
महाराष्ट्राचे सुपुत्र मा. भूषण गवई सरन्यायाधीश झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे पण आपल्याच सुपुत्राचा राज्यातील भाजपा युती सरकार व अधिकाऱ्यांनी सरन्यायाधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून अपमान केला. हे देश व राज्याला सहन न होणारे आहे, सरन्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे? असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
"भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची दहशत आहे. त्यामुळे त्या भागतील लोक बोलत नाहीत. पण आम्ही दहशतीला भीक घालत नाही. आम्ही लढत राहणार. उगाच डायलॉग मारून काहीही होत नाही. आमचा विश्वास न्यायव्यवस्थेवर आहे", असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सातारा इथं म्हटले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे राज्यात फिरायचे सोडून फक्त आपल्या भागात राहून कुरघोडी करतात. त्यामुळे आम्ही त्यांच्या विरोधात बोलतच राहणार, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी साताऱ्यात केली आहे.
शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजप मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला आहे. नवी मुंबईतील मुलभूत सुविधांची पोलखोल करत, तुम्ही कसली सत्ता उपभोगलीत? असा सवाल करत, ठाण्यामध्ये येऊन मुलभूत सुविधा काय आहेत, ते पाहा, असे खासदार म्हस्के यांनी मंत्री नाईक यांना चॅलेंज दिले.
बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत चर्चा केली असून, शिवराज दिवटे या युवकाच्या हल्ल्यातील कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नसल्याचा इशारा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. गुन्हेगाराला जात नसते, ती विकृती असते. जिल्ह्यातील गुन्हेगारी सहन करणार नाही. शिवराज दिवटे याच्या हल्ल्यातील आरोपीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर', राबवत पाकिस्तान स्थित दहशतवाद्याचं नऊ तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला देखील भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत, हल्ला निष्प्रभ केला. भारतीय लष्कराच्या गौरवपूर्ण कामगिरीच्या समर्थनात, मनोबलासाठी देशात भाजपकडून तिरंगा रॅली काढली जात आहे. शिर्डीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढली होती. माजी खासदार सुजय विखे यांच्यासह राहाता तालुक्यातील माजी सैनिक, महिला, हिंदू-मुस्लिम सर्वच मोठ्या संख्येंनं लोक सहभागी झाले होते.
पंधरा दिवसात कर्जमाफी द्या, अन्यथा किसान आर्मी स्थापना करून मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी सरकारला इशारा दिला. निवडणुकीपूर्वी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे आश्वासन दिले होते. मात्र अजून त्यावर कुठलाही निर्णय घेतला नाही. कर्जमाफीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेकडून राज्यभर बैठका सुरू आहेत. क्रांतीकारी संघटनेकडून नांदेड येथे पत्रकार परिषदेत हा इशारा देण्यात आला.
अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली असा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे. ते म्हणाले अजित पवार हे दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत. अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजून गुन्हेगारी वाढली, त्यानंतर बीडमध्ये पुन्हा माफियांचे राज्य उभे राहिले आहे असं पटोले यांनी म्हटलं आहे.
भारत पाकिस्तानमध्ये युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत मोदींना डिवचलं आहे. मोदीजी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत? जवळपास एक महिना झाला. तुमचं लक्ष देशाच्या सुरक्षेवर आहे की प्रचारमध्ये?’ असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष दिपक मानकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. समाज कंटकाकडून आपली राजकीय बदनामी केली जात असल्याचं म्हणत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक कटकारस्थान करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला होता. दीपक मानकर यांचा शहराध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव पोलीस ठाण्यात ठिय्या सुरु केला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने तीन लाखांची लाच मागितली असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. त्या पोलिसावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली आहे.
पुणे काँग्रेसच्या माजी महिला शहराध्यक्ष आणि राज्यातील महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसमध्ये मी ब्राह्मण असल्याने मला त्रास देण्यात आला. ब्राह्मण असल्याने माझ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्यासाठीचा कट कारस्थान देखील करण्यात आलं. याबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांना शंभर ईमेल करून तक्रार करून देखील दखल घेतली गेली नसल्याचं संगीता तिवारी यांनी सांगितला आहे.
परळीत जो व्हिडिओ आलेला आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. गेल्या काही महिन्यात तेथील पोलीस प्रशासनावर बऱ्यापैकी वचक बसलेले आहे. मात्र तेथील काही पूर्वीचे नेते आणि टोळीला लागलेली सवय मोडायला वेळ लागत आहे. पालकमंत्री म्हणून अजित दादांनी जो वचक पोलिसांवर आणला आहे तो कमी पडत आहे.
