Mumbai News: विधानसभा निवडणुकीत यंदा मतदारांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रचंड मताधिक्क्य देत विजयी केलं आहे. तर महाविकास आघाडीला नाकारलं आहे. सर्वच राजकी पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावनिक झाले आहेत. यातून त्यांनी मतदार जनतेला उद्देशून एक पत्र लिहिले आहे, जे सध्या विविध माध्यमांवर झळकत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) पत्रात म्हणतात, ''प्रिय मतदार, बंधू आणि भगिनींनो..विधानसभा निवडणुकांच्या निकालात आपण शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीच्या पदरात भरभरून दान दिलं. आपणाला कोटी कोटी धन्यवाद… आपण शिवसेनेसह महायुतीच्या घटकपक्षांवर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ करण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू.''
''वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार वाटचाल करणाऱ्या शिवसेनेला मतदारांनी दिलेला कौल हा आम्ही गेल्या अडीच वर्षात केलेल्या विकासामुळे मिळाला आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वसा, देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) साहेबांचे आम्हाला मिळत असलेले मार्गदर्शन आणि सहकार्य यामुळे महायुती सरकार अधिकच भक्कमपणे कार्य करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विकसीत भारत संकल्पनेला वास्तवात आणण्यासाठी महायुती 24x7 कार्यरत राहील.''
''महाराष्ट्रातील लाडक्या बहीणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, युवा, ज्येष्ठ नागरिक यांनी शिवसेना महायुतीवर आपल्या मतांमधून जो स्नेहाचा वर्षाव केला आहे तो आम्ही कधीच विसरणार नाही. आपला महाराष्ट्र सदैव अग्रेसर राहण्यासाठी आमचा यापुढेही प्रयत्न राहील. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची कार्यपद्धत आहे, त्यानुसार महाराष्ट्रातील सामाजिक पाया भक्कम करतानाच राज्यातील महिला, युवा, शेतकरी गरिबांच्या कल्याणासाठी भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ताकद आपण आम्हाला दिली आहे. आम्ही आपल्या ऋणात राहून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी झटत राहू, अशी ग्वाही देतो.''
''या निवडणुकीत शिवसैनिकांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. महायुती सरकारने अडीच वर्षात केलेलं काम गावोगावी, नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शिवसैनिक आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलं आहे. रात्रीचा दिवस करून आपण टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्हाला आपलं भक्कम पाठबळ मिळालं आहे. चला महाराष्ट्राच्या विकासासाठी पुन्हा सज्ज होऊया. पुनश्च एकदा आपले आभार…''
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.