

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. याचदरम्यान, मराठवाड्यातील औसा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार दिनकर माने यांचा लवकरच भाजप प्रवेश करणार आहे. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनाही झटका दिला आहे. स्वाभिमानीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे कमळ हाती घेतलं आहेत.
महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता पुण्याचा महापौर, उपमहापौर आणि स्थायी समितीचा अध्यक्ष निवडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. पण आता पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या आदेशानुसार 6 फेब्रुवारीला विशेष सभा होणार आहे. सकाळी 11 वाजता सुरू होत असलेल्या याच सभेत पुण्याचा महापौर आणि उपमहापौर आणि स्थायी समिती अधअयक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबीनंतर आता ईडीच्या केसमध्येही निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही आपली भूमिका मांडली आहे. छगन भुजबळांवरील एक प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे, त्यांना कुठलीही क्लीन चीट मिळाली नसून आपण उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचंही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसरात मराठी तरुणी एकता सावंत हिच्या स्टॉलवर केडीएमसीने केलेल्या कारवाईनंतर आता हे प्रकरण थेट 'राज ठाकरे यांच्या दरबारी पोहोचले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने दखल घेतली असून मनसे नेते अविनाश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. डोंबिवली स्टेशनबाहेर एकता सावंत ही मराठी तरुणी आपला फूड स्टॉल चालवून उदरनिर्वाह करते. मात्र, महापालिकेने तिच्या स्टॉलवर कारवाई करत तो हटवला. यावेळी स्टेशन परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामुळे वातावरण अधिकच तापले.
अमरावतीमधील नियोजन विभागाच्या बैठकीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जिल्हा नियोजन विभागाच्या अखर्चित निधीवरून त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. विकासकामांसाठी आलेला निधी वेळेवर का खर्च केला जात नाही. काम करताना आमदारांना विश्वासात का घेतलं जात नाही, असा सवालही त्यांनी केला.
पिंपरी चिंचवड येथील महापौर आणि उपमहापौरपदाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. येत्या ६ फेब्रुवारी रोजी ही निवड होणार आहे. दोन फेब्रुवारी रोजी अर्ज भरावा लागणार आहे. महापालिकेच्या सहा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सभेत महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे.
अजितदादांकडे अर्थखातं आहे, त्यामुळे सत्तेचा खरा ‘अर्थ’ त्यांनाच कळालेला आहे, त्यामुळे अजितदादा सत्तेपासून बाजूला येतील , असे मला अजिबात वाटत नाही. पण अजित पवार हे महाविकास आघाडीत आले तर त्यांचं स्वागतच आहे. त्यांच्या येण्यामुळे महाविकास आघाडी मजबूत होईल. पण चार वर्षांची सत्ता सोडून विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता त्यांची आहे, असं मला वाटत नाही. पण, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने केलेला अपमान पाहता स्वाभिमानी अजितदादांनी निर्णय घ्यायला हरकत नाही, अशी गुगली काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी टाकली आहे.
एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी येत्या काळात मुंब्रा हिरवा करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर त्यांच्या विरोधात सर्वच स्तरावर प्रतिक्रिया उमटत आहेत. आगरी कोळी समाजानेही आक्रमक भूमिका घेत सहर शेख यांचा निषेध केला आहे. सहर शेख यांच्याकडून हिरवा रंग, हिरवी झाडं यासंदर्भात वारंवार ही विधानं येत आहेत, हे म्हणजे भारतात राहून पाकिस्तानचे गुणगान गाण्याचा प्रकार आहे. म्हणजे भारताचं अन्न खावं आणि ढेकर पाकिस्तानच्या नावाने द्यावी, हे आम्हाला शक्य होणार नाही. सहर शेख यांचा बोलवता धनी कोणा आहे, याचा तपास करावा; अन्यथा आम्ही त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आगरी-कोळी समाजाने दिला आहे.
मीरा भाईंदर महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी ज्येष्ठ नेते हसमुख गेहलोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेहलोत यांना भाजपकडून दुसऱ्यांदा गटनेतेपदाची संधी मिळालेली आहे. गेहलोत हे मीरा भाईंदर महापालिकेची माजी उपमहापौर आहेत, त्यांनी भाजपचे काम अतिशय प्रभावीपणे केले आहे. वरिष्ठांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनामुळे मलाच हे पद मिळू शकले आहे. वरिष्ठांनी दिलेली संधी प्रामाणिकपणे पार पाडण्यात येईल, असे गेहलोत यांनी निवडीनंतर सांगितले.
