
काँग्रेस (Congress) खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली आहे. पंढरपुरात येत त्यांनी विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना, ही टीका केली. त्या म्हणाल्या, "भाजपचे लोक नेहमीच वारकरी आणि देवाचा अपमान करतात. त्यांची ही नेहमीची सवय आहे". दोन दिवसांपूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी आषाढी वारीत संविधान दिंडीच्या नावाखाली अर्बन नकक्षलवाद पेरला जात आहे, असा गंभीर आरोप केला होता.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचे प्रकरणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल मुंबई (Mumbai) उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली. सोमनाथच्या मृत्यूशी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला आहे. वंचितचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथच्या आईच्यावतीने ही याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी सायंकाळी पाच वाजता प्रकाश आंबेडकर पुणे इथं पत्रकार परिषद घेणार आहेत.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी आज पंढरपुरात शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, माजी मंत्री सतेज पाटील यांनी महायुती (Mahayuti) सरकारच्या विरोधात आंदोलन केले. शक्ती महामार्गामुळे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्या मुळे या महामार्गाला विरोध केला जात आहे. आषाढी यात्रेच्या निमित्ताने राज्यातील जनतेच्यावतीनं या सरकारला शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची पांडुरंगाने सुबुद्धी द्यावी, यासाठी पांडुरंगाला साकडे घातल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
ठाकरे बंधूंची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली. "निवडणुका जवळ आहेत. आम्ही एकदम तयार आहोत. कोणाला कोठे जायचं, कोणाशी युती करायची, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आमच्या तीनही पक्षावर लोकांचा विश्वास आहे. निवडणुका झाल्यानंतर ते कळेल. कोणाचा किती प्रभावी आहे, कोणाचा फायदा-तोटा झाला", असे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले.
सुधाकर बडगुजर यांच्या भाजप (BJP) प्रवेशावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत करत असलेल्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली आहे. त्यांच्याकडे लोक असले की ते खूप शुद्ध चांगले असतात. त्यांच्याकडून आमच्याकडे आले की मग ते दाऊद झाले, छोटा शकील झाले. संजय राऊत रोज बडगुजर यांच्या घरी जाऊन जेवण-खान करत होते, ते मान्य होतं. ते सोडून गेले की मग ते एकदम नालायक झाले. नाशिकमध्ये महिनाभरात शिवसेना ठाकरे पक्षाचे तीन अध्यक्ष बदलले, त्यामुळे त्यांची अवस्था खूप वाईट आहे, असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी आषाढी वारीमध्ये अर्बन नक्षली घुसल्याचा आरोपावर भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी सोलापूर (Solapur) इथं प्रतिक्रिया दिली. 'आमदार कायंदे यांनी केलेल्या आरोपाची दखल घेतली असून, सरकार याबाबत गंभीर आहे. निश्चितच याबाबत काळजी घेतली जाईल. मात्र असं काही झाले आहे, असे वाटत नाही. मात्र काही सांगता येत नाही. आजकाल कोण कोणत्या थराला जाईल हे सांगता येत नाही. मात्र सरकार अलर्ट आहे', असे मंत्री महाजन यांनी म्हटले आहे.
भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या पुणे (Pune) दौऱ्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली. 'त्यांना देशात पेशवाई स्थापित करायची आहे. त्याची त्यांच्या कार्यकर्त्यांना स्मरण करून देण्यासाठी आले आहेत', असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
राज्यात बालविवाह झाल्यास, ज्या ग्रामपंचायत अंतर्गत तो झाला, त्या ग्रामपंचायतीचा सरंपच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांची शहानिशा करून कारवाई होईल, असा आदेश दिल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.