रायगडमध्ये राष्ट्रवादीत उभी फूट पडणार? मोठा नेता तटकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

Kokan politics| ncp|MP sunil tatkare | खासदार तटकरे हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
MP sunil tatkare
MP sunil tatkare

खोपोली : गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माजी आमदार सुरेश लाड (Suresh Lad) यांनी राष्ट्रवादीतून (NCP) बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. चार दिवसांपूर्वीच त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली होती. लाड यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते पक्षाच्या सर्व वॉट्सअप ग्रुपमधूनही बाहेर पडले आहेत. आता त्यांनी आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे लाड राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर राष्ट्रवादीच उभी फूट पडण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस, खासदार सुनील तटकरे आणि माजी आमदार सुरेश लाड यांची मैत्री रायगड जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. गेल्या ३५ वर्षापासून संपूर् रायगड जिल्ह्याने ही मैत्री जिल्ह्याने पहिली आहे. मात्र सुरेश लाड यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने 'दो हंसो का हा जोडा' आता वेगळे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली. लाड राष्ट्रवादीतून बाहेर पडले तर राष्ट्रवादीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खासदार तटकरे हे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काय प्रयत्न करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

MP sunil tatkare
भाजप आमदार नाईक यांच्यावर गुन्हा दाखल ; २७ वर्ष 'लिव्ह इन'मध्ये असल्याचा महिलेचा दावा

गेली काही दिवसापासून सुरेश लाड नाराज असल्याची जिल्ह्यात चर्चा सुरु होती. यापूर्वी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार रायगडमध्ये असताना लाड यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता पण सुनील तटकरे लाड यांची समजूत काढल्याने लाड यांनी राजीनामा मागे घेतला. याच दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ११ एप्रिलपासून ३ दिवस रायगड जिल्ह्यात होते. जिल्हाध्यक्ष या नात्याने सुरेश लाड यांनी या दौऱ्याची पूर्ण तयारी केली. पण उरण येथील कार्यक्रमातून लाड तडकाफडकी बाहेर पडल्याने पुन्हा जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या.

कर्जतममध्ये झालेल्या मेळाव्यालाही सुरेश लाड उपस्थित नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. त्यानंतर २ दिवस नॉट रीचेबल होते. सुरेश लाड कर्जतमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळीही त्यांनी आपण राष्ट्रवादीमधून बाहेर पडत असल्याचे स्पष्ट संकेत दिले. तर दूसरीकडे, ३ दिवसांचा जनसंवाद दौरा संपल्यानंतर सुनील तटकरे, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष नाना म्हात्रे यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रसायनीत गेले होते. त्यावेळीही तटकरे यांनी कर्जत आणि खालापूर तालूक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सुरेश लाड यांची समजूत काढण्यास सांगितले. तटकरेंच्या सुचनांनंतरही कार्यकर्त्यांनी लाड यांची भेट घेतली, पण त्यावेळीही ते राष्ट्रवादी सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी २ दिवसात जाहीर होणारे महामंडळाचे अध्यक्षपदही नाकारले.

दरम्यान, लाड यांच्या नाराजीची कारणेही समोर आली आहेत, लाड यांच्या नाराजीचे कारण म्हणजे खालापूर नगरपंचायत निवडणूकांदरम्यान राष्ट्रवादीने शिवसेनेला दिलेला पाठिंबा सुरेश लाड यांना आवडला नव्हता. कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीचा सामना शिवसेनेसोबत होता, असे असताना पक्ष नेतृत्वाकडून कोणताही पाठिंबा दिला जात नसल्याची खंत लाड यांच्या मनात होती. तर आपणच उभे केलेले कार्यकर्ते आपल्याला डावलून थेट सुनील तटकरेंच्या संपर्क करतात, त्यामुळे जिल्ह्यात आपले महत्त्व कमी झाले असल्याची भावना लाड यांच्या मनात होती. आपल्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, डावलले जाते, आपले महत्त्व राहिलेले नाही, असेही लाड यांना वाटू लागले होते. त्यामुळे जिथे मान-सन्मान नाही तिथे कशाला राहायचं, अशी भूमिका सुरेश लाड यांनी घेतली.

तसेच अलीकडच्या काळात घडलेले अनेक लहान मोठे प्रसंगही लाड यांच्या या निर्णयाला कारणीभूत आहेत. त्यामुळे आता मागे हटायचं नाहीच, असे मनाशी ठरवून सुरेश लाड राष्ट्रवादीला रामराम करण्याची शक्यता आहे. पण सुरेश लाड बाहेर पडले तर राष्ट्रवादीला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुनील तटकरे यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे सुरेश लाड दोन दिवसात नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com