मुंबई : एनसीबी अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या कुटुंबीयांवर सध्या बरेच आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी समीर वानखेडेचा बाप बोगस, तो स्वतः बोगस तसेच त्याच्या घरातले बोगस आहेत, असे म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरला (Kranti Redkar) देखील ट्रोल केले जात आहे. मात्र याच आरोपांवरुन आणि ट्रोलिंगवरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Bip Leader Chitra Wagh) यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे. जेंव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते असे ट्विट करत वाघ यांनी सरकारवर टीका केली आहे.
चित्रा वाघ ट्विटमध्ये म्हणाल्या, काय जमाना आहे, आर्यन खानच्या पाठिशी बॅालिवूडसह सरकार उभे राहिले तर जीव धोक्यात घालणाऱ्या समीर वानखेडे व त्यांची पत्नी क्रांती रेडकरवर अभद्र भाषेत टिका सुरू आहे. जेव्हा सत्तेचा गांजा नसानसात भिनतो तेव्हा सत्ताधाऱ्यांचे खरे रूप समोर येते, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाना साधला आहे. तसेच एक महिला म्हणून क्रांती रेडकरसोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मनसेचा क्रांती रेडकरला पाठिंबा :
नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या बहिणीवर होत असलेल्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पत्रकार परीषद घेण्यात आली होती. त्यावेळी अमेय खोपकर पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, क्रांती रेडकर म्हणाल्या होत्या की कोणीच पुढे येत नाही. पण गरज भासल्यास क्रांती रेडकर यांच्या पाठिशी मनसे उभी राहिल.
एनसीबीवर टीका करणाऱ्यांसाठी क्रांतीची सडेतोड उत्तर देणारी पोस्ट :
एनसीबीवर टीका करणाऱ्यांवर क्रांतीने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सडेतोड उत्तरे दिले होते. त्याचप्रमाणे एनसीबीच्या कामाचे कौतुक करण्यांचे आभार मानले होते. या पोस्टमध्ये क्रांती रेडकरने म्हटले होते की, तुमच्याकडून सतत मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. विशेष करून एनसीबीचे प्रयत्न, त्यांचे सततचे छापे, निर्भिड मेहनत ओळखल्याबद्दल धन्यवाद. तसेच गुंडांना पकडण्याचे त्यांचे कामसुद्धा तुम्हा सर्वांपर्यंत पोहचेल आणि तुमचा पाठिंबा, प्रेम असेच वाढत जाईल अशी आशा करते, अशी ती म्हणाली होती.
दिशाभुल करणाऱ्या माध्यमाला क्रांतीने सुनावले :
एका बेवसाईटने दिलेल्या बातमीबाबत ट्विट करून क्रांती रेडकरने संबंधित वेबसाईटला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. संबंधित वेबसाईटने दिलेल्या बातमीच्या टायटलमध्ये क्रांतीवर आयपीएल फिक्सींगचे आरोप असल्याचे म्हटले आहे. याबाबत क्रांतीने खुलासा केला आहे. बातमीचे टायटल दिशाभूल करणारे आहेच. शिवाय बातमीमध्येही वेगळीच माहिती दिली असल्याचे क्रांतीने ट्विटमधून सांगितले आहे. तसेच मी आधीच यासंदर्भात कोर्टात केस दाखल केलेली आहे आणि जिंकली सुद्धा आहे. मी पूर्ण बातमी वाचली. चूकीच्या ओळखीचं प्रकरण त्यात लिहीलं आहे. मग हे टायटल असं का? माझी आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी? तुमच्या निष्काळजी लिखाणामुळे लोक मला ट्रोल करतात. आम्हालाही भावना आहेत. तुमच्या चटपटीत बातम्या मी खपवून घेणार नाही. असेही क्रांती म्हणाली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.