Lok Sabha Election 2024 Results : सोळा आमदारांपैकी 7 जणांनाच खासदारकीची लॉटरी; 9 जणांच्या स्वप्नांवर पाणी

Lok Sabha Election 2024 Winners : लोकसभेची निवडणूक 16 आमदाराने लढवली होती, पण त्यातील सात जण निवडून आले तर दुसरीकडे नऊ आमदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यातील विधानसभा आणि विधानपरिषदेतील सुमारे १६ आमदार निवडणूक रिंगणात उतरले होते. राज्यातील लोकसभेच्या 48 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत जवळपास 14 खासदारांची उमेदवारी कापण्यात आली होती. त्यामध्ये भाजपने पाच विद्यमान खासदार तर शिंदे यांच्या शिवसेनेने चार जणांचा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून एक अशा दहा खासदारांना डच्चू देण्यात आला होता.

लोकसभेची निवडणूक 16 आमदाराने लढवली होती, पण त्यातील सात जण निवडून आले तर दुसरीकडे नऊ आमदारांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. ऐन निवडणुकीपूर्वी रामटेकमधील काँग्रेसचे (Congress) आमदार राजीव पारवे यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. रामटेकमधून त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे आता ते विधानसभेचे सदस्य नसतील.

शरद पवार गटाकडून खासदार झालेले निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी नगर मतदारसंघातून सुजय विखे यांचा पराभव करीत विजय मिळवला.

लोकसभा निवडणूक लढविलेले नागपूरमधील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे, वनमंत्री सुधीर मनगंटीवार, शिवसेना शिंदे गटाचे राजीव पारवे, राजेश पाटील, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, रासपचे महादेव जानकर, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, भाजपचे मिहीर कोटेचा, शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांना पराभव स्वीकारावा लागला.

दुसरीकडे काँग्रेसचे बळवंत वानखेडे, शिंदे गटाचे रवींद्र वायकर, काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, प्रतिभा धानोरकर, शरद पवार गटाचे निलेश लंके, शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी विजय मिळवला.

एका मंत्र्यांचा विजय तर एकाचा पराभव

लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून विजय मिळवला आहे तर दुसरीकडे चंद्रपूर मतदारसंघातून भाजपचे (Bjp) वनमंत्री सुधीर मनगंटीवार यांना या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा पराभव केला.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com