Operation Sindoor Live Update : 'टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही' : पंतप्रधान मोदी

Ceasefire Violation India Pakistan Dgmo meeting : भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर दोनही देशांचे डीजीएमओमध्ये आज (सोमवारी) चर्चा होत आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

PM Modi Live Updates : 'टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही' : पंतप्रधान मोदी

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या जोरदार संघर्षानंतर 10 मे रोजी शस्त्रविराम झाला. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना पाकिस्तानला इशारा दिला आहे. त्यांनी, टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज आम्ही जगाला सांगू इच्छितो की, जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवादी कारवाया यांच्यावरच होईल.

PM Modi Live Updates : 'ऑपरेशन सिंदूर साध्य करण्यासाठी आपल्या सैनिकांनी अपार धैर्य दाखवले' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर नंतर, पंतप्रधान मोदींनी राष्ट्राला उद्देशून आज भाषण केले. यावेळी त्यांनी, 'आपण सर्वांनी गेल्या काही दिवसांत देशाची ताकद आणि संयम दोन्ही पाहिले आहे. सर्वप्रथम, मी प्रत्येक भारतीयाच्या वतीने भारताच्या बलाढ्य सैन्याला, सशस्त्र दलांना, आपल्या गुप्तचर संस्थांना, आपल्या शास्त्रज्ञांना सलाम करतो. ऑपरेशन सिंदूरची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्या शूर सैनिकांनी अपार धैर्य दाखवले असल्याचे म्हटलं आहे.

PM Modi Live Updates : 'सैनिकांनी शौर्य दाखवले, त्यांना सलाम' : पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच देशाला संबोधित केले. पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या प्रत्येक मुली, बहिणी आणि आईला समर्पित असल्याचे सांगितले आहे. यावेळी ते म्हणाले की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली. हा देश तोडण्याचा घृणास्पद प्रयत्न होता. पण ऑपरेशन सिंदूरमधून आपल्या सैनिकांनी पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं आहे.

Aaditya Thackeray News : “काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही”; आदित्य ठाकरेंची पोस्ट

भारत-पाकिस्तान संघर्षानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांशी थेट संवाद करणार आहेत. याआधीच ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांचं ट्वीट चर्चेत आलं आहे. त्यांनी, “मला आशा आहे की आज भारत सरकार जगाला हे स्पष्ट करेल की काश्मीर कोणत्याही चर्चेचा भाग नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील. हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही.

Sharad Pawar : हा आमचा घरगुती वाद, तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालनार नाही

भारत पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने केलेल्या मध्यस्तीवर आता शरद पवार यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, इतरांनी त्यात नाक खूपसण्याचे कारण काय? अशा शब्दात शरद पवारांनी अमेरिकेच्या हस्तक्षेपावर परखडपणे आपली भूमिका मांडली आहे. हा आमचा घरगुती वाद असून तिसऱ्या राष्ट्राचा हस्तक्षेप चालनार नाही असे पवार म्हणाले. शिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती गांधी यांच्यात झाला होता अशी आठवण त्यांनी करुन दिली.

Stock Market Update : सेन्सेक्स एकाच दिवसात 3000 अंकांनी वधारला,  निफ्टीमध्ये 916 अंकांची वाढ

भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीचा व अमेरिका-चीनमध्ये सुरू असलेल्या टॅरिफवरील चर्चेचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाल्याचे दिसून आले. आज शेअर बाजारातील 3,236 शेअर्समध्ये मोठी वाढ झाली तर 448 शेअर्समध्ये काहीशी घसरण झाली. शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 3.74 टक्के तर निफ्टीमध्ये 3.82 टक्क्यांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 2,975 अंकांची वाढ होऊन तो 82,429 वर स्थिरावला. तर निफ्टीमध्ये 916 अंकांची वाढ होऊन तो 24,924 पोहोचला.

