
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे, पाकिस्तान सरकारने यावर कारवाई करावी. भारती सैन्याकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. या शस्त्रसंधीच्या उल्लंघनास पाकिस्तानच जबाबदार आहे. भारतीय सेनेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे निर्देश दिले गेले आहेत. असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.
पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. श्रीनगरमध्ये विविध ठिकाणी स्फोटांचे आवाज सुरू आहेत. पाकिस्तान जम्मू परिसरातही गोळीबार करत आहे.
भारत कधीही दीर्घ युद्धाच्या बाजूने नव्हता. परंतु भारत दहशतवाद्यांना कठोर धडा शिकवू इच्छितो आणि भारताने सर्व दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची आज घोषणा करण्यात आली. या करारावर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देताना, मी याबद्दल आनंदी आहे, असे सांगितले.
पाकिस्तानचे असे झाले आहे की, देर आए दुरूस्त आए. जिथे जिथे लोक जखमी झाले असतील तिथे त्यांच्यावर योग्य उपचार करावे लागणार आहेत. जिथे जिथे जीव गेले आहेत, त्यांच्या लोकांना भरपाई द्यावी लागणार आहे. जम्मूमध्ये नुकसान झाले आहे. पूंछमध्येही मोठे नुकसान झाले आहे. काल रात्री जम्मूमध्येही बरेच नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करायला लावले असून, त्याचा अहवाल स्थानिक प्रशासनाकडून घेणार आहे. त्यानंतर आम्ही त्यावर काम करू. विमानतळ सुरू झाल्यानंतर आम्ही यात्रेकरूंना हज यात्रेला पाठवणार, असल्याची प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी दिली.
भारत-पाकिस्तान युद्धबंदी करारावर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "सर्वप्रथम मी यामध्ये मध्यस्थी केल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, यासोबतच मी माझ्या देशाच्या आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाचेही अभिनंदन करते. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध होते, तेव्हा जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. जम्मू आणि काश्मीरच्या लोकांसाठी आनंदाचा दिवस आहे".
भारतीय सैन्याने धार्मिक स्थळांचे नुकसान केल्याचा खोटा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्यावर कर्नल सोफिया कुरेशी यांनी भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आपले सैन्य हे भारताच्या संवैधानिक मूल्याचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे. भारतीय सशस्त्र दल भारताच्या सार्वभौमत्वाचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत. आम्ही पूर्णपणे तयार आहोत, असे सांगितले.
पाकिस्तानने भारताच्या जेएफ-17 ने, एस-400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचल्याचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं. सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज इथल्या भारतीय हवाई दलाच्या तळांना नुकसान पोचल्याचा पाकिस्तानाच्या दावा देखील खोटा आहे. या चुकीच्या माहिती पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहे. तसेच चंदीगड आणि व्यास येथील भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोचे नुकसान केल्याचे दावा देखील पूर्णपणे खोटा असल्याचे कर्नल सोफिया कुरेशी यांनी म्हटले.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानाच्या खोट्या दाव्यावर कर्नल सोफिया कुरेशी चांगल्याच संतापल्या. त्या म्हणाल्या, पाकिस्तानने खोट्या बातम्या पसरवल्या. पाकिस्तानच्या पीसीमध्ये अशी चर्चा होती की भारतीय सैन्याने मशिदींना लक्ष्य केले. पण तसे नव्हते. आमच्या लष्कराची कारवाई मोजमापाने आणि जबाबदारीने केली गेली.
जम्मू आणि काश्मीरमधील पूँच जिल्ह्यात पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हिमाचल प्रदेशातील एक ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर (जेसीओ) शहीद झाले. शहीद पवन कुमार हे कांगडा जिल्ह्यातील शाहपूर येथील रहिवासी आहेत. शनिवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी शोक व्यक्त केला.
चारधाम यात्रेबाबत एक मोठी अपडेट आली आहे. भारत-पाकिस्तान तणावामुळे बंद केलेली हेलिकॉप्टर सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. खुद्द उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ही माहिती दिली. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केले आहे की हेली सेवा पुन्हा सुरू केली जाईल. कोणत्याही माहितीसाठी आणि मदतीसाठी 1364 आणि 0135-1364 या हेल्पलाइन क्रमांकांवर कॉल करता येणार आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सोशल मीडियावर एक फोटो प्रचंड व्हायरल झाला. या फोटोत नौदल अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी हिमांशी नरवाल बसलेल्या होत्या. त्यांच नुकतंच लग्न झालं होतं. या दहशतवादी हल्ल्यात विजय नरवाल शहीद झाले. या फोटोचा संदर्भ देत शशी थरुर यांनी भारतीय महिला विवाहित असल्याची निशाणी म्हणून भांगेत सिंदूर लावतात असं सांगितलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील जनतेला एका फोटोनं जागवलं, ज्यामध्ये एका नवविवाहित वधूला पतीच्या मृतदेहाच्या शेजारी हतबलपणे बसावं लागलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर, दहशतवादी हल्ल्याने तिच्या भांगेतील सिंदूर पुसलं होतं.
भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ले करून ते उडवले होते. त्यानंतर आक्रमक झालेल्या पाकने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागत नागरी वसाहतींना लक्ष्य केले होते. भारताकडून या कुरापतीला जोरदार उत्तर दिले जात असल्याने तणाव वाढला. या पार्श्वभूमीवर अमेरिकेसह अनेक राष्ट्र तणाव कमी करण्याचे आवाहन करत आहेत. आता ट्रम्प यांनी युद्धबंदीवर भारत-पाकने सहमती दर्शवल्याचा दावा केला आहे.
भारत आणि पाकिस्तानने शुक्रवारी ओमानची राजधानी मस्कत येथे एकमेकांविरुद्ध हँडबॉल सामना खेळला. भारताने हा सामना 10 व्या आशियाई बीच हँडबॉल चॅम्पियनशिपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. यावेळी भारतीय खेळाडू काळ्या पट्ट्या लावून मैदानात उतरले. पण आशियाई हँडबॉल फेडरेशन (AHF) यांनी काळ्या पट्ट्या काढण्यास सांगितल्या.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्यावरती तुम्ही सुप्रिया सुळे किंवा शरद पवार यांना विचारा... बेगाना शादी मे अब्दुल्ला दिवाना असं मला का करता?, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकचे भाष्य टाळले. पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटते अजितसोबत जावे. दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावे या मताचा आहे, असे शरद पवार यांनी म्हटले होते. यावरून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर फडवीस यांनी मोजक्या शब्दात भाष्य केले.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांनी एक आदेश जारी केला आहे आणि मुंबईत फटाके न फोडण्याचे निर्देश दिले आहेत. फटाक्यांचा मोठा आवाज ऐकून कोणालाही गैरसमज होऊ नये म्हणून हे करण्यात आल्याचे पोलिसांनी यात सांगितले आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्रालयाने शनिवारी देशभरातील नागरिकांना आश्वासन देणारे पत्र जारी केले. मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही नागरिकाने देशाच्या अन्न सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही. धान्ये, डाळी आणि फळे पुरेशा प्रमाणात आहेत. आमच्याकडे पुरेशा प्रमाणात भात, गहू, डाळी, फळे आणि भाज्या उपलब्ध आहेत. देशभरात शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी सुरळीत सुरु आहे आणि धान्यांपासून ते बागायतीपर्यंत सर्व क्षेत्रात उत्पादन लक्ष्यापेक्षा जास्त आहे.
भारताने 7 मे रोजी केलेल्या ‘ऑपरेशन सेंदूर’मध्ये पाच मोठे दहशतवादी ठार झाले आहेत. त्यात लष्कर ए तैयबाचा मोठा कमांडर अबु जुंदाल, हाफिज मुहम्मद जमील (जैश एक मोहम्मद), मोहम्मद अझहर, अबू आकाशा, मोहम्मद हसन खान या टॉप पाच दहशतवाद्यांचा त्यात समावेश आहे. हे पाच दहशतवादी भारतातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते.
पाकिस्तानमधून अमरावतीच्या एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धमकीचे फोन आले आहेत. क्रमांकावरून सुरू होते. अमरावतीमधील नांदगाव पेठ येथील एका कंपनीच्या कर्मचाऱ्याला पाकिस्तानमधून पाकिस्तानमधील (मोबाईल सीरीज +92) ‘हॉट्स ॲप’ वरून कॉल आले आहेत. त्यात कॉलच्या माध्यमातून कंपनी आणि कारखान्यावर बॉम्बहल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांना स्वबळाची तयारी करावी लागते. त्यानुसार आमचीही स्वबळाची तयारी आहे.पण महायुतीचा जो काही निर्णय होईल, त्याला मीही बांधील असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून लढण्याचे जाहीर केले आहे. पण स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला तर राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण तयारीनीशी निवडणुकीच्या मैदानात उतरणार, असे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानच्या कुरापती आणि त्याला भारताने गेली दोन दिवसांत दिलेले चोख प्रत्युतर पाहून पाकिस्तानच्या मंत्र्यांची भाषा बदलली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान ईशाक दार यांनी भारत थांबला, तर आम्हीही थांबायला तयार आहेात. आम्हाला युद्ध नकोय. पाकिस्तानला जीवित आणि आर्थिक हानी टाळायची आहे, असे दार यांनी म्हटले आहे. आम्हाला आता नुकसान आणि आर्थिक तोटा टाळायचा आहे, असेही दार यांनी नमूद केले आहे. याच दार यांनी भारताने केलेल्या स्ट्राईक केल्यानंतर आक्रमक भूमिका घेतली होती.
