

Sindhudurg BJP news : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध आपला उमेदवारी अर्ज ठेवणे, विरोधी उमेदवाराला मदत करणे, अशा प्रकारच्या पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्गमधील 23 पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे.
राजेंद्र म्हापसेकर, मायकल डिसोझा, शर्वाणी गांवकर, रुपेश पावसकर, योगेश तावडे आदी बंडखोरी केलेल्या उमेदवारांचा त्यात समावेश आहे. भाजपच्या या कडक कारवाईमुळे कोकणातील पक्षाचे कार्यकर्ते हादरले आहेत. या कारवाईचा पक्षाच्या कार्यपद्धतीवर थेट परिणाम होईल, असे कारवाई झालेले बंडखोर उमेदवार, पदाधिकारी खासगीत चर्चा करत, सूचक इशारा देत आहेत.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात फेब्रुवारीला मतदान, नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. अजित पवार यांच्या निधनानंतर निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जाताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप, एकनाथ शिंदे शिवसेना आणि अजित पवार (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 31 जागा भाजप (BJP), 19 जागा एकनाथ शिंदे शिवसेना लढत आहे. तसेच पंचायत समितीच्या 63 भाजप आणि 37 एकनाथ शिंदे शिवसेना जागा लढवित आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांना इच्छा असूनही पक्षाकडून उमेदवारी मिळू शकलेली नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ही नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अनेकांनी बंडखोरी केली. काहींनी पक्ष आणि महायुतीचा धर्म पाळत शांत बसण्याचा पर्याय निवडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी निलंबित केलेल्या कारवाईत माटणे जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, नेरूर, देऊळवाडा इथं एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेल्या रुपेश पावसकर, जिल्हा परिषद माजी सदस्य वंदना किनळेकर, कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेले डायगो (मायकल) डिसोजा, जिल्हा परिषद माजी सभापती शर्वाणी गांवकर आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
याशिवाय राजन चिके (फोंडा, ता. कणकवली), सुजाता पडवळ (तुळस ता. वेंगुर्ले), विजय रेडकर (मातोंड, ता. वेंगुर्ले), जनार्दन कुडाळकर (आडेली, ता. वेंगुर्ले), जितेंद्र गावकर (माजगाव, ता. सावंतवाडी), योगेश केणी (इन्सुली, ता. सावंतवाडी), स्वागत नाटेकर (इन्सुली, ता. सावंतवाडी), नितीन राऊळ (इन्सुली, ता. सावंतवाडी), उल्हास परब (सातार्डा, ता. सावंतवाडी), स्नेहल नेमळेकर (आरोंदा, ता. सावंतवाडी), साक्षी नाईक (ता. दोडामार्ग), सुप्रिया नाईक (ता. दोडामार्ग), सुनीता भिसे (ता. दोडामार्ग), प्रवीण गवस (ता. दोडामार्ग), अनिरुद्ध फाटक (ता. दोडामार्ग), सुष्मिता बांबर्डेकर (ओरोस, ता. कुडाळ), योगेश तावडे (ओरोस, ता. कुडाळ), विजय नाईक (आडेली, ता. वेंगुर्ले) या भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.