
मनसेचे (MNS) नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते नवी मुंबईतील सीवूड इथल्या कार्यालयाचे उद्घाटन केलं. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून वातावरण निर्मिती केली जात आहे. यावेळी अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलण्यात नकार दिला असला, तरी अनौपचारिक गप्पा मारताना ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेला दुजोरा दिला. येणाऱ्या दिवसांत आपण मुंबई , नवी मुंबई , ठाणे आदी शहराचा दौरा करत मनसेची संघटनात्मक बांधणी करणार असल्याचे अमित ठाकरे यांनी सांगितले.
आषाढी यात्रेचा सोहळा येत्या सहा जुलै रोजी साजरा होत आहे. या काळात जास्तीत भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेता यावे यासाठी 27 जूनपासून ते प्रक्षाळपूजेपर्यंत 24 तास दर्शन सुरू राहणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.आषाढी यात्रेनिमित्ताने आज मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत 24 तास दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टोकन दर्शन सुविधेचा डेमो 15 जूनला घेण्यात येणार आहे. शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना सपत्नीक, आमंत्रण देण्यात येणार आहे.
धाराशिव इथं भाजप मंत्री नीतेश राणे मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले होते. सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा (BJP) मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी लक्षात ठेवा, असे म्हणत महायुतीमधील मित्रपक्ष शिवसेनेला इशारा दिला. कुणी कितीही ताकद दाखवली, कोणीही कसेही नाचले, तरी देशात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचं लक्षात ठेवावे, असे मंत्री राणे यांनी म्हटले.
'लोकसभेला त्यांनी फेक नॅरेटिव्ह पसरवला, खोट्या बातम्या पसरवून मतदारांची दिशाभूल केली. विधानसभेला मतदारांनी त्यांची जागा दाखवली. राहुल गांधी कधी काय बोलतील, काय टीका करतील, परदेशात देखील जाऊन ते मोदींबद्दल बोलतात, टीका करतात, भारताची बदनामी करत असतात. त्यांचं असं आहे की, गिरे भी तो टांग ऊपर', असा टोला शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लगावला.
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये फिक्सिंग केल्याच्या आरोपावर शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. "लोकशाहीमध्ये राहुल गांधींनी जनमताचा आदर करायला शिकलं पाहिजे. स्वतः हरले. लोकांनी नाकारलं, तर फिक्सिंग. ज्या चार-दोन ठिकाणी त्यांचं सरकार आलंय, मग आम्हाला त्या ठिकाणी फिक्सिंग का करता आलं नाही?" असा सवाल मंत्री देसाई यांनी केला.
गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले मॅच फिक्सिंगचे दावे निवडणूक आयोगाने शनिवारी फेटाळून लावले. महाराष्ट्राच्या मतदार यादीबाबत केलेले निराधार आरोप कायद्याच्या राजवटीचा अपमान असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले.
मनसे अन् ठाकरे शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच शरद पवार (Sharad Pawar), यांनी उद्धव ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी सोबतच लढाव्यात, असं विधान अनौपचारिक गप्पांमध्ये केलं आहे. यावर एकनाथ शिंदे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी, उद्धव ठाकरेंनी लोकसभा आणि विधानसभा मविआ सोबतच लढली. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका देखील आघाडी सोबतच लढाव्यात, असा शरद पवारांचा बोलण्याचा उद्देश असावा, अशी प्रतिक्रिया दिली.
महायुती (Mahayuti) सरकारने निवडणुकीच्या काळात केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्यावतीने भाजप महायुती सत्ताधाऱ्यांविरोधात "क्या हुआ तेरा वादा" या टॅगलाईनखाली आंदोलन करण्यात आले. नांदेड शहरातील भाग्यनगर कमान ते भाजपच्या राज्यसभेचे खासदार अजित गोपछडे यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढून सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी कर्जमाफी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये हप्ता देण्यात, यासह विविध मागण्यांचा समावेश या आंदोलनात होता.
ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला कुठेच अडचण येणार नाही. भाजप (BJP) हा जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. देशात भाजपची तिसऱ्यांदा सत्ता आहे, तर राज्यातही भाजपचे सरकार आहे. भाजपला अडचण येईल, असं मला वातट नाही. ते, दोघेही मोठे नेते काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा विचार आहे, असे भाजपच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंकडून राज्यभरातील तीर्थक्षेत्रावर प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.