Maharashtra Dasara Melava 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणात दसरा मेळाव्यांची परंपरा मोठी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला विचारांचे सोनं लुटण्यासाठी तोबा गर्दी व्हायची. (Dasara Melava 2023 Speech) त्यांच्यानंतर ही परंपरा त्यांची दुसरी पिढी म्हणजे उद्धव ठाकरे, पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत गेल्या वर्षीपासून दोन दसरा मेळावे होऊ लागले आहेत. एक उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्कवर, तर दुसरा अन्य मैदानावर, तर तिकडे पंकजा मुंडे यांच्या सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्याकडेही राज्याचे लक्ष असते.
साहजिकच या तिन्ही मेळाव्यात होणाऱ्या भाषणांकडे राज्यातील जनतेचे लक्ष आणि कान दोन्ही असतात. साहजिकच या मेळाव्यात झालेल्या नेत्यांच्या भाषणाची तुलनाही केली जाते. या मेळाव्यातून विचारांचं सोनं किती लुटलं जातं हा वादाचा विषय असला तरी एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोण जिंकलं हेच महत्त्वाचं समजलं जातं.
आज मुंबई आणि परळीजवळील सावरगावच्या भगवान भक्ती गडावर झालेल्या अनुक्रमे (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या भाषणात कुणाचे भाषण प्रभावी ठरले याची चर्चा सुरू झाली आहे.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे दसरा मेळाव्यातील भाषण दुपारी झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच माईकमधील तांत्रिक बिघाड आणि समोरील गोंधळामुळे पंकजा मुंडे यांच्या भाषणाची लिंक तुटली. सातत्याने पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाकडून अन्याय झाला ही भावना प्रत्येकाच्या मनात असल्यामुळे त्यांच्याकडून आक्रमक भाषणाची अपेक्षा केली जात होती.
परंतु परळीच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटीची झालेली कारवाई पाहता, पंकजा मुंडे यांनी संयमित आणि राज्यातील सत्ताधारी तसेच विरोधक अशा कुठल्याही नेत्यावर थेट टीका करणे टाळत संयमी भाषण केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपण पुन्हा मैदानात उतरणार हे सांगत त्यांनी समर्थकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न केला. पाऊण तासाच्या भाषणात टाळ्यांचा कडकडाट व्हावा, असे एकही विधान, टीका किंवा आश्वासन पंकजा यांच्या भाषणातून केले गेले नाही.
त्यामुळे तासन् तास उन्हात बसलेल्या पंकजा समर्थकांचा हिरमोड झाला. इकडे सायंकाळी शिवाजी पार्क आणि दुसरीकडे आझाद मैदान गर्दीने फुलून गेले होते. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे या दोघांच्या सभेला चांगली गर्दी जमली होती. विशेष म्हणजे एकाचवेळी ठाकरे आणि शिंदेंचे भाषण सुरू होते.
उद्धव ठाकरेंकडून आपल्या भात्यातील नेहमीचे बाण सोडले जातील, गद्दार, मर्द, खोके सरकार अशी टीका विरोधकांना अपेक्षित होती. पण ही करत असतानाच उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वालाच थेट लक्ष्य केले.
राज्यातील भाजपचे नेते आणि शिंदे गटाला फारसे महत्त्व द्यायचे नाही, असे सांगत त्यांनी थेट दिल्लीच्या तख्ताला हादरा देण्याचा इशारा दिला. मुंबई महापालिका ही आपला जीव की प्राण आहे, हेही ठाकरे यांनी धारावी झोपडपट्टी, मुंबई तोडण्याचा डाव या आपल्या मुद्द्यांमधून दाखवून दिले.
मुंबई महापालिकेतील कोरोना काळातील घोटाळ्याच्या चौकशीवरून ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना त्यांच्या पक्षात असलेल्या भ्रष्टाचाऱ्यांची यादी वाचून दाखवत खुले आव्हान दिले. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कट्टर आणि एकनिष्ठ शिवसैनिकांना ठाकरेंचे भाषण आज चांगलेच भावले.
तासभर उद्धव ठाकरे यांची तोफ धडधडत होती. अगदीच टाळ्यांचा प्रतिसाद त्यांना मिळाला नसला तरी लोक ठाकरेंचे भाषण कान देऊन ऐकत होते, एवढे मात्र नक्की. तिकडे गेल्या दसरा मेळाव्यात फडणवीसांनी लिहून दिलेली स्क्रीप्ट एकनाथ शिंदेंनी वाचून दाखवली ही टीका या वेळी मात्र शिंदेंनी खोडून काढत घणाघाती भाषण केले.
उद्धव ठाकरेंच्या वारावर पलटवार करत एकनाथ शिंदे यांनी आपणही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचे दाखवून दिले. आगमी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुती म्हणून लढण्याचे आवाहन करतानाच मोदींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रातून ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश त्यांनी शिवसैनिकांना दिले.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिंदेंची शिवसेना पूर्णपणे भाजपच्या प्रभावाखाली काम करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. एकूणच आज राज्यात झालेल्या तीन दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सर्वसामान्यांची पसंती मिळाल्याचे दिसून येत आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.