढ होते व कोणाचे मताधिक्य कमी जास्त होते या बाबत बारामतीत आता चर्चा सुरु आहेत. बारामतीसह राज्यात सत्ता कोणाची येईल याचीही जोरदार चर्चा ठिकठिकाणी रंगताना दिसत आहे.
(Edited By - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.