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ईडीच्या कारवाईतून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या निर्णयावर खासदार संजय राऊत यांनी ईडी आणि गृहखात्यानं प्रायश्चित्त घ्यावं अशी मागणी करत जोरदार टीका केली. तर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की चौकशीत काहीही निष्पन्न न झाल्यामुळे भुजबळांची निर्दोष मुक्तता झाली आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकारणात पुन्हा आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत.
बिहार भवनला विरोध करण्याऐवजी हार भवन उभं करा. मनसेनं हार भवन उभे करावे अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित नगरसेवक नवनाथ बन यांनी केली. तर महाराष्ट्रात बिहार भवन कस बांधू देणार नाहीत ? आम्ही कुठल्याही परिस्थितीत बिहार भवन बांधू” असं बिहार सरकारमधील मंत्री अशोक चौधरी यांनी म्हटलं आहे.
नाशिकमधील ४०० कोटींच्या जुन्या नोटांच्या चोरी प्रकरणी चौकशीसाठी कर्नाटक पोलीस नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिक ग्रामीण पोलिसांनी कंटेनर चोरी प्रकरणात रात्री उशिरा डोंबिवलीतून एका संशयिताला ताब्यात घेतलं आणि कर्नाटक पोलिसांनी त्याची चौकशी केली. संशय आहे की ४०० कोटींच्या जुन्या नोटांचा कंटेनर कर्नाटक हद्दीत चोरी झाला आहे. आतापर्यंत या प्रकरणात ७ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच, नाशिकमधील संदीप पाटील या तरुणाचं अपहरण करून कंटेनर चोरी केल्याचा आरोप करत अपहरणाची तक्रार दाखल आहे.
महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या राडा प्रकरणाला दिवसेंदिवस नवे वळण मिळत आहे. या प्रकरणात आता आणखी पाच आरोपी पोलिसांना शरण आले असून, त्यामुळे एकूण आरोपींची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुशांत जाबरे यांच्यासह हे पाच जण आज महाड पोलिस ठाण्यात हजर झाले. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तसेच स्थानिक पातळीवर मोठी चर्चा सुरू आहे.
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक दिवसांपासून ज्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहिली जात होती, तो हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील दहा दिवसांत पात्र महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होऊ शकते. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या अनेक महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पुण्यात महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लांबणीवर पडली आहे. आता ही निवडणूक 6 फेब्रुवारीला होणार असून महापालिकेने विभागीय आयुक्तांना पत्र पाठवले होते. त्यांनतर विभागीय आयुक्तयांनी दिलेल्या माहितीनुसार आता 6 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे. तसेच पहिली विशेष सभा सकाळी 11 वाजता होईल.
ऑल इंडिया मजलिसे इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा इथं निवडून आलेल्या सहर युनूस शेख यांचा व्हिडिओमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहर युनूस शेख यांचा व्हिडिओवरून चांगलाच समाचार घेतला होता. यावर आता स्वतः युनूस शेख आणि सहर युनूस शेख यांना भेटीसाठी बोलावल आहे. या भेटीत नेमकं काय घडतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.
बदलापुरातील जखमी नगरसेवक हेमंत चतुरे यांची शिवसेनेच्या उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी भेट घेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोन दिवसांपूर्वी राजकीय वादातून भाजपच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष बंटी म्हसकर आणि त्याच्या साथीदारांनी नगरसेवक हेमंत चतुरे यांना बेदम मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करत बंटी म्हसकरला अटक केली आहे. त्याला 27 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. जखमी हेमंत चतुरे यांच्यावर बदलापुरातल्याच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कार्यपद्धतीवर बोलताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, "फडणवीस जे बोलतात त्याच्या विरुद्ध करतात, राष्ट्रवादी काँग्रेस बद्दलही फडणवीस बोलले होते. मात्र आता घट्ट मैत्रीच्या स्वरूपात आहे. त्याचप्रमाणे आगामी काळात भाजप आणि AIMIM सत्तेत दिसल्यास नवल वाटू नये."
महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची ईडीच्या कारवाईतून निर्दोष मुक्तता झाली आहे. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. चौकशी अंति आरोप निष्पन्न न झाल्यामुळे छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे, मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले. नांदेडमध्ये होत असलेल्या हिंद दी चादर याद कार्यक्रमासाठी मंत्री गिरीश महाजन नांदेड दौऱ्यावर आहेत. अनेक केसेसमध्ये लोक जेलमध्ये जातात, त्यांना शिक्षा होते, असे नाही. चौकशी अंती निष्पन्न झाले नसेल, म्हणून निर्दोष मुक्तता झाली आहे, अस मंत्री महाजन म्हणाले.
