सिंधुदुर्ग : नाणारचा (Nanar Project) प्रकल्प सुरू होणार की नाही यावरून कोकणात वाद सुरू असतानाच आता जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे वारे पुन्हा कोकणात सुरू झाले आहे. या निमित्ताने तेथील नेत्यांतही जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सध्या सिंधुदर्गात जिल्हा बॅंक आणि इतर तीन नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. या निमित्ताने नेत्यांनी एकमेकांवरील टीका अधिक टोकदार केली आहे. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी थेट भाजप नेत्यांना अंगावर घेतले आहे. देवगड येथील मेळाव्यात त्यांनी कठोर टीका केली.
``नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प येणार म्हणून भाजपच्या प्रमोद जठार यांनी जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर जमिनी विकत घेतल्या होत्या. मात्र, हा प्रकल्प बारगळल्याने त्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. हा मोबदला मिळवण्यासाठी त्यांची अजूनही तडफड सुरु आहे. मात्र, प्रमोद जठारांच्या दहा पिढ्या गेल्यातरी शिवसेना कोकणात नाणार प्रकल्प होऊन देणार नाही, असे खासदार राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.तुम्ही कितीही नारळ फोडा, मला फरक पडत नाही. माझ्या पाठिशी लोकांचे आशीर्वाद आहेत. तुमची दलाली बुडाल्याचं मला दु:ख वाटत नाही. काहीही झाले तरी मी नाणार प्रकल्प होऊन देणार नाही, असे विनायक राऊत यांनी म्हटले.
यावेळी राऊत यांनी नारायण राणे यांनाही सोडले नाही. भाजपमध्ये गेल्यावर राणे कुटुंबीयांनी त्यांचे रंग बदलले. विरोधी पक्षात असताना नारायण राणे नाणार प्रकल्पाला विरोध करत होते. मात्र, आता भाजपमध्ये गेल्यापासून त्यांनी सपशेल लोटांगण घातले आहे. राणे कुटुंबीयांची ही भूमिका दुटप्पी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना सिंधुदुर्ग जिल्हा आंदण म्हणून दिलेला नाही, असाही इशारा त्यांनी दिला.
या मेळाव्यात विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या निकटवर्तीयावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातही भाष्य केले. सिंधुदुर्गात नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा रक्तरंजित निवडणुकांना सुरुवात झाली आहे. 2014 पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव बदनाम झालं होतं. आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे पुन्हा दुराचारी लोकांनी हिंसाचाराच्या घटना घडवण्याचे काम सुरु केल्याचे विनायक राऊत यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.