Prithviraj Chavan News : महाविकास आघाडी जागावाटपात चुकलीच; चव्हाणांनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

Prithviraj Chavan On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस, अशा तिन्ही पक्षांचं जमिनीवरील संघटन मजबूत आहे, असं चव्हाणांनी सांगितलं.
Prithviraj Chavan  nana patole uddhav thackeray sharad pawar
Prithviraj Chavan nana patole uddhav thackeray sharad pawarsarkarnama

महाविकास आघाडीत ( Mahavikas Aghadi ) जागावाटपावरून गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. विशेषत: शिवसेना आणि काँग्रेसमध्ये टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत. एकीकडे राष्ट्रवादीने भिवंडीची मागणी केली होती, तर दुसरीकडे शिवसेनेने सांगलीचा उमेदवार परस्परच जाहीर करून टाकला होता. मुंबईच्या जागांवरूनही काँग्रेस आणि शिवसेनेत वाद रंगला होता. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण ( Prithviraj Chavan ) यांनी मोठं विधान केलं आहे.

"महाराष्ट्रात जागावाटपामध्ये चुका झाल्या. वाटप करताना आधी मतदारसंघ ठरवून तिन्ही पक्षांना प्रत्येक विभागात किमान एक जागा मिळेल, असा फॉर्म्युला निश्चित करायला हवा होता," असं परखड मत पृथ्वीराज चव्हाण यांनी 'सकाळ'शी संवाद साधताना व्यक्त केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्रात जागावाटपात शिवसेना ठाकरे गट आक्रमक होता, त्यामुळे काँग्रेसला त्यांच्या पारंपरिक जागाही राखता आल्या नाहीत? चव्हाण म्हणाले, "महाराष्ट्रातील जागावाटपात चुका झाल्या आहेत. जागावाटप करताना आधी मतदारसंघ ठरवून तिन्ही पक्षांना प्रत्येक विभागात किमान एक जागा मिळेल असा फॉर्म्युला निश्चित करायला हवा होता. या फॉर्म्युल्यावर तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या घ्यायला हव्या होत्या. मतदारसंघ आणि उमेदवार ठरवणे या दोन्ही गोष्टी एकत्र ठरवल्याने गोंधळ उडाला. आता उमेदवारच मतदारसंघावर दावा करू लागल्याने पक्षाच्या समन्वय समितीच्या हातातून हा विषय गेला. काही घटना घडल्या त्या घडायला नको होत्या. सांगली, भिवंडी, दक्षिण मध्य मुंबई या जागा नक्की करताना चुका झाल्या. सांगली, दक्षिण मध्य मुंबईबाबत काही मार्ग निघेल. मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव पुढे आला होता, पण त्याला आमचा विरोध आहे. जे काही असेल ते कमी जास्त मान्य करून आम्ही पुढे जाऊ."

"दिल्लीत आपसोबत आघाडीची शक्यता कमी होती"

देशात 'इंडिया' आणि राज्यात महाविकास आघाडीबरोबर जागावाटपाची चर्चा करताना काँग्रेस बॅकफूटवर होती का? या प्रश्नावर चव्हाण म्हणाले, "पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहरमध्ये नितीश कुमार हे बरोबर न आल्यानं 'इंडिया' आघाडीला मोठा झटका बसला आहे. बॅनर्जी आणि कुमार एकत्र आल्यावर जो फरक पडला असता, तो फायदा आता मिळणार नाही. बंगाल आणि बिहारसह काश्मीरमध्ये एकास एक उमेदवार द्यायला होते. पण, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि दाक्षिणात्या राज्यांत 'इंडिया' आघाडी झाली. दिल्लीत आपसोबत आघाडीची शक्यता कमी होती. परंतु, तिथे ही आघाडी झाल्याने काही प्रमाणात यश मिळेल."

"जमिनीवर संघटन मजबूत"

महाविकास आघाडीला कसा प्रतिसाद मिळेल? यावर बोलताना चव्हाणांनी म्हटलं, "आम्ही तीन पक्ष एकत्र आल्यावर प्रचंड ताकद तयार होते. कसब्याच्या पोटनिवडणुकीत तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आम्ही त्याचा अनुभव घेतला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार ईडी, सीबीआयच्या कारवाईमुळे गेले, पण लोक त्यांच्या मागे गेले नाहीत. आमच्या तिन्ही पक्षांचे जमिनीवरील संघटन मजबूत आहे."

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com