
आईसीसी के सदर जानिब,
मी भारतीय संघाची तक्रार करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे. मी अशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष आहे, हे आपल्याला ठाऊकच आहे. (पण तुम्ही फारशी दखल घेत नाहीत, ही माझी खंत आहे) तसेच पाकिस्तानच्या गृहमंत्रिपदाचे कामही अधून मधून पाहत असतो. (...म्हणजे काय करतो, हे विचारू नका) आपल्याला हे पत्र मी लिहीत आहे. खरं तर हे निषेध पत्र आहे. अहो आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत पाकिस्तान आणि भारतात झाली. ही अटीतटीची लढत भारताने (दुर्दैवाने) जिंकली. अन् हा करंडकही जिंकला.
त्यामुळे जड अंतःकरणानं मी करंडक देण्यासाठी पुरस्कार वितरण सोहळ्यात आलो. जड अंतःकरण असल्याने मला तो करंडकही जड वाटत होता. आधी आमच्या पाकिस्तानच्या शूरवीर (कसलं काय, सगळे एकजात हाराकिरी करणारे) उपविजेत्या संघाला मी पदके वगैरे वितरीत केली. विजेत्या भारतीय संघाला पदके आणि आशिया करंडक प्रदान करण्याच्या तयारीत मी होतो. मी पुरस्कार वितरण मंचावर ताटकळत उभा राहिलो होतो. परंतु तिथेच मैदानावर उपस्थित भारतीय संघाने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मी आशाळभूतपणे त्यांची वाट पाहत होतो. मात्र, जसा त्या अभिषेक वर्मानं ज्या तुच्छतेनं आमचा स्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा पहिलाच चेंडू सीमापार भिरकावून लावला, त्याच तुच्छतेनं भारतीय कप्तानानं माझी अपेक्षा भिरकावून दिली.
मी बराच वेळ त्या स्टेजवर उभा होतो. पायाला रग लागली. आधीच पाकिस्तान पराभूत झाल्यानं माझ्या पोटात खड्डा पडला होता. त्यानंतर तो करंडकही माझ्याकडे तोंड वेंगाडून पाहत असल्याचा भास मला झाला. त्यात माझा चेहरा पाहिला तर तो प्रतिबिंबात आणखीच वाकडातिकडा दिसू लागला. स्टेजवरचे मान्यवर आणि पाकिस्तानी संघाला हस्तांदोलनातच मी समाधान मानले. कारण भारतीय संघ हस्तांदोलन तर दूर, माझ्याकडे बघायलाही तयार नव्हता. एवढी आमची उपेक्षा जागतिक बॅंक, नाणेनिधीनंही केली नाही. नंतर मला भीती वाटली, की न जाणो भारतीय संघ हा करंडक उचलून पळून जाईल की काय, ही फजिती नको म्हणून मीच हा करंडक माझ्याबरोबर नेला अन् भारतीयांची फजिती केली. भारतीय संघाला समज द्यावी, ही नम्र विनंती.
आपला विश्वासू, (?)
अध्यक्ष, आशियाई क्रिकेट परिषद
तुमची तक्रार नेमकी कळालीच नाही. तुमच्या हस्ते भारतीय संघाने करंडक घेतला नाही, ही तक्रार तुम्हाला करायची होती, की भारतीय संघानं दुर्लक्ष केलं, ही तक्रार करायची होती? की भारतानं तुम्हाला हरवलं, ही तुमची तक्रार होती? खरं तर भारतीय संघांनं तुमची सोयच पाहिली. त्यांनी जर तुमच्या हस्ते करंडक घेतला असता तर पाकिस्तानला नमविणाऱ्या, हस्तांदोलनही न करणाऱ्या संघास तुम्हाला करंडक द्यावा लागला असता. पाकिस्तानात टीकेची झोड उठली असती. अन् जर भारतीय संघानं हा करंडक तुमच्याकडून हिसकावून तुमच्याशी हस्तांदोलनही नसतं केलं तर तुम्हाला दुबईतच मुक्काम वाढवावा लागला असता. त्यामुळे झालं ते तुमच्या हिताचंच झालंय. अन् तसंही ‘राफेल’ पाडण्याचा खोटा कांगावा करणाऱ्या, भारताला पाण्यात पाहणाऱ्या पाकिस्तानचे तुम्ही गृहमंत्री आहात. तुम्हीही ‘राफेल’ पाडण्याचे हावभाव करणाऱ्या रौफचे समर्थन करणारी चित्रफीत प्रसिद्ध करून त्याचं समर्थन केलं होतं. तसंच भारत-पाक अंतिम सामना अटीतटीचा झाला हा तुमचा भ्रम आहे. तुम्ही शर्मास बाद करण्याचा आटापिटा केला, तेव्हा आमच्या तिलक वर्मानं तुम्हाला नमवलं. याला ‘कात्रजचा घाट दाखवणं’ म्हणतात. मला एवढंच समजलंय, की तुमचे पत्र म्हणजे म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ आहेत.
आपला (?) विश्वासू,
अध्यक्ष, आयसीसी
ता. क. : आशिया परिषद तुमच्या मालकीची नाही. त्यामुळे चोरून नेलेला आशिया कप लवकर परत करा. अन्यथा बहिष्काराची कारवाई करू. मग त्या कपातच तुम्हाला भीक मागावी लागेल..
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.