चंद्रपुरामधील काँग्रेस नेत्यांमध्ये कधीच वाद नव्हताच, त्यामुळे मिटण्याचा प्रश्न नाही, असे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले. चंद्रपूर मुद्द्यावर कुठलेही वाद विकोपाला गेलेले नाही, सामंजस्य आणि समोरच्या त्या ठिकाणी आहे. आमचे 27 नगरसेवक एक संघ आहेत आणि काँग्रेसचाच महापौर चंद्रपूरला बसेल, असे ठामपणे सपकाळ यांनी म्हटले.
रायगड जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाली आहे. छाननी अंती जिल्हा परिषदेसाठी 361 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत, तर पंचायत समितीसाठी 656 अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला उमेदवारांची संख्या अधिक आहे. 27 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरीतल्या हातखंबा जिल्हा परिषद गटात एकनाथ शिंदे शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. पक्षाकडून तिकीट न मिळाल्यामुळे माजी समाज कल्याण सभापती परशुराम कदम अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. पक्षाने आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत गाफील का ठेवलं हा आपल्यापुढे प्रश्न असून, फॉर्म भरण्याच्या आदल्या दिवसापर्यंत आपल्याला पक्षाकडून कोणतीही विचारणा झाली नाही. त्यामुळे आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला.
अमरावतीतील सहकार क्षेत्रात मोठी घडामोड घडली असून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभाजन करत संपूर्ण संचालक मंडळ अचानक बरखास्त करण्यात आले आहे. भातकुली इथं स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समितीला अधिकृत दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे अमरावती व भातकुली या दोन्ही बाजार समित्यांवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.
लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांचा आकडा समोर आला आहे. 14 हजार 865 एवढी दुबार मतदार संख्या समोर आल्याने प्रशासनाने कडक पावलं उचलत घरोघरी जाऊन पडताळणी सुरू केली आहे. मतदारांना एकाच मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता प्रशासनाकडून स्वयंघोषणापत्र घेण्यात येत आहेत. सर्वाधिक लातूर तालुक्यात 2हजार 126 दुबार मतदारांची पडताळणी केली, असून त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सोलापुरात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष आणि एकनाथ शिंदे शिवसेना एकत्र आले आहेत. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची आघाडी झाली असून, शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलं आहे. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आमदार दिलीप सोपलविरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात या निवडणुका लढल्या जाणार आहेत.
कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये केली आहे. पक्षाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार 16 जानेवारीपासून मधूर म्हात्रे आणि किर्ती ढोणे हे दोन नगरसेवक संपर्कात नाही.
बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेनेची महाआघाडी झाली आहे.विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आलीय. ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलेय.
डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय आणि मराठीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.डोंबिवली मधील खाद्यपदार्थाचा गाडी चालवणाऱ्या तरुणीला न्याय देण्यासाठी अविनाश जाधव डोंबिवलीत आले होते. डोंबिवलीत परप्रांतीय फेरीवाल्यांना आंदण दिले जाते आहे.. तर दुसरीकडे मराठी तरुणींवरती कारवाई करून अन्याय केला जातोय, असा आरोप करत महापालिकेच्या या दुटप्पी भूमिके विरुद्ध अविनाश जाधव आणि मनसे झाले आक्रमक झाली.मनसे पदाधिकारी येताच फेरीवाल्यांची पळापळ झाली. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी, मनसेनी जाहीर केली भूमिका.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची e-KYC प्रक्रिया करत असताना काही कारणास्तव चुकीचा पर्याय निवडल्याने लाभ स्थगित झाल्याच्या काही तक्रारी विभागास प्राप्त झाल्या आहेत. या व योजनेशी संबंधित इतरही तक्रारींचे, शंकांचे फोन कॉलवर निवारण करण्यासाठी १८१ या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित कॉल ऑपरेटर्सना योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आले आहे. योजनेशी संबंधित सर्व तक्रारींचे व शंकांचे निरसन १८१ या हेल्पलाईन नंबरवरून करण्यात येणार आहे. तरी, सर्व लाडक्या बहिणींनी आवश्यकता भासल्यास या सुविधेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती, असे आवाहन मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.