7 मे रोजी भारतीय लष्कराच्या एअर स्ट्राईकमध्ये ठार झालेल्या पाच दहशतवाद्यांची नावे समोर आली आहे. त्यात युसूफ अझहर, मुदस्सर खान, हाफीज जमील या तिघांचाही समावेश आहे.
पाकिस्तानकडून सुरु असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे.
पीआयबीने पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. भारतीय हवाई दलाच्या महिला पायलटला पकडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. मात्र भारताच्या पीआयबीने ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय महिला हवाई दलाच्या पायलट स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंग यांना पकडल्याचा दावा पाकिस्तानी समर्थक सोशल मीडिया हँडलवरून करण्यात आला होता. मात्र कोणत्याही भारतीय महिला हवाई दलाच्या पायलटला किंवा कोणत्याही सैनिकाला पकडण्यात आलेले नाही असे पीआयबीने म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक नगरी नाशिक मध्ये पंचवटीतील रामकुंड, कपालेश्वर मंदिर तसेच काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये मॉकड्रील करण्यात आले आहे. आपत्ती काळात पर्यटन स्थळी पर्यटक अडकल्यास या आपत्तीजन्य परिस्थितीवर नियंत्रण कसे मिळवायचे? याचे प्रात्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले आहे. दरम्यान मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
ड्रोन, क्षेपणास्त्रांनी भारतीय सीमेवर पाकिस्तानचा हल्ला केला. या हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिले. पाकिस्तानकडून भारतीय नागरीवस्त्यांना टार्गेट करण्यात आले. पाकिस्तान लाहौरमधून होत असलेल्या नागरिक विमान उड्डानाच्या आडून हल्ला करत आहे, असे लेफ्टनंट सोफिया कुरेशी यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
भारत पाकिस्तानच्या युद्धजन्य परिस्थिच्या पार्श्वभूमीवर धार्मिक नगरी नाशिकमध्ये मंदिरांच्या सुरक्षेत वाढ भाविकांची संख्या घटली.
भारत पाकिस्तान तणानात शेअर बाजार कोसळला आहे. शेअरबाजारातील गुंतवणुकदारांच्या 7 लाख कोटी रुपयांची राखरांगोळी झाली. युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजाराची पडझड सुरूच आहे.
पाकिस्तानने राजौरी येथे डागलेल्या तोफगोळ्याचा स्फोटात अतिरिक्त जिल्हा विकास आयुक्तांचा मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
पाकिस्तानकडून भारतावर करण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांना भारताच्या हवाई दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. अशातच आता थोड्या वेळात भारतीय हवाई दलाकडून पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. यामध्ये आतापर्यंतच्या पाकविरोधात केलेल्या कारवाईची सविस्तर माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान प्राधिकरणाने 32 विमानतळ तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून एअरमेनना याबाबतची सूचना जारी केली आहे. या विमान तळावरून आता कोणत्याही विमानानाला उड्डाण करता येणार नाही. हा निर्णय 14 मे 2025 पर्यंत लागू राहणार आहे.
पाकचा जम्मू परिसरातील दहशतवादी तळ भारताकडून उद्ध्वस्त केल्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. भारताकडून पाकिस्तानवर जोरदार हल्ले सुरू असल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.
एकीकडे भारत पाकिस्तानवर हवेतून हल्ले करत असतानाच आता पाकिस्तानवर दुहेरी संकट ओढावलं आहे. कारण मध्यरात्री 1.44 मिनिटांनी पाकिस्तान भुकंपाने हादरलं आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे भारत पाकिस्तानवर क्षेपणास्त्रे डागून हे हल्ले करत असतानाच भूंकपामुळे पाकिस्तानमध्ये भितीचं वातावरण आहे.
पाकिस्तानने आता थेट भारताची राजधानी दिल्लीवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पाकिस्तानचा हा हल्ला भारताने परतवून लावला. हरियाणातील सिरसामध्येच पाकचे फतेह 1 क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केलं. पाकिस्तानकडून जम्मू, उधमपूर, पठाणकोट, श्रीनगर आणि बियास एअर बेसवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.