बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज दोन तास चौकशी झाली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांचीही चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान, ठाकरे गटाकडून एसीबीच्या रत्नागिरी कार्यालयाबाहेर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.
आमदार राजन साळवी यांच्याकडे ज्ञात उत्पन्नाशिवाय जास्त संपत्ती असल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांची आज रत्नागिरीच्या अँटीकरप्शन ब्युरोने चौकशी केली. गेल्या गुरुवारी (ता. 18 जानेवारी) एसीबीने त्यांच्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या मोठ्या बंधूंना चौकशीला येण्याचे समन्स एसीबीच्या रत्नागिरी (Ratnagiri) कार्यालयाने बजावले होते.
समन्सप्रमाणे राजन साळवी आणि त्यांचे मोठे बंधू दीपक साळवी एसीबीच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यांची दोन तास चौकशी झाली. त्यासाठी अनेक कागदपत्रे ते सोबत घेऊन आले होते. आजच्या चौकशीने एसीबी अधिकाऱ्यांचे समाधान होईल, अशी अपेक्षा राजन साळवी यांनी व्यक्त केली. तसेच यापुढेही एसीबीला सहकार्य करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, माझ्या अटकेवर अजून प्रश्नचिन्ह आहे, असे सांगत आमच्या मागे लागलेल्या शुक्लकाष्ठाचे उत्तर आम्ही देणार, असे राजन साळवी म्हणाले. एवढेच नाही तर श्रीराम जसे वनवासातून परतले, त्याचप्रमाणे आम्हीदेखील सुखरूप भविष्यामध्ये परत येऊ, असेही ते म्हणाले. माझ्याप्रमाणे आता ज्येष्ठ बंधूंच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लावण्याचा हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी (ता. 18 जानेवारी) सकाळी नऊ वाजल्यापासूनच एसीबीने (ACB) धडक कारवाई सुरू केली होती. त्यांच्या निवासस्थानासह त्यांच्या तीन मालमत्तांची झाडाझडती घेतली. एकूण ज्ञात उत्पन्नापेक्षा 3 कोटी 53 लाख 89 हजार 752 रुपये जास्त असल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे तब्बल 118.96 टक्के अपसंपदा जमा केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यावेळी बेहिशेबी मालमत्तेचा समाधानकारक खुलासा आमदार राजन साळवी यांनी सादर केला नाही, म्हणून आमदार राजन साळवी, त्यांच्या पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्यावर गुरुवारी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राजन साळवी यांची एसीबीकडून दीड वर्षापासून चौकशी सुरू आहे.
आमदार साळवी यांना यापूर्वी सहावेळा समन्स बजावण्यात आले होते. त्यांची याआधी अलिबागच्या अँटीकरप्शन ब्यूरोच्या कार्यालयात चौकशी झाली होती. एकीकडे आमदार साळवीच्या मागे एसीबी, दुसरीकडे ठाकरे गटाचे दुसरे आमदार रवींद्र वायकर यांची आयकर विभागाकडून चौकशी सुरू असल्यामुळे ठाकरे गटाला लक्ष्य केले जात असल्याचा आरोप होत आहे.
(Edited by Avinash Chandane)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.