Pakistan Earthquake : पाकिस्तानात भूंकपाचे धक्के

भारतापाठोपाठ आता पाकिस्तानला निसर्गानेही दणका दिला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 4.6 रिस्टेल स्केल इतकी होती. तर खोली 10 किलोमीटर असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात पाकिस्तानमध्ये तिसऱ्यांदा भूकंपाचा धक्का बसला आहे. पाकिस्तानचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

GDP INDIA : भारताच्या जीडीपीचा ग्रोथरेट 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. CII ने वर्तवलेल्या अंदाजानुसार भारताच्या जीडीपीचा ग्रोथरेट 6.5 टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे. देशात सध्या उद्धभवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारताची अर्थव्यवस्था पुरेशी सक्षम असल्याचं सीआयआयचे अध्यक्ष संजीव पुरी यांनी म्हटलेआहे.

Sharad Pawar : सभागृहात सगळ्याच गोष्टी सांगता येत नाहीत : शरद पवार

भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यास माझा विरोध नाही. पण जो विषय आहे, त्याची खुली चर्चा कधी असू शकत नाही. या अगोदर एक दोन घटना घडल्या. त्यावेळी संरक्षण मंत्र्यांनी आम्हा काही लोकांना बोलावलं होतं. कुठं काय झालं आहे, याची कल्पना दिली. काही गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. विशेष अधिवेशनात अपेक्षा काय असणार. काय नेमकं झालं आहे हे सांगायला मर्यादा येऊ शकतात, त्यामुळे सर्वपक्षीय बैठक बोलावावी. त्यांना समजावून सांगावे. त्याचा जो उपयोग होतो, तो सभागृहात सगळ्या गोष्टीचं नाव घेता येत नाही, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.

Narendra Modi : नरेंद्र मोदी आज रात्री देशाला संबोधित करणार...

भारत-पाकिस्तानमधील युद्ध आणि त्यानंतरचा युद्धविराम या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रात्री आठ वाजता देशाला उद्देशून संबोधित करणार आहेत. विशेषतः युद्धविरामची अमेरिकेकडून झालेली घोषणा आणि त्यानंतर सरकारच्या निर्णयावर होणारी टीका या पार्श्वभूमीवर मोदी काय बोलणार, याची उत्सुकता आहे.

Shivsena : तुर्की कंपनी विरोधात शिवसेना आक्रमक; 'पैसे भारतात कमावयचे अन्‌ मदत पाकिस्तानला हे चालणार नाही'

तुर्कीची कंपनी हद्दपार झाली पाहिजे. त्या कंपनीकडे ७० टक्के एअर पोर्टचं काम आहे. पैसे भारतात कमवायचे आणि पाकिस्तानला मदत करायची, हे आम्ही चालू देणार नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रशासनाला दहा दिवसांचे अल्टिमेटम दिलं आहे. त्यांनी दहा दिवसांत कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल. विमानतळाचा ७० टक्के भाग हा तुर्कीची कंपनी सांभाळते. त्या कंपनीचा करार रद्द करण्यात यावा, असे आम्ही सीईओला सांगितले आहे. पैसे भारतात कमावणार आणि ड्रोन पाकिस्तानला देणार हे चुकीचे आहे, असे शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी सांगितले.

India Vs Pakistan Update : पाकला पाठिंबा देणे भोवणार 

भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणे तुर्की आणि अजरबैजान या दोन देशांना चांगलेच भोवणार आहे. ट्रॅव्हल्स असोसिएशनने या दोन्ही देशांच्या पर्यटनावर बंदी घातली आहे. देशातील पर्यटक या देशांत पाठविणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. तर पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीतून येणाऱ्या सरफरचंदवर बहिष्कार टाकला आहे.

Indian Army Live Update : गरज भासल्यास आम्ही सज्ज

पुन्हा गरज भासल्यास आम्ही पुढील मिशनसाठी सज्ज असल्याचे हवाई दलाच्या महासंचालकांनी स्पष्ट केले. तर पाकिस्तानच्या हल्ल्यादरम्यान अरबी समुद्रात भारतीय नौदलाचेच वर्चस्व राहिल्याचे ए. एन. प्रमोद यांनी स्पष्ट केले. कोणतीही संशयास्पद वस्तू जवळ फिरकूही दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Indian Army Live Update : पाकिस्तानला संधीच नव्हती

पाकिस्तान हल्ल्याचा प्रयत्न करणार हे आधीच माहिती होते. त्यामुळे सीमेलगत तीनस्तरीय सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली होती. भारताच्या या अभेद्य सुरक्षा व्यवस्थेला भेदून भारताच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची संंधीच पाकिस्तानला मिळाली नाही, असेही राजीव घई यांनी सांगितले.

