

वसंत जाधव
Panvel tehsil office agitation : रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पनवेल तहसील कार्यालय परिसरात मोठा राजकीय थरार पाहायला मिळाला.
आदई पंचायत समिती गणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या उमेदवार अनिता डांगरकर यांच्या अर्ज माघारीवरून शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) आक्रमक झाला. भाजपने हा उमेदवार ‘पळवून’ नेल्याचा खळबळजनक आरोप करत 'शेकाप'च्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं.
परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करत वातावरण शांत केले. त्यानंतर पोलिस निरीक्षकांच्या दालनात शेकाप नेते, संबंधित उमेदवार आणि संबंधित घटकांची बैठक पार पडली. बराच वेळ चाललेल्या चर्चा आणि कायदेशीर प्रक्रियेनंतर अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना (ShivSenaUBT) पक्षाचे अनिता डांगरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या प्रकरणावर पडदा पडला.
आदई पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीचा (MVA) अधिकृत उमेदवार म्हणून शेकापचे (Shetkari Kamgar Paksha) विलास फडके रिंगणात आहेत. मात्र याच मतदारसंघातून शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या अनिता डांगरकर यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आघाडीचा धर्म पाळण्यासाठी डांगरकर यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी भूमिका शेकापने सुरुवातीपासून घेतली होती.
दरम्यान, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी डांगरकर या भाजपच्या संपर्कात असून, भाजपनेच त्यांना अर्ज मागे घेण्यापासून रोखण्यासाठी ‘पळवून’ नेल्याचा संशय शेकापने व्यक्त केला. डांगरकर या वेळेत तहसील कार्यालयात पोहोचू नयेत, यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचा आरोप करत शेकापचे उमेदवार विलास फडके आणि महिला आघाडीच्या नेत्या तेजस्विनी घरत यांनी कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयाबाहेर ठिय्या मांडला.
या वेळी एक वाहन अडवण्यात आले. तसेच जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. भाजपचे कार्यकर्ते प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित नसले, तरी भाजपच्या पाठिंब्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप शेकापकडून करण्यात आला.
अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आणि कायदेशीर प्रक्रियेअंती अनिता डांगरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आदई पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय तणाव निवळला. मात्र अर्ज माघारीच्या दिवशी घडलेल्या या नाट्यामुळे पनवेलच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.