मुंबईमध्ये विधान भवनाच्या गेटवर मोठी आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे ही आग भडकल्याचे सांगितले जाते. पण कर्मचाऱ्यांनी फायर एक्टिंग्युशरच्या सहाय्याने ही आग विझवली आहे.
इतके फटके बसलेत त्यातून बाहेर पडणे अवघड आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्याबाबत स्वराज्य पक्षाने अद्याप काही ठरवलेले नाही. आमच्याकडून ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू. निवडणूक लढवण्यापेक्षा लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत, असे म्हणत त्यांनी आगामी निवडणुकांबाबत भाष्य केलं.
भाजपचे मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहा यांना सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शाह यांनी सुप्रीम कोर्टात माफीनामा सादर केला. पण कोर्टाने माफी स्वीकारण्यास नकार देत त्यांच्या विधानाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा आदेश दिला. त्यामुळे शहांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पाकिस्तानला भारताच्या ऑपरेशनची माहिती होती. त्यामुळे भारताची किती विमाने आपण गमावली?, असा सवाल राहुल यांनी केला आहे. ही चूक नाही, गुन्हा आहे. देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असल्याचे राहूल यांनी म्हटले आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वीही जयशंकर यांचा एक व्हिडीओ पोस्ट करत हाच सवाल केला होता. पाकिस्तानला ऑपरेशनची आधीच माहिती दिली होती, असे जयशंकर या व्हिडीओत म्हटल्याचा दावा राहुल यांनी केला होता.
तृणमूल काँग्रेसचे खासदार यूसुफ पठाण यांनी केंद्र सरकारच्या शिष्टमंडळातून माघार घेतली आहे. तृणमूल काँग्रेसने सरकारच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना पठाण यांचे नाव मागे घेत सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षानंतर जगभरात देशाची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार केले आहे. हे शिष्टमंडळ जगातील विविध देशांमध्ये भारताची बाजू मांडणार आहेत.
मुंबईला उडवून देण्याची धमकी देणार फोन अज्ञात व्यक्तीनं केल्यानं खळबळ उडाली आहे. डायल 112 ला धमकीचा फोन आला आहे. जे जे मार्ग परिसरात एका व्यक्तीच संभाषण ऐकल्याचा कॉलरचा दावा आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कर्करोगचे (prostate cancer) निदान झालं आहे. तो आता हाडांपर्यंत पसरला आहे. बायडेन यांच्या कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली. 82 वर्षीय बायडेन यांना गेल्या शुक्रवारी त्यांना हा आजार झाल्याचे निदान झाले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दोन दिवस त्यांचा दौरा आहे. नाशिकच्या भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये सुरू असलेल्या संघ वर्गात २८० स्वयंसेवकांना ते मार्गदर्शन करणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरील खेड येथे कार अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. जगबुडी नदीच्या पुलावरून जवळपास शंभर फूट खोल कार कोसळल्यामुळे प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
ऑपरेशन सिंदूरबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी हरयाणाच्या सोनीपत येथील खासगी विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे. अली खान महमूदाबाद असं अशोका विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापकाचे नाव आहे.
बीडचे पालकमंत्री अजित पवार हे पालकमंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच बीडच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे या देखील दिसल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाची आज पाचवी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयात होणार आहे. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्वल निकम उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी यांनी निकम यांच्या अनुपस्थित काम पाहिले होते. आज देखील तेच काम पाहतील अशी माहिती आहे.
रायगड जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल, असे अजित पवार म्हणाले. पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसून निर्णय घेतील. पालकमंत्री नसला तरी रायगडची विकास कामे थांबलेलेली नाहीत. लोकसंख्येच्या प्रमाणात रायगडला निधी देण्यात आला आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तामध्ये तणावाचे वातावरण आहे. या वातावरणात पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी सैफुल्लाह खालिद याला गोळ्या झाडून संपवण्यात आले. तीन जणांनी खालिद याच्यावर गोळीबार करत त्याचा खात्मा केला. गोळीबार करणारे कोण होते हे मात्र समोर आले नाही.
शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे. मराठा संघटनांकडून बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र बीड बंद मागे घेण्यात आला असून परळीमध्ये मराठा संघटनांकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे. मराठा संघटना आंदोलनावर ठाम आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.