Indian Army Live Update :  पापाचा घडा भरला होता...

राजीव घई यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत दहशतवाद्यांच्या कारवायांमध्ये बदल झाला होता. लष्करासोबतच सामान्य नागरिकांवरही हल्ले होत होते. पहलगामपर्यंत पापाचा हा घडा भरला होता. दहशतवाद्यांवर एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमा पार न करता आम्ही हल्ले केले होते. त्यामुळे पाकिस्तानही हल्ला करेल, अशी शक्यता होती. त्यामुळे त्यामुळे आम्ही सर्व यंत्रणा सज्ज ठेवली होती, असे राजीव घई यांनी स्पष्ट केले.

Indian Army Live : एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य

ए. के. भारती यांनी यावेळी भारताच्या हवाई संरक्षण कारवाईची माहिती दिली. पाकिस्तानचे हल्ले परतवून लावताना भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने उत्तम कामगिरी केली. भारताने पाकिस्तानची ड्रोन, क्षेपणास्त्र हवेतच उध्वस्त केली. आकाश या भारतीय प्रणालीची कामगिरी उत्तम होती. सरकारच्या सततच्या पाठिंब्यामुळे अद्ययावत यंत्रणेची निर्मिती शक्य झाली. त्यामुळे आपली एअर डिफेन्स सिस्टीम अभेद्य असल्याचे भारती यांनी सांगितले.

Indian Army Live Update : लष्काराची पत्रकार परिषद

डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजेच DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई, डीजीएओ एअर मार्शल ए. के. भारती आणि डीजीएनओ व्हाइस अडमिरल ए. एन. प्रमोद यांनी सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना एअर मार्शल ए. के. भारती म्हणाले, आपली लढाई केवळ दहशतवादाविरोधात होती. पण पाकिस्तानी सेनेने त्यांना साथ दिली. यामध्ये आपण केलेली कारवाई गरजेची होती. त्यामध्ये त्यांचे झालेल्या नुकसानीला तेच जबाबदार आहेत.

संरक्षण दलासोबत राज्य सरकारची बैठक; काय घडलं?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण दलासोबत बैठक घेतली. यात गुप्तचर विभागाकडून येणारी माहिती, मुंबईची सुरक्षा आणि युद्ध सदृश्य स्थितीमध्ये काय करायला हवे याबद्दल घेतलेली काळजी यावर सविस्तर चर्चा झाली.

अजित पवारांचा खंदा शिलेदार अडचणीत; पुण्याचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांच्या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावरती अटकेची टांगती तलवार पाहायला मिळत आहे. पोलिसांना बनावट कागदपत्र सादर करून दिशाभूल केले असल्याचा ठपका मानकर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याबाबत पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा समोर आल आहे.

दिवंगत काँग्रेस आमदाराचा मुलगा निघाला भाजपमध्ये

करवीर विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार पी.एन. पाटील यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा भाजप निश्चित झाला आहे. 23 मे नंतर पक्षप्रवेशाचा मुहूर्त असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

भोगावती सहकारी साखर कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भाजप पक्षप्रवेशाची चर्चा सुरू असली तरी यामागे अनेक राजकीय डावपेच दडले आहेत. पाटील यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 दहावीच्या निकालाचीही तारीख जाहीर... धाकधूक वाढली

उद्या, 13 मे 2024 रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. उद्या दुपारी एक वाजता हा निकाल बघता येणार आहे.

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांची माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका

1971 मध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर बांगलादेशच्या निर्मितीनंतरची परिस्थिती त्यांनी योग्यरित्या हाताळली नाही, असे म्हणत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवर टीका केली. मुख्यमंत्री हिंमता सरमा यांनी त्यांच्या एक्स खात्यावरील पोस्टमध्ये, आरोप केला की त्या काळातील राजकीय नेतृत्वाच्या अपयशामुळे, बांगलादेशची निर्मिती ही "ऐतिहासिक गमावलेली संधी" होती. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्र्‍यांनी ही लांबलचक पोस्ट केली आहे.

