कोल्हापूर : काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात येवून गेल्यानंतर शिवसेना-भाजपमधील संघर्षाला आता आणखी धार आली आहे. काल अमित शहा (Amit Shaha) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aaghadi Government) जोरदार हल्ला चढवला. त्यानंतर यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरमरीत प्रत्युत्तरही दिले. मात्र आता शहांच्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी सगळी कारण तयार असल्याचे म्हणत सुचक वक्तव्य केले आहे.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, तीन वेळा विधानसभा अध्यक्षांची निवड पुढे ढकलली. राज्यपालांनी दिलेल्या तारखेलाच हि निवडणूक घ्यावी लागते. किती वेळा घटनेचा भंग करणार? सरकार राज्यपालांचे अधिकार कमी करत सुटले आहे. कुलगुरू नेमणूकीचे त्यांचे अधिकार काढून घेतले. सरकारकडून दोन नाव पाठवली जाणार. त्यातील एक नाव राज्यापालांना निवडायचे आहे. त्यांचे सिनेटर्स आणि इतरांची नेमणूक करण्याचे अधिकार काढून घेतले. शिक्षणमंत्र्यांसाठी नवे पद निर्माण करून त्याचा दर्जा कुलगुरुंच्या वरती असावा असाही निर्णय या सरकारने घेतला.
या सगळ्याबाबत राज्यपालांनी मात्र जे होतय ते होऊ दे म्हणून बाजू काढली आहे. पण त्यामुळे ज्या कारणांसाठी राष्ट्रपती राजवट लागू केली जाते त्यापैकी आता कोणतेही बाकी नाही. राष्ट्रपती राजवट लावण्यासाठीची सगळी कारण तयार आहेत. तथापि, इंदिरा गांधी यांनी १९ वेळा किंवा काँग्रेसने ज्या प्रकारे अनेकदा विविध राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली त्या पद्धतीने भाजपाचे नेतृत्व निर्णय घेत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सीबीआय चौकशीसाठी आग्रही राहणार :
राज्यातील सरकारी नोकरभरतीच्या पेपरफुटीची आणि परीक्षांमधील घोटाळ्यांची सीबीआयमार्फत चौकशी करावी, या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीचे भारतीय जनता पक्ष समर्थन करतो. या घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने सीबीआयनेच याची चौकशी करणे योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
आरोग्य विभाग, म्हाडा आणि आता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळ्यांचे धागेदोरे राज्य सरकारपर्यंत जात असल्याने त्याची चौकशी करण्यास त्याच्या वर असलेली संस्था पाहिजे. जे आरोपी तेच न्यायाधीश असे होऊ शकत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे. भाजप ही मागणी लाऊन धरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.