Karnataka Subbanna Ayyappan : पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यू

पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्यांचं समोर आलं आहे. कर्नाटक पोलिसांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू केली आहे. श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीत डॉ. सुब्बन्ना अय्यपन मृतावस्थेत आढळले होते. 70 वर्षीय अयप्पन कृषी आणि मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ञ होते आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICMR) अध्यक्ष असलेले पहिले बिगर-पीक शास्त्रज्ञ होते.

Share Market Boom : युद्धबंदीच्या बातमीने गुंतवणूकदार उत्साहित; 11 लाख कोटी रुपयांची भरघोस कमाई

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेला सीमा तणाव आता संपत येताना दिसतो आहे. दोन्ही देशांमधील युद्धबंदी कराराच्या बातमीनंतर सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी दिसली. बीएसई सेन्सेक्स 1,500 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह उघडला आणि काही मिनिटांतच तो 2,241.55 अंकांनी (2.82%) वाढून 81,696.02 वर पोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 50 निर्देशांकही 696.15 अंकांनी (2.90%) वाढून 24,704.15 अंकांवर पोचला. सन फार्मा वगळता सेन्सेक्सच्या सर्व समभागांनी ताकद दाखवली. या मोठ्या वाढीसह, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल 11.1 लाख कोटी रुपयांनी वाढून 427.49 लाख कोटी रुपये झाले.

Gold Price Falls : भारत-पाकिस्तानमधील तणावात सोन्याचे भाव कोसळले

सोमवारी सकाळी शेअर बाजारात मोठी तेजी असतानाच, दुसरीकडे सोन्याचे भाव कोसळले. एमसीएक्सवर जूनच्या फ्युचर्स सोन्याच्या किमतीत दोन टक्क्यांहून अधिक घसरण झाली. या घसरणीसह, सोने प्रति 10 ग्रॅम 95 हजार रुपयांच्या खाली आले. सोन्याच्या किमतीतील घसरण भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीशी जोडली जात आहे.

Devendra Fadnavis And Eknath Shinde : फडणवीस वर्धा, तर शिंदे बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहे. फडणवीस यांच्या उपस्थित देवाभाऊ राष्ट्रीय कब्बडी स्पर्धेचा समारोप होणार आहे. परंतु या स्पर्धेवर पावसाचे सावट आहे. बुलढाणाच्या चिखली तालुक्यातील इसरूळ इथं गीता परिवार संस्थेच्यावतीने आयोजित स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यास एकनाथ शिंदे हजेरी लावणार आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा दुपारी तीन वाजता होणार आहे.

नवनीत राणांना पाकिस्तानमधून जीवे मारण्याची धमकी

माजी खासदार, भाजपने नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानमधून धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने म्हटले आहे की, हिंदू शेरनी हनुमान चालीसां पढने वाली थोडे दिन की मेहमान.. जल्दी उडाने है वाले है. पाकिस्तानमधील वेगवेगळ्या नंबरवरून राणा यांना धमक्या येत आहेत. राणा यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्ध्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपच्या नवीन जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन यासह विविध कार्यक्रमांना उपस्थिती राहणार आहेत. तसेच सेवा पंधरवाडा समारोप, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय लोकार्पण सह देवाभाऊ राष्ट्रीय कब्बड्डी स्पर्धेच्या समरोपाला देखील ते उपस्थित राहतील.

डीएमओच्या बैठकीआधीच पाकिस्तान घाबरला

आज शस्त्रसंधीबाबत निर्णय घेण्यासाठी भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील डीजीएमओची बैठक होत आहे. या बैठकीत शस्त्रसंधीबाबत निर्णय घेतले जाणार आहे. मात्र, याबैठकीच्या आधीच पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने ट्विट करत म्हटले की, पाकिस्तान शस्त्रसंधीचे पालन करेल. भारताच्या कोणत्याही भागावर हल्ला करणार नाही.

india Pakistan DGMO : आज 12 वाजता भारत आणि पाकिस्तानच्या DGMO मध्ये चर्चा

भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर दोनही देशांचे डीजीएमओमध्ये आज (सोमवारी) चर्चा होत आहे. शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही देशाचे डीजीएमओ चर्चा करतील, असे ठरवण्यात आले होते. त्यानुसार ही बैठक होत असून या बैठकीनंतर शस्त्रसंधी कायम राहणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com